YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोम. 3:9-24

रोम. 3:9-24 IRVMAR

मग काय? आपण यहूदी अधिक चांगले आहोत काय? मुळीच नाही, कारण सगळे यहूदी व ग्रीक पापाखाली आहेत, असा आधीच आम्ही त्यांच्यावर आरोप केला आहे. पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘नीतिमान कोणी नाही, एकही नाही. ज्याला समजते असा कोणी नाही, जो झटून देवाचा शोध करतो असा कोणी नाही, ते सगळे बहकले आहेत, ते सगळे निरुपयोगी झाले आहेत; सत्कर्म करणारा कोणी नाही, एकही नाही. त्यांचा घसा एक उघडलेले थडगे आहे. ते आपल्या जीभांनी कपट योजतात, त्यांच्या ओठांखाली सर्पाचे विष असते. त्यांचे तोंड शापाने व कडूपणाने भरले आहे; त्यांचे पाय रक्त पाडण्यास उतावळे आहेत. विध्वंस व विपत्ती त्यांच्या मार्गात आहेत. शांतीचा मार्ग त्यांनी ओळखला नाही. त्यांच्या डोळ्यांपुढे देवाचे भय नाही.’ आता आपण हे जाणतो की नियमशास्त्र जे काही सांगते ते नियमशास्त्राधीन असलेल्यांस सांगते म्हणजे प्रत्येक तोंड बंद केले जावे आणि सर्व जग देवासमोर अपराधी म्हणून यावे. कारण देवाच्या दृष्टीपुढे नियमशास्त्राच्या कृतींकडून कोणीही मनुष्य नीतिमान ठरणार नाही, कारण नियमशास्त्राकडून पापाचे ज्ञान होते. पण नियमशास्त्राकडून व संदेष्ट्यांकडून साक्ष दिली गेल्याप्रमाणे, नियमशास्त्राशिवाय देवाचे नीतिमत्त्व, आता, प्रकट झाले आहे. पण हे देवाचे नीतिमत्त्व येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे, विश्वास ठेवणार्‍या सर्वांसाठी आहे कारण तेथे कसलाही फरक नाही. कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला अंतरले आहेत; देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामुल्य नीतिमान ठरतात.