2 थेस्सल 3
3
समारोप
1बंधुजनहो, आता इतकेच सांगणे आहे की, आमच्यासाठी प्रार्थना करत जा, ज्यामुळे तुमच्यामध्ये झाल्याप्रमाणे प्रभूच्या संदेशाचा त्वरेने प्रसार व्हावा व तो सन्मानाने स्वीकारला जावा. 2दुष्ट व वाईट माणसांपासून आमचे संरक्षण व्हावे; कारण सर्वांमध्ये विश्वास आहे, असे नाही.
3परंतु प्रभू विश्वसनीय आहे. तो तुम्हांला मजबूत करील व त्या दुष्टापासून तुमचे संरक्षण करील. 4तुमच्याविषयी प्रभूमध्ये आमचा असा भरवसा आहे की, आम्ही तुम्हांला आज्ञा देऊन जे सांगतो, ते तुम्ही करीत आहात व पुढेही करीत राहाल.
5देवाच्या प्रीतीची व ख्रिस्ताकडून मिळणाऱ्या सहनशीलतेची प्रभू तुम्हांला अधिक प्रगल्भ समज देवो.
6बंधुजनहो, आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हांला आज्ञा करतो की, आळशीपणाने वागणाऱ्या व आमच्यापासून प्राप्त झालेल्या परंपरेप्रमाणे न चालणाऱ्या प्रत्येक बंधूपासून तुम्ही दूर राहावे. 7आमचे अनुकरण कोणत्या प्रकारे केले पाहिजे, हे स्वतः तुम्हांला ठाऊक आहे. आम्ही तुमच्यामध्ये असताना आळशीपणाने वागलो नाही, 8कोणाचे अन्न फुकट खाल्ले नाही, तुमच्यापैकी कोणावरही भार घालू नये म्हणून आम्ही रात्रंदिवस श्रम व कष्ट करून काम केले. 9तसा आम्हांला अधिकार नाही असे नाही, पण आमचे अनुकरण करण्यासाठी आम्ही तुम्हांला कित्ता घालून द्यावा, म्हणून असे केले. 10आम्ही तुमच्याबरोबर होतो, तेव्हादेखील आम्ही तुम्हांला आज्ञा दिली होती की, जो काम करायला तयार नसतो, त्याने खाऊ नये.
11तुमच्यामध्ये कित्येक आळशीपणाने वागणारे असून ते मुळीच काम न करता लुडबूड करतात, असे ऐकतो, म्हणून आम्ही हे सांगत आहोत. 12अशा लोकांना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आज्ञा व बोध करतो की, त्यांनी व्यवस्थितपणे जीवन जगून आपली उपजीविका मिळविण्यासाठी काम करावे.
13बंधूंनो, तुम्ही मात्र सत्कृत्ये करताना थकून जाऊ नका. 14ह्या पत्रातील आमचा बोध जर कोणी मानत नसेल, तर तो मनुष्य लक्षात ठेवा आणि त्याला लाज वाटावी म्हणून त्याची संगत धरू नका, 15मात्र त्याला शत्रू मानू नका, तर त्याला बंधू मानून समज द्या.
16शांतीचा उगम असलेला प्रभू स्वतः सर्वकाळ सर्व प्रकारे तुम्हांला शांती देवो. प्रभू तुम्हां सर्वांबरोबर राहो.
17मी, पौलाने स्वहस्ते लिहिलेल्या शुभेच्छा, ही प्रत्येक पत्रात खूण आहे. मी अशा रीतीने लिहीत असतो.
18आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याची कृपा तुम्हां सर्वांबरोबर असो.
सध्या निवडलेले:
2 थेस्सल 3: MACLBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.