2 शमु. 14
14
अबशालोमाने परत यावे ह्यासाठी यवाबाने केलेली योजना
1अबशालोमच्या ओढीमुळे राजा बेचैन झालेला आहे हे सरुवेचा मुलगा यवाब याला कळले. 2तेव्हा तकोवा शहरात निरोप्याला पाठवून त्याने तेथील एका चतुर स्त्रीला बोलावणे पाठवले. तिला तो म्हणाला, तू खूप दु:खात असल्याचे ढोंग कर. त्यास शोभेसे कपडे कर. नटू सजू नको. अनेक दिवस मृताचा शोक करीत असलेल्या स्त्रीसारखी तू दिसली पाहिजेस. 3राजाकडे जा आणि मी सांगतो तसे त्याच्याशी बोल. यवाबाने मग तिला काय बोलायचे ते सांगितले. 4मग तकोवा येथील स्त्री राजाशी बोलली. तिने स्वत:ला जमिनीवर लवून व राजापुढे नतमस्तक होऊन ती म्हणाली, कृपाकरून मला मदत करा. 5राजाने तिची विचारपूस करून तिची अडचण जाणून घेतली. ती म्हणाली, मी एक विधवा स्त्री आहे. 6मला दोन पुत्र होते. एकदा शेतात त्यांचे भांडण लागले त्यांना थांबवायलाही कोणी नव्हते. तेव्हा एकाने दुसऱ्याचा जीव घेतला. 7आता सगळे घर माझ्याविरूद्ध उठले आहे. सगळे मला म्हणतात, आपल्या भावाचा जीव घेणाऱ्या त्या मुलाला आमच्या स्वाधीन कर. त्यास आम्ही मारून टाकतो कारण त्याने आपल्या भावाला मारले. माझा पुत्र हा आगीतल्या शेवटच्या ठिणगी सारखा आहे. त्यांनी माझ्या पुत्राचा जीव घेतला. तर ती आग नष्ट होईल. आपल्या वडिलांच्या मालमत्तेचा तो एकुलता एक वारस आहे. तोही गेला तर माझ्या मृत पतीची मालमत्ता दुसरा कोणी हडप करील. आणि या भूमीवर नावनिशाणीही राहणार नाही. 8हे ऐकून राजा तिला म्हणाला, मी यामध्ये लक्ष घालतो तू घरी जा. 9तेव्हा ती तकोवा येथील स्त्री राजाला म्हणाली, माझे स्वामी या सगळ्याला मी जबाबदार आहे. मी दोषी आहे. तुम्ही आणि तुमचे आसन निर्दोष आहेत. 10राजा दावीद म्हणाला, तुझ्याविरूद्ध कोणी काही बोलले तर त्यास माझ्याकडे आण. तुला पुन्हा कोणी त्रास देणार नाही. 11ती तकोवा येथील स्त्री पुन्हा राजाला म्हणाली, परमेश्वर देवाच्या नावाची शपथ वाहून सांगा की, या लोकांचा तुम्ही बंदोबस्त कराल. त्यांना भावाचा खून केल्याबद्दल माझ्या मुलाला शासन करायचे आहे. तेव्हा त्यास धक्का पोहचणार नाही याचे मला आश्वासन द्या. दावीद म्हणाला, परमेश्वर जिवंत असेपर्यंत कोणीही तुझ्या पुत्राला इजा करणार नाही. त्याच्या केसालाही धक्का पोचणार नाही. 12मग ती म्हणाली, माझे स्वामी, मला तुमच्याशी आणखी काही बोलायचे आहे, परवानगी असावी. राजा म्हणाला, बोल. 13त्यावर ती म्हणाली, तुम्ही देवाच्या लोकांच्या विरूद्ध योजना का केली आहे? होय, तुम्ही असे म्हणालात तेव्हा तुम्ही स्वत: दोषी ठरता. कारण राजाने आपल्या घराबाहेर घालवलेल्या पुत्राला पुन्हा परत आणलेले नाही. 14आपण सर्वच कधीतरी मरण पावणार आहोत. जमिनीवर पडलेल्या पाण्यासारखी आपली स्थिती होणार आहे. सांडलेले पाणी पुन्हा भरता येत नाही. देव क्षमाशील आहे हे तुम्ही जाणता. स्वसंरक्षणासाठी पळालेल्याच्या बाबतीतही देवाची काही योजना असते. देव त्यास आपल्यापासून पळायला लावत नाही. 15स्वामी, हेच सांगायला मी येथपर्यंत आले. लोकांमुळे मी भयभीत झाले होते. मी मनाशी म्हणाले, राजाशी मी बोलेन कदाचित् तोच मला मदत करील. 16तो माझे ऐकून घेईल. मला आणि माझ्या मुलाला मारायला निघालेल्या मनुष्यापासून माझा बचाव करील. देवाने आपल्याला जो वारसा दिला त्यापासून हा मनुष्य आम्हास वंचित करू पाहत आहे. 