YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 12:1-12

मार्क 12:1-12 IRVMAR

येशू त्यांना दाखले सांगून शिकवू लागला, “एका मनुष्याने द्राक्षाचा मळा लावला व त्याच्याभोवती कुंपण घातले. त्याने द्राक्षरसासाठी कुंड खणले आणि टेहळणीसाठी माळा बांधला. त्याने तो शेतकऱ्यास खंडाने दिला व तो दूर प्रवासास गेला. हंगामाच्या योग्यवेळी शेतकऱ्याकडून द्राक्षमळ्यातील फळांचा योग्य हिस्सा मिळावा म्हणून त्याने एका नोकरास पाठवले. परंतु त्यांनी नोकरास धरले, मारले आणि रिकामे पाठवून दिले. नंतर त्याने दुसऱ्या नोकरास पाठवले. त्यांनी त्याचे डोके फोडले आणि त्यास अपमानकारक रीतीने वागविले. मग धन्याने आणखी एका नोकराला पाठवले. त्यांनी त्यास जिवे मारले. त्याने इतर अनेकांना पाठवले. शेतकऱ्यांनी काहींना मारहाण केली तर काहींना ठार मारले. धन्याजवळ पाठवण्यासाठी आता फक्त त्याचा प्रिय मुलगा उरला होता. तो म्हणाला, खात्रीने ते माझ्या मुलाला मान देतील. तो त्याचा आवडता मुलगा होता म्हणून शेवटी त्याने त्यास त्या शेतकऱ्यांकडे पाठवले. परंतु ते शेतकरी एकमेकांस म्हणाले, हा तर वारीस आहे. चला, आपण याला जिवे मारू म्हणजे वतन आपलेच होईल! मग त्यांनी त्यास धरले, जिवे मारले आणि द्राक्षमळ्याबाहेर फेकून दिले. तर मग द्राक्षमळ्याचा धनी काय करील? तो येईल आणि शेतकऱ्यांना जिवे मारील व द्राक्षमळा दुसऱ्यांना देईल. तुम्ही हा शास्त्रलेख वाचला नाही काय? जो दगड बांधणाऱ्यांनी नाकारला तो कोनशिला झाला. हे परमेश्वराकडून झाले, आणि ते आमच्या दृष्टीने आश्चर्यकारक कृत्य आहे.” मग ते येशूला अटक करण्याचा मार्ग शोधू लागले. परंतु त्यांना लोकांची भीती वाटत होती. त्यास अटक करण्याची त्यांची इच्छा होती कारण त्यांना माहीत होते की, हा दाखला त्याने त्यांनाच उद्देशून सांगितला होता. मग ते त्यास सोडून निघून गेले.