YouVersion लोगो
सर्च आयकॉन

कलस्सैकरांना 3:1-19

कलस्सैकरांना 3:1-19 MACLBSI

तुम्ही ख्रिस्ताबरोबर जर उठवले गेला आहात, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे, तेथल्या वरील गोष्टी मिळविण्याचा प्रयत्न करा. वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका; कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. तुमचे खरे जीवन ख्रिस्त आहे आणि तो जेव्हा प्रकट केला जाईल, तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर वैभवाने प्रकट केले जाल! तर मग पृथ्वीवरील तुमच्या दैहिक वासना म्हणजे लैंगिक अनैतिकता, अमंगळपणा, कामवासना, दुष्ट प्रवृत्ती व लोभम्हणजेच एक प्रकारची मूर्तिपूजा, ह्यांना मूठमाती द्या. अशा गोष्टींमुळे देवाच्या आज्ञा न पाळणाऱ्यांवर देवाचा कोप होतो. तुम्हीही पूर्वी अशा वासनांत जगत होता, तेव्हा त्यांची सत्ता तुमच्यावर चालत असे. परंतु आता राग, क्रोध, व द्वेषभावना यांचा नायनाट करा. निंदा व शिवीगाळ करणे ह्या गोष्टी तुमच्या मुखापासून दूर राहोत. एकमेकांशी खोटे बोलू नका; कारण तुम्ही जुन्या मनुष्याला त्याच्या सवयींसह काढून टाकले आहे. ज्याला त्याचा निर्माणकर्ता देव त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे सातत्याने नवीन करीत आहे, असा नवा मनुष्य तुम्ही धारण केला आहे. ज्यामुळे तुम्हांला त्याचे परिपूर्ण ज्ञान प्राप्त व्हावे. परिणामी, ग्रीक व यहुदी, सुंता झालेला व न झालेला, रानटी व स्कुथीपंथीय, गुलाम व स्वतंत्र असा भेद उरला नाही. तर ख्रिस्त सर्व काही आणि सर्वांत आहे. तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात, म्हणून करुणा, चांगुलपणा, लीनता, सौम्यता व सहनशीलता हे सारे धारण करा. एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्हाणे असल्यास आपसात क्षमा करा, प्रभूने तुम्हांला क्षमा केली तशी तुम्हीही करावयास हवी. सर्वोच्च म्हणजे ह्या सर्वांना एकसूत्रित करून परिपूर्ण करणारी प्रीती धारण करा. ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो, तिच्याकरता तुम्हांला एक शरीर म्हणून बोलावण्यात आले आहे, म्हणून तुम्ही कृतज्ञ असा. ख्रिस्ताचा संदेश त्याच्या समृद्धीसह तुमच्या अंतःकरणामध्ये राहो. परस्परांस सर्व सुज्ञतेने शिकवण द्या व बोध करा. आपल्या अंतःकरणात देवाला स्तोत्रे, भक्तिगीते व आध्यात्मिक गायने कृतज्ञतेने गा. म्हणजेच शद्बात व कृतीत, जे काही तुम्ही कराल ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा आणि त्याच्याद्वारे देवपित्याचे आभार माना. पत्नींनो, जसे प्रभूमध्ये उचित आहे त्याप्रमाणे तुम्ही आपल्या पतींच्या अधीन असा. पतींनो, तुम्ही आपल्या पत्नींवर प्रीती करा व त्यांच्याशी निष्ठुरतेने वागू नका.