17स्वामी, तुमच्या शब्दांनी मला दिलासा मिळेल हे मी जाणून होते. कारण तुम्ही देवदूतासारखेच आहात. बरे वाईट तुम्ही जाणता आणि देव परमेश्वराची तुम्हास साथ आहे. 18राजा दावीद त्या स्त्रीला म्हणाला, आता मी विचारतो त्याचे उत्तर दे. माझ्यापासून काही लपवून ठेवू नकोस. ती म्हणाली माझे स्वामी, विचारा. 19राजा म्हणाला, तुला हे सर्व बोलायला यवाबाने सांगितले ना? ती म्हणाली, होय महाराज, तुमचे सेवक यवाब यांनीच मला हे सर्व बोलायला सांगितले. 20अलिप्तपणे सर्व गोष्टी न्याहाळता याव्यात म्हणूनच स्वरूप बदलून सांगायची युक्ती यवाबाने केली. स्वामी तुम्ही देवदूता सारखेच ज्ञानी आहात. तुम्हास या पृथ्वीवरील सर्व घटना समजतात. 21राजा यवाबाला म्हणाला, माझे वचन मी खरे करीन. आता अबशालोमला परत आणा. 22यवाबाने राजाला वाकून अभिवादन केले राजाचे अभीष्ट चिंतून तो म्हणाला, तुम्ही माझ्यावर प्रसन्न आहात हे मी जाणतो. माझी विनंती तुम्ही मान्य केलीत यावरुन मी हे ताडले. 23मग यवाब गशूर येथे गेला आणि अबशालोमला यरूशलेमेला घेऊन आला. 24पण राजा दावीद म्हणाला, अबशालोमला त्याच्या घरी जाऊ दे त्यास मला भेटता मात्र येणार नाही. तेव्हा राजाचे तोंड न पाहताच अबशालोम आपल्या घरी परतला. 25अबशालोमच्या देखणेपणाची लोक तोंड भरून प्रशंसा करत होते. इस्राएलमध्ये त्याचा रुपाला तोड नव्हती. त्याच्या पायाच्या तळव्यापासून तर डोक्यापर्यंत त्याच्यात कोणताही दोष नव्हता. 26प्रत्येक वर्षाच्या अखेरीस अबशालोम आपल्या माथ्यावरील केस कापून त्याचे वजन करीत, केसांचे ओझे होत असल्यामुळे तो ते करीत असे, ते केस राजाच्या वजनाप्रमाणे दोनशे शेकेल#साधारण 2.3 किलोग्राम भरत असत. 27त्यास तीन पुत्र आणि एक कन्या होती, त्या कन्येचे नाव तामार होते. तामार दिसायला सुंदर होती. 28यरूशलेमेमध्ये अबशालोम पूर्ण दोन वर्षे राहिला. पण त्या कालावधीत दावीद राजाला मात्र तो एकदाही भेटू शकला नाही. 29तेव्हा अबशालोमने यवाबाकडे आपल्या सेवकाला पाठवले. आपली राजाशी भेट घडवून आणावी असा निरोप दूतांकरवी यवाबाला दिला. पण यवाब अबशालोमकडे आला नाही. अबशालोमने त्यास पुन्हा बोलावणे पाठवले, तरीही तो येईना. 30तेव्हा मात्र अबशालोम आपल्या सेवकांना म्हणाला, माझ्या शेताला लागूनच यवाबाचे शेत आहे. त्यामध्ये जवाचे पीक आले आहे ते पेटवून द्या अबशालोमच्या सेवकांनी त्याप्रमाणे यवाबाच्या शेतात आग लावली. 31तेव्हा यवाब उठून अबशालोमकडे आला, आणि त्यास म्हणाला “तुझ्या सेवकांनी माझ्या शेतात जाळपोळ का केली?” 32अबशालोम यवाबाला म्हणाला, “मी निरोप पाठवून तुला बोलावणे धाडले होते. तुला मी राजाकडे पाठवणार होतो. गशूरहून त्याने मला का बोलावले ते मी तुला त्यास विचारायला सांगणार होतो. मी त्याचे दर्शन घेऊ शकत नसेन तर गशूरहून मी इथे का आलो? तेव्हा मला त्यास भेटू दे. माझा काही अपराध असला तर त्याने मला मारून टाकावे. 33तेव्हा यवाब राजाकडे आला आणि त्याने अबशालोमचे मनोगत राजाला सांगितले राजाने अबशालोमला बोलावले, अबशालोम आला त्याने राजाला वाकून अभिवादन केले, राजाने त्याचे चुंबन घेतले.”
सध्या निवडलेले:
2 शमु. 14: IRVMar
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.