YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 करिंथ 11:2-34

1 करिंथ 11:2-34 MACLBSI

तुम्ही सर्व गोष्टींत माझी आठवण करता आणि मी तुम्हांला दिलेली शिकवण तुम्ही दृढ धरून पाळता, ह्याबद्दल मी तुमची प्रशंसा करतो. प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे. स्त्रीचे मस्तक पुरुष आहे आणि ख्रिस्ताचे मस्तक देव आहे, हे तुम्हांला समजावे असी माझी इच्छा आहे. जो पुरुष आपले मस्तक आच्छादून प्रार्थना करतो किंवा संदेश देतो, तो आपल्या मस्तकाचा म्हणजे ख्रिस्ताचा अपमान करतो. तसेच जी स्त्री उघड्या मस्तकाने प्रार्थना करते किंवा संदेश देते, ती आपल्या मस्तकाचा म्हणजे आपल्या पुरुषाचा अपमान करते; कारण ती मुंडण केलेल्या स्त्रीसारखीच होते. स्त्री जर आपले मस्तक आच्छादीत नाही तर तिने आपले केस कातरून घ्यावे, परंतु जर तिला मुंडण करणे लाजिरवाणे वाटते तर तिने आपले मस्तक आच्छादावे. पुरुष म्हणजे देवाची प्रतिमा व वैभव असल्यामुळे त्याला मस्तक आच्छादन करण्याची आवश्यकता नाही. परंतु स्त्री ही पुरुषाचे वैभव आहे. कारण पुरुष स्त्रीपासून निर्माण झाला नाही, तर स्त्री पुरुषापासून झाली. तसेच पुरुष स्त्रीसाठी निर्माण झाला नाही, तर स्त्री पुरुषासाठी निर्माण झाली. ह्या कारणामुळे स्त्रीने आपल्यावर असलेल्या अधिकाराचे चिन्ह म्हणून देवदूतांकरता मस्तकावर आच्छादन धारण करावे. मात्र प्रभूबरोबरच्या आपल्या जीवनात स्त्रीपुरुष परस्परांवर अवलंबून आहेत. कारण जशी स्त्री पुरुषापासून, तसा पुरुष स्त्रीपासून आहे आणि सर्व काही देवाकडून आहे. तुमचे तुम्हीच ठरवा. मस्तकावर आच्छादन घेतल्यावाचून सार्वजनिक उपासनेत देवाची प्रार्थना करणे स्त्रीला शोभते काय? लांब केस राखणे ही पुरुषाला लाजिरवाणी गोष्ट आहे, हे निसर्गदेखील तुम्हांला सांगत नाही काय? स्त्रीने लांब केस राखणे हे तर तिला भूषणावह आहे. कारण केस तिला आच्छादनाकरता दिले आहेत. मात्र जर कोणी वितंडवादी असला तर माझे एवढेच म्हणणे आहे की, आपल्यात आणि देवाच्या ख्रिस्तमंडळ्यांतही दुसरी कोणतीही रीत नाही. आता पुढील आदेश देत असताना मी तुमची वाहवा करीत नाही. प्रार्थनासभेत तुमच्या एकत्र येण्याने तुमचे बरे न होता वाईट होते; कारण पहिल्या प्रथम तुम्ही ख्रिस्तमंडळी ह्या नात्याने एकत्र जमता, तेव्हा तुमच्यामध्ये दुही आहे असे मी ऐकतो व ते काही अंशी खरे मानतो. तुमच्यामध्ये दुही असावी कारण त्या दुहीमुळे खरे कोण आहेत हे उघड होईल. ह्यामुळे जेव्हा तुम्ही एकत्र जमता, तेव्हा तुम्ही प्रभुभोजनासाठी येत नाही. कारण भोजनाच्या वेळी प्रत्येक जण आपले घरचे जेवण इतरांपूर्वी जेवतो. एक भुकेला राहतो तर दुसरा पिऊन मस्त होतो. खाणेपिणे करण्यास तुम्हांला आपापली घरे नाहीत काय? किंवा तुम्ही देवाच्या ख्रिस्तमंडळीला धिक्कारून ज्यांच्याजवळ काही नाही त्यांना लाजवता? याविषयी मी तुम्हांला काय म्हणावे, अशी तुमची अपेक्षा आहे? ह्याबद्दल मी तुमची वाहवा करू काय? नाही. मी तुमची वाहवा करीत नाही! जे मला प्रभूकडून मिळाले, तेच मी तुम्हांला सांगितले आहे, ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले, त्या रात्री त्याने भाकर घेतली. आभार मानून ती मोडली, आणि म्हटले, “हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा”. त्याचप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन म्हटले, “हा प्याला म्हणजे माझ्या रक्ताने प्रस्थापित झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा.” म्हणजेच जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. म्हणून जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पिईल तो प्रभूचे शरीर व रक्त ह्यासंबंधाने दोषी ठरेल. म्हणून माणसाने प्रथम आत्मपरीक्षण करावे आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे; कारण प्रभूच्या शरीराचे मर्म ओळखल्याशिवाय जो खातो व पितो तो खाण्याने व पिण्याने आपणावर दंड ओढवून घेतो. तुमच्यामध्ये पुष्कळ जण दुर्बल व आजारी आहेत आणि बरेच निधन पावले त्याचे कारण हेच. आपण प्रथम आत्मपरीक्षण केले तर न्यायाचा प्रसंग आपल्यावर ओढवणार नाही. परंतु प्रभू जेव्हा आपला न्याय करतो तेव्हा आपल्याला शिस्त लावली जाते आणि त्यामुळे जगाबरोबर आपल्याला दोषी ठरविण्यात येत नाही. तर मग माझ्या बंधूंनो, तुम्ही प्रभुभोजनास एकत्र जमता तेव्हा एकमेकांसाठी थांबा आणि कोणी भुकेला असला, तर त्याने घरी खावे, म्हणजे तुमचे एकत्र जमणे दंडास कारण होऊ नये. बाकीच्या गोष्टींची व्यवस्था मी आल्यावर लावून देईन.