1 करिंथ 4
4
प्रेषित देवाला जबाबदार
1आम्ही ख्रिस्ताचे सेवक व देवाच्या रहस्यांचे कारभारी आहोत, असे प्रत्येकाने आम्हांला मानावे. 2कारभारी म्हटला की, तो विश्वासू असला पाहिजे. 3आता तुमच्याकडून किंवा मानवी न्यायाधीशाकडून माझा न्यायनिवाडा व्हावा, ह्याचे मला महत्त्व वाटत नाही. मी स्वतःचादेखील न्यायनिवाडा करत नाही. 4माझी सदसद्विवेकबुद्धी शुद्ध असली, तरी तेवढ्यावरून मी निर्दोष ठरतो असे नाही. माझा न्यायनिवाडा करणारा प्रभू आहे. 5म्हणून उचित समयापूर्वी म्हणजे प्रभूच्या येण्यापूर्वी तुम्ही न्यायनिवाडा करू नका. तो अंधारातील गुप्त गोष्टी प्रकाशात आणील आणि अंतःकरणातील संकल्पही उघड करील आणि मग प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे देव त्याची प्रशंसा करील.
6बंधुजनहो, मी तुमच्याकरिता ह्या गोष्टी उदाहरणादाखल स्वतःला व अपुल्लोसला लागू केल्या आहेत. ह्यासाठी की, धर्मशास्त्रलेखापलीकडे कोणी जाऊ नये. हा धडा तुम्ही आमच्याकडून शिकावा, म्हणजे तुमच्यापैकी कोणीही एकाच्या तुलनेत दुसऱ्याचा अभिमान बाळगणार नाही. 7तुला इतरांपेक्षा श्रेष्ठ कोणी केले? जे तुला दिलेले नाही, असे तुझ्याजवळ काय आहे? तुला दिलेले असता, दिलेले नाही असा अहंकार तू का बाळगतोस?
8तुम्ही इतक्यातच तृप्त झाला आहात! इतक्यातच धनवान झाला आहात! आम्ही जरी राजे झालो नसलो, तरी तुम्ही मात्र राजे झाला आहात काय? तुम्ही राजे बनलाच असता, तर ठीक झाले असते; कारण मग आम्हीही तुमच्याबरोबर राजे बनलो असतो. 9मला वाटते, देवाने आम्हा प्रेषितांना सर्वात शेवटच्या स्थानी जणू काही मरणदंडासाठी पुढे केले आहे. कारण आम्ही जगाला, देवदूतांना व माणसांना, जाहीर प्रदर्शन असे झालो आहोत! 10आम्ही ख्रिस्ताकरिता मूर्ख, परंतु तुम्ही ख्रिस्तावरच्या निष्ठेत शहाणे, आम्ही अशक्त, परंतु तुम्ही ख्रिस्तावरच्या निष्ठेत सशक्त, आम्ही अप्रतिष्ठित परंतु तुम्ही प्रतिष्ठित असे आहात! 11ह्या घटकेपर्यंत आम्ही भुकेले, तान्हेले व उघडेवाघडे आहोत. आम्हांला मारहाण होते, आम्हांला घरदार नाही. 12आम्ही आपल्याच हातांनी काम करून थकतो. आम्हांला शाप दिले असता आम्ही आशीर्वाद देतो. आमचा छळहोत असता, आम्ही तो सहन करतो. 13आमची निंदा होत असता आम्ही शुभेच्छा देतो, आम्ही जगाचा केरकचरा, अगदी खालच्या थरातला गाळ असे आजपर्यंत झालो आहोत.
पितृतुल्य बोध व सूचना
14तुम्हांला लाजवण्यासाठी मी हे लिहीत नाही, तर माझ्या प्रिय मुलांप्रमाणे तुम्हांला बोध करण्यासाठी लिहितो; 15कारण तुम्हांला ख्रिस्तामध्ये दहा हजार प्रशिक्षक असले तरी पुष्कळ पालक नाहीत. मी तर तुम्हांला ख्रिस्त येशूवरील निष्ठेमुळे शुभवर्तमानाच्या योगाने जन्म दिला आहे. 16म्हणून मी तुम्हांला विनंती करतो की, तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा. 17ह्या कारणास्तव मी तीमथ्याला तुमच्याकडे पाठवत आहे. तो ख्रिस्ती जीवनामध्ये माझा प्रिय व विश्वासू पुत्र आहे. जसे मी सर्वत्र प्रत्येक ख्रिस्तमंडळींत शिकवितो, त्याप्रमाणे तो ख्रिस्तामध्ये माझ्या जीवनशैलीची तुम्हांला आठवण करून देईल.
18मी तुमच्याकडे येणार नाही, असे समजून कित्येक अहंकारी बनले आहेत. 19जर प्रभूची इच्छा असली, तर मी तुमच्याकडे लवकरच येईन. तेव्हा गर्विष्ठांच्या बोलण्याकडे पाहणार नाही, तर त्यांच्या सामर्थ्याकडे पाहीन; 20कारण देवाचे राज्य बोलण्यात नाही तर सामर्थ्यात आहे. 21तुमची काय इच्छा आहे? मी तुमच्याकडे काठी घेऊन यावे किंवा प्रीतीने व सौम्य वृत्तीने यावे?
सध्या निवडलेले:
1 करिंथ 4: MACLBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.