आणि असे झाले की, त्याच रात्री परमेश्वराने त्यास सांगितले की, “तू आपल्या पित्याचा गोऱ्हा घे आणि सात वर्षांचा दुसरा गोऱ्हा घे आणि आपल्या बापाची बआल देवासाठीची वेदी ती मोडून टाक आणि तिच्याजवळची अशेरा कापून टाक. मग या खडकाच्या उच्चस्थानी आपला देव परमेश्वर याच्यासाठी वेदी बांध आणि योग्य मार्गाने बांधणी कर. त्या दुसऱ्या गोऱ्ह्याचे होमार्पण, अशेराच्या तोडलेल्या लाकडाचा उपयोग करून कर.” तेव्हा गिदोनाने आपल्या चाकरातील दहा माणसे बरोबर घेऊन जसे परमेश्वराने त्यास सांगितले होते तसे केले; परंतु असे झाले की, दिवस असता ते करायला तो आपल्या वडिलाच्या घराण्याला व त्या नगराच्या मनुष्यांना घाबरला, यास्तव रात्री त्याने केले. मग सकाळी त्या नगराची माणसे उठली तर पाहा, बआलाची वेदी मोडलेली होती तिच्याजवळची अशेराही तोडलेली होते आणि बांधलेल्या वेदीवर दुसऱ्या गोऱ्ह्याचा होम केलेला होता. तेव्हा ते एकमेकांना म्हणाले, “ही गोष्ट कोणी केली? मग त्यांनी विचारपूस व शोध केल्यावर म्हटले, योवाशाचा पुत्र गिदोन, याने ही गोष्ट केली आहे.” नंतर त्या नगराच्या मनुष्यांनी योवाशाला सांगितले, “तू आपल्या पुत्राला बाहेर आण, त्यास तर मारावयाचे आहे, कारण त्याने बआलाची वेदी मोडून टाकली आणखी तिच्याजवळची अशेराची मूर्ती तोडून टाकली आहे.” तेव्हा योवाश आपणावर जे उठले होते त्या सर्वांना म्हणाला, “बआलाचा कैवार तुम्ही घेता काय? तुम्ही त्याचा बचाव करू पाहता काय? जो त्याचा कैवार घेईल तो आज सकाळ आहे तोच मारला जावो; जर तो देव असला तर, ज्याने त्याची वेदी मोडली त्याच्याविरुध्द त्याने स्वत:चा कैवार घ्यावा.” तेव्हा त्याच दिवशी त्याने त्यास “यरूब्बाल” म्हटले, तो म्हणाला, “गिदोनाने बआलाची वेदी पाडून टाकली म्हणून बआलानेच त्याच्याविरुध्द स्वतःचा बचाव करावा,” कारण त्याची वेदी गिदोनाने मोडून वेगळी केली. नंतर सर्व मिद्यानी व अमालेकी व पूर्वेकडले लोक एकत्र जमले, आणि त्यांनी यार्देन नदी ओलांडून येऊन आणि इज्रेलाच्या खोऱ्यात तळ दिला. परंतु परमेश्वराचा आत्मा गिदोनावर त्यास मदत करण्यासाठी आला; गिदोनाने कर्णा फुंकला, तेव्हा अबीयेजेराचे वंशज त्याच्याजवळ अशाप्रकारे त्याच्यामागे जाण्यासाठी एकत्र आले. मग त्याने सगळ्या मनश्शेत जासूद पाठवले तेव्हा तेही त्याच्याजवळ एकत्र झाले; नंतर आशेर व जबुलून व नफतालीत त्याने जासूद पाठवले, तेव्हा ते त्यांच्याशी मिळायला चढून गेले. मग गिदोन देवाला बोलला, “जसे मला सांगितले तसा जर तू माझ्या हाताने इस्राएलांना तारणार असलास; तर पाहा, मी खळ्यात कातरलेली लोकर ठेवतो; जर लोकरीवर मात्र दहिवर पडेल आणि सर्व भूमी कोरडी राहील, तर मला कळेल की जसे मला सांगितले, तसा तू माझ्या हाताने इस्राएलाला तारशील.” नंतर तसे झाले; म्हणजे सकाळी जेव्हा तो उठला, तेव्हा त्याने ती लोकर दाबून तिच्यातून पिळून वाटीभर पाणी काढले. मग गिदोन देवाला बोलला, “तू माझ्यावर रागावू नको, मी आणखी एक वेळेस बोलतो; आता केवळ या वेळेस या लोकरीच्या व्दारे एक वेळ मी परीक्षा पाहतो: ही लोकर तेवढी कोरडी राहून बाकी अवघ्या जमिनीवर दहिवर पडेल असे कर.” तेव्हा त्या रात्री देवाने तसे केले म्हणजे ती लोकर मात्र कोरडी राहिली आणि संपूर्ण भूमीवर दहिवर पडले.