YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहा. 13

13
येशू शिष्यांचे पाय धुतो
1आता, वल्हांडण सणाअगोदर असे झाले की, येशूने आता या जगांतून पित्याकडे निघून जाण्याची वेळ आली आहे, हे जाणून, या जगातील स्वकीयांवर त्याची जी प्रीती होती, ती त्याने शेवटपर्यंत केली. 2शिमोनाचा पुत्र यहूदा इस्कार्योत याच्या मनात येशूला विश्वासघाताने शत्रूच्या हाती द्यावे असे सैतानाने आधीच घातले होते. 3येशू जाणत होता की, पित्याने त्याच्या हातात सर्व दिले होते आणि तो देवाकडून आला होता व देवाकडे जात होता; 4येशू भोजनावरून उठला, त्याने आपली बाह्यवस्त्रे एकीकडे ठेवली आणि एक कापड घेऊन आपल्या कमरेला बांधला. 5त्यानंतर येशू एका गंगाळात पाणी ओतून आणि तो शिष्यांचे पाय धुऊ लागला व कमरेला बांधलेल्या कापडाने पुसू लागला. 6मग तो शिमोन पेत्राकडे आला, तेव्हा तो त्यास म्हणाला, “प्रभूजी, आपण माझे पाय धुता काय?” 7येशूने त्यास उत्तर दिले, “मी काय करतो ते तुला आता कळत नाही, पण ते तुला पुढे कळेल.” 8पेत्र त्यास म्हणाला, “तुम्हास माझे पाय कधीही धुवावयाचे नाहीत.” येशूने त्यास उत्तर दिले, “मी तुला धुतले नाही, तर तुला माझ्याबरोबर वाटा नाही.” 9शिमोन पेत्र त्यास म्हणाला, “प्रभूजी, माझे केवळ पायच धुऊ नका, तर हात आणि डोकेही धुवा.” 10येशूने त्यास म्हटले, “ज्याचे स्नान झाले आहे त्यास पायांशिवाय दुसरे काही धुवायची गरज नाही, तर तो सर्वांगी शुद्ध आहे; तुम्ही शुद्ध आहा, पण सगळे जण नाही.” 11कारण आपणाला विश्वासघाताने शत्रूच्या हाती कोण धरून देणार आहे हे त्यास ठाऊक होते, म्हणून तो म्हणाला, “तुम्ही सगळे जण शुद्ध नाही.”
12मग त्याने त्यांचे पाय धुतल्यावर आपली बाह्यवस्त्रे घालून व तो पुन्हा खाली बसल्यावर त्यांना म्हणाला, “मी तुम्हास काय केले ते तुम्हास समजले काय? 13तुम्ही मला ‘गुरू’ आणि ‘प्रभू’ म्हणता आणि ते ठीक म्हणता, कारण मी तसाच आहे. 14मग मी जर तुमचा प्रभू आणि गुरू असता तुमचे पाय धुतले तर तुम्हीपण एकमेकांचे पाय धुवावेत. 15कारण मी तुम्हास केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हास उदाहरण दिले आहे. 16मी तुम्हास खरे खरे सांगतो, दास आपल्या धन्यापेक्षा मोठा नाही; आणि पाठवलेला पाठवणाऱ्यापेक्षा मोठा नाही. 17या गोष्टी तुम्हास समजतात तर त्याप्रमाणे वागल्याने तर तुम्ही धन्य आहात. 18मी तुमच्यातील सर्वांविषयी बोलत नाही. मी ज्यांना निवडले आहे त्यांना मी ओळखतो. तरी, ‘ज्याने माझी भाकर खाल्ली त्यानेच माझ्याविरुद्ध आपली टाच उचलली,’ हा शास्त्रलेख पूर्ण झाला पाहिजे. 19आतापासून हे होण्याच्या आधीच मी हे तुम्हास सांगून ठेवतो, यासाठी की जेव्हा हे होईल, तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा की, मी तो आहे. 20मी तुम्हास खरे खरे सांगतो की, मी ज्याला पाठवतो त्याचा जो स्वीकार करतो तो माझा स्वीकार करतो आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठवले त्यास स्वीकारतो.”
21असे बोलल्यावर येशू आत्म्यात अस्वस्थ झाला आणि साक्ष देऊन म्हणाला, “मी तुम्हास खरे खरे सांगतो, तुमच्यांतला एकजण मला विश्वासघात करून शत्रूच्या हाती धरून देईल.” 22तो कोणाविषयी बोलतो या संशयाने शिष्य एकमेकांकडे पाहू लागले. 23तेव्हा ज्याच्यावर येशूची प्रीती होती असा त्याच्या शिष्यांतील एकजण येशूच्या उराशी टेकलेला होता. 24म्हणून ज्याच्याविषयी तो बोलतो तो कोण आहे हे आम्हास सांग, असे शिमोन पेत्राने त्यास खुणावून म्हटले. 25तेव्हा तो तसाच येशूच्या उराशी टेकलेला असता त्यास म्हणाला, “प्रभूजी, तो कोण आहे?” 26येशूने उत्तर दिले, “मी ज्याला हा घास ताटात बुचकळून देईन, तोच तो आहे.” आणि त्याने तो घास ताटात बुचकळून, तो शिमोनाचा पुत्र यहूदा इस्कार्योत याला दिला. 27आणि घास दिल्याबरोबर सैतान त्यांच्यामध्ये शिरला. मग येशूने त्यास म्हटले, “तुला जे करावयाचे आहे ते लवकर करून टाक.” 28पण त्याने त्यास असे कशासाठी सांगितले हे भोजनास बसलेल्यातील कोणालाही समजले नाही. 29कारण यहूदाजवळ डबी होती म्हणून सणासाठी आपणांस गरज आहे ते विकत घ्यावे किंवा गरिबांस काहीतरी द्यावे असे येशू सांगतो आहे, असे कित्येकांस वाटले. 30मग घास घेतल्यावर तो लगेच बाहेर गेला; त्यावेळी रात्र होती.
31तो बाहेर गेल्यावर येशू म्हणाला, “आता मनुष्याच्या पुत्राचे गौरव झाले आहे आणि त्याच्याठायी देवाचे गौरव झाले आहे; 32देव आपल्याठायी त्याचे गौरव करील. तो त्याचे लवकर गौरव करील. 33मुलांनो, मी अजून थोडा वेळ तुमच्याबरोबर आहे; तुम्ही माझा शोध कराल; आणि मी यहूदी अधिकाऱ्यांना सांगितले की, ‘मी जाईन तिकडे तुम्हास येता येणार नाही.’ तसे तुम्हासही आता सांगतो. 34मी एक नवी आज्ञा तुम्हास देतो; तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी. 35तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे यावरुन सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहात.”
36शिमोन पेत्र त्यास म्हणाला, “प्रभूजी, आपण कोठे जाता?” येशूने त्यास उत्तर दिले, “मी जाईन तिकडे, आता, तुला माझ्यामागे येता येणार नाही; पण नंतर तू येशील.” 37पेत्र त्यास म्हणाला, “प्रभूजी, मला आपल्यामागे आताच का येता येणार नाही? मी आपल्यासाठी माझा जीव देईन.” 38येशूने त्यास उत्तर दिले, “माझ्यासाठी तू आपला जीव देशील काय? मी तुला खरे खरे सांगतों, तू मला तीनदा नाकारशील तोपर्यंत कोंबडा आरवणार नाही.”

सध्या निवडलेले:

योहा. 13: IRVMar

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन

योहा. 13 साठी चलचित्र