YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 4:1-14

लूक 4:1-14 IRVMAR

येशू पवित्र आत्म्याने पूर्ण भरून यार्देन नदीहून परतला. मग आत्म्याने त्यास अरण्यात नेले. तेथे सैतानाने त्याची चाळीस दिवस परीक्षा घेतली. त्या दिवसात येशूने काहीही खाल्ले नाही आणि ती वेळ संपल्यानंतर येशूला भूक लागली. तेव्हा सैतान त्यास म्हणाला, जर तू देवाचा पुत्र आहेस तर या दगडाची भाकर हो, अशी आज्ञा कर. येशूने त्यास उत्तर दिले, “पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, मनुष्य फक्त भाकरीनेच जगेल असे नाही.” मग सैतान त्यास उंच जागेवर घेऊन गेला आणि एका क्षणांत जगातील सर्व राज्ये त्यास दाखविली. सैतान त्यास म्हणाला, “मी तुला या सर्व राज्याचे अधिकार व वैभव देईन कारण ते मला दिलेले आहे आणि मी माझ्या मर्जीनुसार ते देऊ शकतो. म्हणून जर तू मला नमन करशील आणि माझी उपासना करशील तर हे सर्व तुझे होईल.” येशूने उत्तर दिले, “पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे. प्रभू तुझा देव याचीच उपासना कर आणि केवळ त्याचीच सेवा कर.” नंतर सैतानाने येशूला यरूशलेम शहरास नेले आणि परमेश्वराच्या भवनाच्या टोकावर त्यास उभे केले आणि तो त्यास म्हणाला, “जर तू देवाचा पुत्र आहेस तर येथून खाली उडी मार! शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘तुझे रक्षण करण्यास तो आपल्या दूतास तुझ्याविषयी आज्ञा करील, आणि तुझा पाय दगडावर आपटू नये म्हणून ते तुला आपल्या हातावर झेलून धरतील.’” येशूने उत्तर दिले, “पवित्र शास्त्रात असेही म्हणले आहे; तुझा देव परमेश्वर याची परीक्षा पाहू नकोस.” म्हणून सैतानाने प्रत्येक प्रकारे परीक्षा घेण्याचे संपविल्यावर योग्य वेळ येईपर्यंत तो येशूला सोडून गेला. मग पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने येशू गालील प्रांतास परतला आणि त्याच्याविषयीची बातमी सगळीकडे पसरली.

लूक 4 वाचा

ऐका लूक 4