YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांचे कार्य 5:1-21

प्रेषितांचे कार्य 5:1-21 MACLBSI

हनन्या नावाचा एक गृहस्थ व त्याची पत्नी सप्पीरा ह्यांनी त्यांची काही मालमत्ता विकली. परंतु हनन्याने आलेल्या किमतीतून काही भाग पत्नीच्या संमतीने स्वतःसाठी राखून ठेवला व उरलेला भाग आणून प्रेषितांकडे दिला. पेत्र त्याला म्हणाला, “हनन्या, तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी व जमिनीच्या किंमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून तू तुझे मन सैतानाच्या ताब्यात का दिलेस? विकण्यापूर्वी ती जमीन तुझी स्वतःची होती व विकल्यावर सर्व रक्‍कम तुझीच नव्हती काय? तर मग असे करण्याचे आपल्या मनात तू का आणलेस? तू मनुष्याशी नव्हे तर देवाशी लबाडी केली आहेस.” हे शब्द ऐकताच तो खाली पडला व मरण पावला आणि हे ऐकणाऱ्या सर्वांना मोठे भय वाटले. नंतर काही तरुणांनी येऊन त्याला गुंडाळले व बाहेर नेऊन पुरले. सुमारे तीन तासांनी त्याची पत्नी आत आली तेव्हा जे घडले ते तिला ठाऊ क नव्हते. पेत्र तिला म्हणाला, “मला सांग, एवढ्यालाच तुम्ही जमीन विकली काय?” तिने उत्तर दिले, “होय, एवढ्यालाच.” पेत्र तिला म्हणाला, “प्रभूच्या आत्म्याची परीक्षा पाहण्यात तुम्ही संगनमत का केले? पाहा, ज्यांनी तुझ्या पतीला पुरले ते एवढ्यातच परत येत आहेत. ते तुलाही उचलून बाहेर नेतील.” ती त्याच्या पायांजवळ पडली व मरण पावली. तरुणांनी आत येऊन तिला मेलेले पाहिले व बाहेर नेऊन तिच्या पतीजवळ पुरले. ह्यावरून सबंध ख्रिस्तमंडळीला व हे ऐकणाऱ्या सर्वांना मोठे भय वाटले. प्रेषितांच्या हस्ते लोकांमध्ये पुष्कळ चिन्हे व अद्भुत कृत्ये घडत असत. ते सर्व एकचित्ताने शलमोनच्या देवडीत जमत असत. त्यांच्यात सामील होण्यास इतर कोणाचे धैर्य होत नसे. मात्र लोक त्यांना थोर मानत असत. प्रभूवर विश्वास ठेवणारे पुरुष व स्त्रिया त्यांना मिळत गेले. इतके की, लोक रुग्णांना रस्त्यावर आणून खाटांवर आणि चटयांवर ठेवीत, ह्यासाठी की, पेत्र येत असता त्याची सावली तरी त्यांच्यातील काही जणांवर पडावी. तसेच यरुशलेमच्या आसपासच्या नगरांतून लोकसमुदाय रुग्णांना व अशुद्ध आत्म्यांनी पीडलेल्यांना घेऊन तेथे येत असत आणि ते सर्व बरे होत असत. उच्च याजक व त्याच्याबरोबर असलेले सर्व सदूकी सहकारी मत्सराने पेटून उठले. त्यांनी प्रेषितांना अटक करून सार्वजनिक तुरुंगात टाकले. परंतु त्या रात्री प्रभूच्या दूताने तुरुंगाचे दरवाजे उघडले व त्यांना बाहेर आणून म्हटले, “जा. मंदिरात उभे राहून हा संपूर्ण संदेश लोकांना सांगा.” हे ऐकून दिवस उजाडताच ते मंदिरामध्ये जाऊन प्रबोधन करू लागले. इकडे उच्च याजक व त्याचे सहकारी ह्यांनी येऊन न्यायसभेला व यहुदी लोकांच्या सर्व वडीलजनांना एकत्र बोलावले आणि प्रेषितांना आणावयास शिपायांना तुरुंगाकडे पाठवले.

प्रेषितांचे कार्य 5:1-21 साठी चलचित्र