म्हणून महाराज, अग्रिप्पा, मी त्या स्वर्गीय दृष्टान्ताचा अवमान केला नाही तर प्रथम दिमिष्क, यरुशलेम आणि नंतर अवघ्या यहुदियात व परराष्ट्रीय लोकांत मी उपदेश करीत फिरलो की, पश्चात्ताप करा आणि पश्चात्तापास शोभतील अशी कृत्ये करून देवाकडे वळा. ह्या कारणामुळे यहुदी मला मंदिरात धरून ठार मारावयास पाहत होते. तथापि देवाकडून साहाय्य प्राप्त झाल्यामुळे मी आजपर्यंत लहानमोठ्यांना साक्ष देत आहे आणि ज्या गोष्टी होणार आहेत म्हणून संदेष्ट्यानी व मोशेने सांगितले त्यांखेरीज मी दुसरे काही सांगत नाही, त्या अशा की, ख्रिस्ताने दुःख सोसावे आणि त्यानेच मेलेल्यांतून उठणाऱ्यांपैकी पहिला होऊन आमच्या लोकांना व यहुदीतरांनाही तारणाचा प्रकाश प्रकट करावा.” ह्याप्रमाणे तो प्रत्युत्तर करत असता फेस्त ओरडून म्हणाला, “पौल, तू वेडा आहेस! अतिशिक्षण मिळवल्यामुळे तुझे डोके फिरले आहे!” पौल म्हणाला, “फेस्त महाराज, मी वेडा नाही, तर मी सत्याच्या व सुज्ञपणाच्या गोष्टी बोलत आहे. ह्या गोष्टी महाराज अग्रिप्पा ह्यांना ठाऊक आहेत, त्यांच्यासमोर मी मनमोकळेपणे बोलतो. ह्यांतले त्यांच्यापासून काही गुप्त नाही अशी माझी खातरी आहे; कारण हे एखाद्या कोपऱ्यात घडलेले नाही. महाराज अग्रिप्पा, संदेष्ट्यांवर आपला विश्वास आहे ना? विश्वास आहे, हे मला ठाऊक आहे.” अग्रिप्पाने पौलाला म्हटले, “मी ख्रिस्ती व्हावे म्हणून तू अल्पावधीत माझे मन वळवितोस काय?” पौल म्हणाला, “अल्पावधी किंवा दीर्घकाळ, कसेही असो केवळ आपणच नव्हे, तर आज हे जे सर्व माझे भाषण ऐकत आहेत त्यांनी माझ्या बेड्यांखेरीज इतर बाबतीत माझ्यासारखे व्हावे अशी देवाजवळ माझी प्रार्थना आहे.” त्यानंतर राजा, राज्यपाल, बर्णीका व त्यांच्याबरोबर जे बसले होते ते उठले आणि एकीकडे जाऊन आपापसात म्हणाले, “ह्या माणसाने मरणास किंवा तुरुंगवासास पात्र असे काही केले नाही.” अग्रिप्पाने फेस्तला म्हटले, “ह्या माणसाने कैसरजवळ न्याय मागितला नसता, तर त्याला सोडून देता आले असते.”
प्रेषितांचे कार्य 26 वाचा
ऐका प्रेषितांचे कार्य 26
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रेषितांचे कार्य 26:19-32
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