1 तीमथ्य 4
4
खोटे शिक्षण देणाऱ्यांविषयी
1पवित्र आत्मा स्पष्ट म्हणतो की, पुढील काळी विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील. ते फूस लावणाऱ्या आत्म्यांच्या व भुतांच्या शिक्षणाच्या नादी लागतील. 2ज्यांची सदसद्विवेकबुद्धी तप्त लोखंडाने डाग देऊन मारून टाकल्यासारखी झाली आहे, असे लबाड लोक ही खोटी शिकवणूक पसरवतात. 3लग्न करावयाची ते मनाई करतील आणि विश्वास ठेवणारे व सत्य समजणारे ह्यांनी कृतज्ञतेने ज्याचा उपभोग घ्यावयाचा, असे देवाने निर्माण केलेले खाद्य वर्ज्य करावे, असे सांगतील. 4देवाने निर्माण केलेली प्रत्येक वस्तू चांगली आहे; काहीही वर्ज्य मानू नये मात्र सर्व गोष्टींचा कृतज्ञतेने स्वीकार करावा; 5कारण देवाचे वचन व प्रार्थना ह्यांनी ती पवित्र होते.
6ह्या गोष्टी बंधुवर्गापुढे मांडल्या तर विश्वासाच्या वचनांनी व ज्या सुशिक्षणाला तू अनुसरलास त्याच्या वचनांनी आध्यात्मिक पोषण करून घेणारा असा तू ख्रिस्त येशूचा चांगला सेवक होशील. 7परंतु अमंगळ दंतकथांपासून व आयाबायांच्या कहाण्यांपासून दूर राहा आणि भक्तीविषयी प्रयत्नशील राहा. 8शारीरिक कसरत काही प्रमाणात उपयोगी आहे. परंतु आध्यात्मिक साधना सर्व बाबतींत उपयोगी आहे; कारण ती आत्ताच्या व पुढच्याही जीवनाचे अभिवचन देत असते. 9हे वचन खातरीलायक व पूर्णपणे स्वीकारण्याजोगे आहे. 10आम्ही झगडतो व श्रम करतो; कारण जो सर्व माणसांचा व विशेषकरून विश्वास ठेवणाऱ्यांचा, तारणारा आहे, त्या जिवंत देवाची आम्ही वाट पाहत आहोत.
तीमथ्यचा व्यक्तिगत जीवनक्रम
11हे निर्देश त्यांना शिकव व त्यांनी पाळण्याचा आग्रह धर. 12कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ मानू नये, तर भाषण, वर्तन, प्रीती, विश्वास व शुद्धता ह्यांविषयी विश्वास ठेवणाऱ्यांचा आदर्श हो. 13मी येईपर्यत पवित्र शास्त्राचे सार्वजनिक वाचन, बोध व धर्मशिक्षण ह्यांच्याकडे लक्ष दे. 14तुझ्यावर वडीलजनांनी हात ठेऊन प्रार्थना केली, त्या वेळी संदेशाद्वारे मिळालेले असे जे कृपादान तुझ्यामध्ये आहे, त्याकडे दुर्लक्ष करू नकोस. 15तुझी प्रगती सर्वांना दिसून यावी म्हणून तू ह्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करून त्या अमलात आण. 16स्वतःकडे व आपण देत असलेल्या धर्मशिक्षणाकडे नीट लक्ष ठेव, त्यात टिकून राहा. असे केल्याने तू स्वतःचे व तुझे ऐकणाऱ्यांचे तारण साधशील.
सध्या निवडलेले:
1 तीमथ्य 4: MACLBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.