YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 करिंथ 9

9
1यहुदियामधील पवित्र जनांची सेवा करण्याविषयी मी तुम्हांला लिहावे ह्याचे अगत्य नाही; 2कारण मला तुमची उत्सुकता ठाऊक आहे. तिच्यावरून मासेदोनियातील लोकांजवळ मी तुमच्याविषयी अभिमानाने सांगत आहे की, एक वर्षापूर्वीच अखया प्रांताची तयारी झाली आहे आणि ह्या तुमच्या आवेशाने तेथील बहुतेकांना उत्तेजन मिळाले आहे. 3तरी ह्या बाबतीत तुमच्याविषयीचा आमचा अभिमान व्यर्थ होऊ नये म्हणून मी ह्या बांधवांना पाठवीत आहे, ते अशासाठी की, मी सांगितले तसे तुम्ही तयार असावे. 4नाहीतर कदाचित कोणी मासेदोनियाकर माझ्याबरोबर आले आणि तुम्ही तयार नाही, असे त्यांना दिसून आले, तर त्या भरवशाबाबत आम्हांला किती शरम वाटू लागेल! आणि तुमच्या फजितीविषयी तर काही बोलायलाच नको! 5म्हणून तुम्ही पूर्वी जी देणगी जाहीर केली होती, ती जमा करून तयार ठेवावी, म्हणून तुमच्याकडे माझ्या अगोदर येण्याची बंधुवर्गाजवळ विनंती करणे मला जरुरीचे वाटले. मी येईन तेव्हा तुमची देणगी तयार असेल आणि हे निदर्शनास येईल की, तुमच्यांवर सक्ती केली आहे म्हणून नव्हे तर स्वेच्छेने तुम्ही दान देत आहात.
दान कसे द्यावे?
6हे ध्यानात घ्या की, जो हात राखून पेरतो, तो त्याच मानाने कापणी करील आणि जो सढळ हाताने पेरतो, तो मोठ्या प्रमाणात कापणी करील. 7प्रत्येकाने आपापल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे, नाखुशीने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये, कारण आनंदाने देणारा देवाला आवडतो. 8सर्व प्रकारचे आशीर्वाद तुम्हांला भरपूर प्रमाणात देण्यास देव समर्थ आहे, ह्यासाठी की, तुम्हांला सर्व गोष्टींत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी तुमच्याजवळ सर्व काही विपुल असावे.
9तो चहूकडे वाटप करीत असतो,
गरजवंतांना सढळ हस्ते देत असतो,
त्याचे न्यायीपण युगानुयुगे अबाधित राहते,
असे धर्मशास्त्रात लिहिले आहे.
10जो पेरणाऱ्याला बी पुरवतो आणि खायला अन्न पुरवतो, तो तुम्हांला बी पुरवील व ते बहुगुणित करील आणि तुमच्या नीतिमत्त्वाचे पीक वाढवील. 11म्हणजे तुम्ही सर्व प्रकारच्या औदार्यासाठी सर्व गोष्टींनी संपन्न व्हाल, आमच्याद्वारे मिळणाऱ्या तुमच्या औदार्यामुळे पुष्कळ लोक देवाला धन्यवाद देतील. 12ही सेवा केल्याने पवित्र जनांच्या गरजा पुरविल्या जातात, केवळ इतकेच नव्हे, तर तिच्याद्वारे देवाचे अधिकाधिक आभार मानले जातात. 13ह्या तुमच्या सेवेमधून हे सिद्ध होते की, तुम्ही ख्रिस्ताचे शुभवर्तमान पतकरण्याच्या बाबतीत निष्ठा दाखविल्यामुळे आणि त्यांना व सर्वांना दान देण्याचे औदार्य दाखविल्यामुळे देवाचा गौरव होतो. 14तुमच्यावर देवाची अपार कृपा झाली आहे म्हणून ते तुमच्याकरिता मोठ्या आत्मीयतेने प्रार्थना करतात. 15देवाच्या अवर्णनीय दानाबद्दल आपण त्याला धन्यवाद देऊ या.

सध्या निवडलेले:

2 करिंथ 9: MACLBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन