YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 करिंथ 2

2
तत्त्वज्ञान व प्रकटीकरण
1बंधुजनहो, मी तुमच्याकडे आलो, तो वक्‍तृत्वाच्या अथवा ज्ञानाच्या श्रेष्ठतेने देवाचे रहस्य तुम्हांला घोषित करण्यास आलो नाही; 2कारण येशू ख्रिस्त म्हणजे क्रुसावर चढवलेला येशू ख्रिस्त, ह्याच्याशिवाय मी तुमच्याबरोबर असताना दुसरे काहीही जमेस धरू नये, असा मी ठाम निश्चय केला होता 3आणि मी तुमच्याकडे अशक्त, भयभीत व अतिकंपित अवस्थेत आलो. 4-5तुमचा विश्वास मनुष्याच्या बुद्धिमत्तेवर नव्हे तर देवाच्या सामर्थ्यावर आधारित असावा म्हणून माझे भाषण व माझी घोषणा ही ज्ञानयुक्त अशा मन वळवणाऱ्या शब्दांची नव्हती तर पवित्र आत्मा व सामर्थ्य ह्यांची निदर्शक होती.
6तथापि तुमच्यात जे अधिक ज्ञानी आहेत, त्यांना मी ज्ञान सांगतो, पण ते ज्ञान ह्या युगाचे किंवा ह्या युगाचे नष्ट होणारे जे अधिपती त्यांचेही नव्हे, 7तर देवाचे गूढ व गुप्त ठेवलेले ज्ञान आम्ही सांगतो, जे देवाने युगांच्या पूर्वी तुमच्याआमच्या वैभवाकरिता नेमले होते. 8ते ह्या युगातल्या अधिपतींतील कोणालाही कळले नव्हते; कारण त्यांना ते कळले असते, तर त्यांनी गौरवशाली प्रभूला क्रुसावर चढवले नसते. 9धर्मशास्त्रात असे लिहिले आहे,
डोळ्यांनी जे पाहिले नाही,
कानांनी जे ऐकले नाही
व मानवी अंत:करणाला जे भिडले नाही,
ते देवाने त्याच्यावर प्रीती करणाऱ्यांसाठी सिद्ध केले आहे,
10परंतु देवाने ते पवित्र आत्म्याद्वारे आपल्यासाठी प्रकट केले, कारण पवित्र आत्मा हा सर्व गोष्टींचा व देवाच्या गहन हेतूंचा शोध घेतो. 11माणसाच्या अंतर्यामी वसणाऱ्या त्याच्या स्वतःच्या आत्म्यावाचून मनुष्याच्या गोष्टी ओळखणारा मनुष्यांमध्ये कोण आहे? तसा देवाच्या गोष्टी ओळखणारा देवाच्या आत्म्याशिवाय कोणी नाही. 12आपल्याला जगाचा आत्मा नव्हे, तर देवापासून निघणारा आत्मा मिळाला आहे, ह्यासाठी की, जे देवाने आपल्याला कृपेने दिले, ते आपण ओळखून घ्यावे.
13तर मग आम्ही मानवी ज्ञानाने शिकवलेल्या शब्दांनी नव्हे तर पवित्र आत्म्याने शिकवलेल्या शब्दांनी, आध्यात्मिक गोष्टींबरोबर आध्यात्मिक गोष्टींची संगती लावून सांगतो. 14जो आध्यात्मिक नाही तो देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारीत नाही, कारण त्या त्याला मूर्खपणाच्या वाटतात आणि त्या त्याला समजू शकत नाहीत; कारण त्यांची पारख आध्यात्मिक दृष्टीने होते. 15जो आध्यात्मिक आहे, तो सर्व गोष्टी पारखतो, तरी त्याची स्वतःची पारख कोणाकडूनही होत नाही. 16धर्मशास्त्रात म्हटल्याप्रमाणे, ‘प्रभूचे मन कोणी ओळखले आहे की, त्याने त्याला शिकवावे?’ परंतु आपल्याला तर ख्रिस्ताची मनोवृत्ती लाभली आहे.

सध्या निवडलेले:

1 करिंथ 2: MACLBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन