2 शमु. 23
23
दाविदाचे अखेरचे बोल
1दावीदाची ही अखेरची वचने; इशायपुत्र दावीदाचा हा संदेश देवामुळे ज्याला थोरवी प्राप्त झाली त्याचा हा संदेश. याकोबाच्या देवाचा हा अभिषिक्त राजा इस्राएलाचा मधुर स्तोत्रे गाणारा गायक. 2परमेश्वराचा आत्मा माझ्या मार्फत बोलला. त्याचे शब्द माझ्या मुखी होते. 3इस्राएलचा देव हे बोलला, इस्राएलचा दुर्ग मला म्हणाला, “जो न्यायाने राज्य करतो, जो देवाविषयी आदर बाळगून राज्य करतो. 4तो मनुष्य सकाळच्या प्रकाशासारखा असेल, निरभ्र सकाळ असावी तसा असेल, पावसानंतर येणाऱ्या उन्हासारखा असेल. पाऊस कसा तर ज्याच्यामुळे जमिनीतून कोवळे गवत तरारून येते असा. 5देवाने माझे घराणे बळकट व सुरक्षित केले देवाने माझ्याबरोबर एक कायमचा करार केला. तो सर्व दृष्टींनी माझ्या भल्याकरताच आहे याची त्याने खातरजमा करून घेतली. त्याने असा मजबूत करार केला आणि आता तो त्याचा भंग करणार नाही. हा करार म्हणजे माझा उध्दारच होय. हा करार म्हणजेच मला हवे होते ते सर्व काही होय. परमेश्वर माझ्या घराण्याची भरभराट करील. 6पण दुष्ट माणसे काट्यांसारखी असतात. लोक काटा धरून ठेवत नाहीत, फेकून देतात. 7त्याचा स्पर्श झाला तर लाकडी आणि पंचधातूचा भाला टोचावा तशा वेदना होतात. होय असा मनुष्य काट्यासारखा असतो. त्यांना आगीच्या भक्ष्य स्थानी टाकतील आणि ती जळून खाक होतील.”
दाविदाचे शूर वीर
1 इति. 11:10-47
8दावीदाच्या पदरी असलेल्या वीरांची नावे अशी: योशेब-बश्शेबेथ तखमोनी हा रथावरच्या सेवकांचा मुख्य होता. असनी आदीनो म्हणूनही त्यास ओळखतात. त्याने एका वेळी आठशे जणांना ठार केले. 9त्याच्या खालोखाल अहोही येथील दोदय याचा मुलगा. एलाजाराने पलिष्ट्यांना आव्हान दिले त्यावेळी दावीदाबरोबर असलेल्या तीन वीरांपैकी हा एक. ते युध्दाच्या तयारीने आले, पण इस्राएल सैनिक पळून गेले होते. 10थकून अंगात त्राण राहिला नाही तोपर्यंत एलाजार पलिष्ट्यांशी लढत राहिला. तलवारीला हात चिकटेपर्यंत त्याने लढा चालू ठेवला. परमेश्वराने त्या दिवशी मोठा विजय घडवून आणला. एलाजारची युध्दात सरशी झाल्यावर मग शत्रू सैनिकांच्या मृतदेहावरच्या वस्तू गोळा करायला तेवढे ते लोक तिथे आले. 11हरार येथील आगे याचा मुलगा शम्मा हा ही होता. पलिष्टी चालून आले तेव्हा एका कडधान्याच्या शेतात हे युध्द झाले. लोकांनी पलिष्ट्यां समोरून पळ काढला. 12पण शम्मा शेताच्या ऐन मध्यावर उभा राहिला आणि त्याने एकट्याने त्यांना तोंड दिले. त्याने पलिष्ट्यांचा पराभव केला. परमेश्वराने इस्राएलाला त्यादिवशी मोठा विजय मिळवून दिला. 13दावीद एकदा अदुल्लामच्या गुहेत होता आणि पलिष्टी सैन्याचा तळ खाली रेफाईच्या खोऱ्यात होता. त्यावेळी तीस शूरांपैकी तिघेजण दावीदाकडे जायला म्हणून सरळ गुहेपर्यंत अक्षरश: सरपटत गेले. 14नंतर एकदा दावीद गडावर असताना पलिष्ट्यांची टोळी बेथलहेम येथे होती. 15दावीद आपल्या गावाचे पाणी पिण्यासाठी व्याकुळ झाला तो म्हणाला, बेथलेहेमच्या वेशीजवळच्या विहिरीतले पाणी मला कुणी आणून दिले तर किती बरे होईल. 16पण या तीन शूरांनी पलिष्ट्यांच्या ठाण्यातून धाडसाने तोंड देत मार्ग काढला आणि बेथलहेमच्या वेशीजवळच्या विहिरीतले पाणी काढून दावीदाला प्यायला आणून दिले. दावीदाने ते प्यायचे नाकारले. त्याने ते परमेश्वरास अर्पण म्हणून जमिनीवर ओतून दिले. 17दावीद म्हणाला, “परमेश्वरा, हे पाणी मी कसे पिऊ? हे पाणी मी प्यायलो तर ज्यांनी आपले प्राण माझ्यासाठी धोक्यात घातले त्यांचे रक्तच मी प्राशन केल्यासारखे होईल.” म्हणून तो ते पाणी प्याला नाही. त्या तीन शूर वीरांनी यासारखी अनेक धाडसे केली. 18सरुवेचा मुलगा यवाब याचा भाऊ म्हणजे अबीशय. अबीशय या तीन वीरांचा नायक होता. आपल्या भाल्याने त्याने तीनशे शत्रू सैनिकांना ठार केले. आणि त्या तिघांमध्ये नाव मिळवले. 19त्या तिघांमध्ये तो सर्वाधिक प्रसिद्ध होता. त्यांचा तो नायकही होता. पण तो पहिल्या तिघांच्यापैकी नव्हता. 20यहोयादा याचा मुलगा बनाया हाही एक होता. तो एका पराक्रमी मनुष्याचा पुत्र होता. तो कबसेल इथून आलेला होता. बनायाने बरेच पराक्रम गाजवले मवाबमधील अरीएलच्या दोन मुलांना त्याने मारले. एकदा बर्फ पडत असताना त्याने गुहेत शिरून सिंह मारला. 21एका धिप्पाड मिसरी मनुष्यासही त्याने मारले. या मिसरी मनुष्याच्या हातात भाला होता तर बनायाच्या हातात फक्त काठी. बनायाने त्याचा भाला हिसकावून घेतला आणि त्याच्याच भाल्याने त्या मिसरी मनुष्याचा जीव घेतला. 22बनायाने अशी बरीच कृत्ये केली त्यानेही या तिघांइतकाच नावलौकिक मिळवला. 23तो तीस वीरांच्या तीस वीर-दावीदाच्या अतिशय शूर सैनिकांचा गट म्हणजे हे लोक होत. यापेक्षा तो अधिक प्रसिद्ध होता. पण तरी पहिल्या तिघांच्या पदाला तो पोचला नाही. दावीदाने त्यास आपल्या अंगरक्षकांचा प्रमुख म्हणून नेमले. 24यवाबाचा भाऊ असाएल हा त्या तिसातला एक होता. बाकीच्या वीरांची नावे पुढीलप्रमाणे:बेथलहेममधील दोदो याचा मुलगा एलहानान, 25शम्मा हरोदी, अलीका हरोदी, 26हेलस पलती, इक्केश तकोई याचा मुलगा ईरा, 27अबीयेजर अनाथोथी, मबुन्नय हूशाथी, 28सलमोन अहोही, महरय नटोफाथी, 29बाना नटोफाथी याचा मुलगा हेलेब, बन्यामीनच्या वंशातील, गिबामधला रीबय याचा मुलगा इत्तय, 30बनाया पिराथोनी, गाश झऱ्याजवळचा हिद्दय, 31अबी-अलबोन अर्बाथी, अजमावेथ बरहूमी, 32अलीहाबा शालबोनी, याशेन घराण्यातला योनाथान, 33शम्मा हारारी, शारार अरारी याचा मुलगा अहीयाम, 34माकाथीचा मुलगा अहसबय याचा मुलगा अलीफलेट, अहिथोफेल गिलोनी याचा मुलगा अलीयम, 35हेस्री कर्मेली, पारय अर्बी 36सोबा मधील नाथोन याचा मुलगा इगाल, बानी यादी, 37सेलक अम्मोनी, सरुवेचा मुलगा यवाब याचा शस्त्रवाहक नहरय बैरोथी, 38ईरा इथ्री, गारेब इथ्री, 39उरीया हित्ती, असे एकंदर सदतीस.
सध्या निवडलेले:
2 शमु. 23: IRVMar
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.