गिदोन त्यास बोलला, “तुझी कृपादृष्टी माझ्यावर असली तर तूच माझ्याशी बोलत आहेस याविषयी मला काही चिन्ह दाखव. मी तुला विनंती करतो, मी तुझ्याकडे येईपर्यंत तू येथून जाऊ नको; म्हणजे मी आपली भेट आणून तुझ्यापुढे ठेवीन.” तेव्हा तो बोलला, “तू परत येईपर्यंत मी येथेच थांबतो.” गिदोनाने जाऊन एक करडू व एफाभर सपिठाच्या बेखमीर भाकरी तयार केल्या; त्याने मांस टोपलीत घातला आणि रस्सा पातेल्यात घातला, मग त्याच्याजवळ एला झाडाखाली नेऊन ते सादर केले. तेव्हा देवाच्या दूताने त्यास सांगितले, “तू मांस व बेखमीर भाकरी या खडकावर आणून ठेव, आणि त्यावर रस्सा ओत.” मग गिदोनाने तसे केले. तेव्हा परमेश्वराच्या दूताने आपल्या हातातल्या काठीच्या टोकाने मांसास व बेखमीर भाकरीला स्पर्श केला; मग खडकातून अग्नी निघाला आणि त्याने ते मांस व बेखमीर भाकरी भस्म केल्या; परमेश्वराचा दूतही निघून गेला आणि यापुढे गिदोन त्यास पाहू शकला नाही. तेव्हा गिदोनाला समजले की तो परमेश्वराचा दूत होता; गिदोन म्हणाला, हाय हाय, “हे प्रभू देवा! कारण मी परमेश्वराचा दूत समोरासमोर, पाहिला आहे!” परमेश्वर त्यास म्हणाला, “तुला शांती असो! भिऊ नको, तू मरणार नाहीस.” तेव्हा गिदोनाने तेथे परमेश्वरासाठी वेदी बांधली, त्याचे नाव परमेश्वर शांती आहे, असे ठेवले; ती आजपर्यंत अबियेजेऱ्यांच्या अफ्रा येथे अजून आहे. आणि असे झाले की, त्याच रात्री परमेश्वराने त्यास सांगितले की, “तू आपल्या पित्याचा गोऱ्हा घे आणि सात वर्षांचा दुसरा गोऱ्हा घे आणि आपल्या बापाची बआल देवासाठीची वेदी ती मोडून टाक आणि तिच्याजवळची अशेरा कापून टाक. मग या खडकाच्या उच्चस्थानी आपला देव परमेश्वर याच्यासाठी वेदी बांध आणि योग्य मार्गाने बांधणी कर. त्या दुसऱ्या गोऱ्ह्याचे होमार्पण, अशेराच्या तोडलेल्या लाकडाचा उपयोग करून कर.” तेव्हा गिदोनाने आपल्या चाकरातील दहा माणसे बरोबर घेऊन जसे परमेश्वराने त्यास सांगितले होते तसे केले; परंतु असे झाले की, दिवस असता ते करायला तो आपल्या वडिलाच्या घराण्याला व त्या नगराच्या मनुष्यांना घाबरला, यास्तव रात्री त्याने केले. मग सकाळी त्या नगराची माणसे उठली तर पाहा, बआलाची वेदी मोडलेली होती तिच्याजवळची अशेराही तोडलेली होते आणि बांधलेल्या वेदीवर दुसऱ्या गोऱ्ह्याचा होम केलेला होता. तेव्हा ते एकमेकांना म्हणाले, “ही गोष्ट कोणी केली? मग त्यांनी विचारपूस व शोध केल्यावर म्हटले, योवाशाचा पुत्र गिदोन, याने ही गोष्ट केली आहे.” नंतर त्या नगराच्या मनुष्यांनी योवाशाला सांगितले, “तू आपल्या पुत्राला बाहेर आण, त्यास तर मारावयाचे आहे, कारण त्याने बआलाची वेदी मोडून टाकली आणखी तिच्याजवळची अशेराची मूर्ती तोडून टाकली आहे.”