YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्त. 10:26-42

मत्त. 10:26-42 IRVMAR

म्हणून त्यांना भिऊ नका, कारण उघडे होणार नाही असे काही झाकलेले नाही आणि कळणार नाही असे काही गुप्त नाही. जे मी तुम्हास अंधारात सांगतो ते तुम्ही प्रकाशात बोला आणि कानात सांगितलेले जे तुम्ही ऐकता ते तुम्ही छतावरून गाजवा. जे शरीराला वधतात पण आत्म्याचा वध करू शकत नाहीत त्यांना भिऊ नका, तर त्यापेक्षा आत्म्याला व शरीराला जो मारू शकतो व नरकात टाकू शकतो त्यास भ्या. दोन चिमण्या एका नाण्याला विकत नाहीत काय? तरीही तुमच्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेशिवाय त्यातील एकही जमिनीवर पडणार नाही. आणि तुमच्या डोक्यावरचे केससुद्धा त्याने मोजलेले आहेत. म्हणून घाबरु नका. पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुम्ही अधिक मौल्यवान आहात. जो कोणी मनुष्यांसमोर मला स्वीकारील त्यास मीसुद्धा माझ्या स्वर्गातील पित्यासमोर स्वीकारीन. पण जो कोणी मनुष्यांसमोर मला नाकारील त्यास मीसुद्धा माझ्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारीन. असे समजू नका की मी पृथ्वीवर शांतता प्रस्थापित करायला आलो आहे. मी शांतता स्थापित करायला आलो नाही तर तलवार चालवायला आलो आहे. मी फूट पाडायला आलो आहे, म्हणजे मुलाला त्याच्या पित्याविरुद्ध आणि मुलीला तिच्या आईविरुद्ध, सुनेला तिच्या सासूविरुद्ध उभे करायला आलो आहे. सारांश, मनुष्याच्या घरचीच माणसे त्याचे शत्रू होतील. जो माझ्यापेक्षा स्वतःच्या पित्यावर किंवा आईवर अधिक प्रीती करतो, तो मला योग्य नाही. जो माझ्यापेक्षा आपल्या मुलावर, मुलीवर अधिक प्रीती करतो, तो मला योग्य नाही. जो आपला वधस्तंभ घेऊन माझ्यामागे येण्याचे नाकारतो, तो मला योग्य नाही. जो आपला जीव मिळवतो तो त्यास गमवील पण जो माझ्याकरिता आपला जीव गमावतो तो त्यास मिळवील. जी व्यक्ती तुम्हास स्वीकारते ती व्यक्ती मला स्वीकारते आणि ज्या पित्याने मला पाठवले त्यालाही स्वीकारते. जो कोणी संदेष्ट्यांचा स्वीकार त्याच्या संदेशाच्या सेवेमुळे करतो, त्यास संदेष्ट्याचे प्रतिफळ मिळेल आणि नीतिमानाला नीतिमान म्हणून जो स्वीकारतो त्यास नीतिमानाचे प्रतिफळ मिळेल. मी तुम्हास खरे सांगतो की, या लहानातील एकाला शिष्य म्हणून जो कोणी प्यालाभर थंड पाणी प्यायला देईल तोही आपल्या प्रतिफळाला मुळीच मुकणार नाही.