1 तीमथ्य 2
2
सार्वजनिक उपासनेबाबत सूचना
1सर्वांत प्रथम मी असे आवाहन करतो की, सर्व माणसांसाठी विनंत्या, प्रार्थना व मध्यस्थी करावी आणि आभार मानावेत. 2राजांकरिता व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकरिता प्रार्थना करावी, ह्यासाठी की, पूर्ण भक्तीने व सदाचाराने आपण स्वस्थपणाचे व शांतीचे आयुष्यक्रमण करावे. 3हे योग्य असून देव आपला तारणारा त्याला हे आवडते. 4त्याची अशी इच्छा आहे की, सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या ज्ञानाप्रत पोहचावे. 5कारण देव एक आहे आणि देव व मानव ह्यांमध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एक मध्यस्थ आहे. 6त्याने सर्वांसाठी मुक्तीचे मोल म्हणून स्वतःला अर्पण केले. परमेश्वराला सर्वांचे तारण हवे आहे, याचे हे योग्य समयी दाखविलेले प्रमाण आहे 7आणि ह्याकरिता मला संदेशहर व प्रेषित आणि यहुदीतरांसाठी श्रद्धा व सत्याच्या बाबतीत शिक्षक नेमण्यात आले होते.
8ख्रिस्तमंडळीमधल्या प्रत्येक उपासनेत पुरुषांनी राग व विवाद सोडून पवित्र हात वर करून प्रार्थना करावी अशी माझी इच्छा आहे.
9तसेच स्त्रियांनी सभ्यतेने व समंजसपणे उचित वेशभूषा करून भिडस्तपणाने व मर्यादेने स्वतःला अलंकृत करावे. विचित्र केशभूषा, सोने, मोती व अतिमौल्यवान वस्त्रे ह्यांनी नव्हे, 10तर धार्मिक म्हणवून घेणाऱ्या स्त्रियांस शोभते तसे सत्कृत्यांनी आपणास अलंकृत करावे. 11स्त्रियांनी शांतपणे व पूर्ण अधीनतेने शिकावे. 12स्त्रीला शिकविण्याची अथवा पुरुषावर अधिकार गाजविण्याची परवानगी मी देत नाही, तिने मौन बाळगून बसावे; 13कारण प्रथम आदामची निर्मिती झाली, नंतर हव्वेची 14आणि आदाम भुलविला गेला नाही, तर स्त्री भुलून अपराधात सापडली. 15तथापि विश्वास, प्रीती, पवित्रता व मर्यादा ह्यांत टिकून राहिल्यास बालकांना जन्म देण्यामुळे तिचे तारण होईल.
सध्या निवडलेले:
1 तीमथ्य 2: MACLBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.