YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 राजे 3:1-12

2 राजे 3:1-12 IRVMAR

यहूदाचा राजा यहोशाफाट याच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी, अहाबाचा मुलगा योराम शोमरोनात इस्राएलावर राज्य करू लागला; त्याने बारा वर्षे राज्य केले. यहोरामाने परमेश्वराच्या दृष्टीने दुष्ट अशी कृत्ये केली, पण आपल्या आई-वडिलांसारखे त्याने केले नाही; त्याने त्याच्या वडिलांनी बआलमूर्तीच्या पूजेसाठी केलेला स्तंभ काढून टाकला. असे असले तरी नबाटचा मुलगा यराबाम ज्याने इस्राएलास पाप करायला लावले, त्याच्या पापास तो चिकटून राहिला. ती त्याने सोडली नाहीत. आता मवाबाचा राजा मेशा कळपांचा धनी होता. तो इस्राएलाच्या राजाला एक लक्ष मेंढया आणि एक लक्ष एडके लोकरींसूद्धा देत असे. पण अहाबाच्या मूत्यूनंतर, मवाबाच्या राजाने इस्राएलाच्या राजाविरूद्ध बंड केले. त्या वेळेस राजा योराम शोमरोन मधून बाहेर पडला आणि त्याने सर्व इस्राएल लोकांस एकत्र केले. यहूदाचा राजा यहोशाफाट याच्याकडे त्याने असा निरोप पाठवला की, “मवाबाच्या राजाने माझ्याविरुध्द बंड केले आहे. तू माझ्याबरोबर मवाबाविरूद्ध लढाईला येशील काय?” यहोशाफाटाने सांगितले, “होय, मी जरुर येईन, जसा तू तसा मी, जसे तुझे लोक तसे माझे लोक, जसे तुझे घोडे तसे माझे घोडे.” नंतर तो बोलला “कोणत्या वाटेने हल्ला करायला जायचे?” यावर, “अदोमच्या वाळवंटाच्या दिशेने” असे यहोशाफाट ने सांगितले. मग इस्राएलचा राजा, यहूदा आणि अदोमाच्या राजाबरोबर चालत सात दिवसाच्या वाटेचा फेरा केल्यावर, तिथे त्यांच्या सैन्याला, घोड्यांना, तसेच त्यांच्याबरोबरची जनावरे याकरिता पाणी सापडले नाही. तेव्हा इस्राएलाचा राजा यहोराम म्हणाला, “हे काय आहे? मवाबांच्या हातून पराभव पत्करावा म्हणून परमेश्वराने आम्हा तीन राजांना एकत्र आणले काय?” परंतू यहोशाफाट म्हणाला, “ज्याच्याकडून आपण परमेश्वराचा सल्ला घ्यावा असा येथे परमेश्वराचा एखादा संदेष्टा नाही काय?” तेव्हा इस्राएलाच्या राजाच्या एका सेवकाने उत्तर दिले, “शाफाटाचा मुलगा अलीशा इथेच आहे, जो एलीयाच्या हातावर पाणी घालत असे.” यहोशाफाट म्हणाला, “परमेश्वराचे वचन त्याच्या सोबत आहे.” तेव्हा इस्राएलाचा राजा व यहोशाफाट आणि अदोमचा राजा खाली त्याच्याकडे गेले.