YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 इति. 34:1-18

2 इति. 34:1-18 IRVMAR

योशीया, राजा झाला तेव्हा आठ वर्षांचा होता. त्याने यरूशलेमेमध्ये एकतीस वर्षे राज्य केले. त्याने वर्तन योग्य प्रकारचे होते परमेश्वराची त्याच्याकडून जशी अपेक्षा होती तसेच तो वागला आपला पूर्वज दावीद याच्याप्रमाणे त्याने सत्कृत्ये केली. सन्मार्गावरुन तो ढळला नाही. आपल्या कारकिर्दीच्या आठव्या वर्षीच तो आपला पूर्वज दावीद याच्या परमेश्वराच्या भजनी लागला. योशीयाने लहान वयातच हा मार्ग पत्करला आणि कारकिर्दीच्या बाराव्या वर्षी यहूदा आणि यरूशलेमेला शुद्ध केले, उंचस्थाने, अशेरा देवीचे खांब, कोरीव आणि ओतीव मूर्ती यांची मोडतोड केली. लोकांनी त्याच्या समोरच बआलदेवतांच्या मूर्ती फोडून टाकल्या. वरच्या भागात असलेल्या धूप जाळण्याच्या वेद्या योशीयाने उद्ध्वस्त केल्या. अशेराच्या मूर्ती ओतीव आणि कोरीव मूर्तीचाही त्याने पार चुराडा करून टाकला आणि हे चूर्ण, ज्या लोकांनी बआल देवतांसाठी यज्ञ केले त्यांच्या कबरीवर पसरले. बआल देवतांची पूजा करणाऱ्या याजकांच्या अस्थी देखील त्याने त्यांच्याच वेद्यांवर जाळून टाकल्या. अशाप्रकारे त्याने यहूदा आणि यरूशलेमला शुद्ध केले. मनश्शे, एफ्राइम, शिमोन, नफताली येथपर्यंतच्या शहरांतून आणि त्यांच्या आसपासच्या पडीक जागेत त्याने हेच केले. त्याने वेद्या मोडून टाकल्या, अशेरा खांबांची मोडतोड करून चूर्ण केले धूपाच्या वेद्या उखडणे ही इस्राएलभरची मोहीम उरकल्यावर योशीया यरूशलेमेला परतला. योशीयाने राज्याची सूत्रे हाती घेतल्याच्या अठराव्या वर्षी शाफान, मासेया, आणि योवाह यांना परमेश्वर देवाचे मंदिर दुरुस्तीसाठी पाठवले. शाफानच्या पित्याचे नाव असल्या, मासेया हा नगराचा कारभारी होता आणि योवाहाचे पिता योवाहाज. योवाह हा बखरकार होता. यहूदा आणि मंदिर यांच्या शुद्धीकरणासाठी मंदिराच्या डागडुजीचे हे काम योशीयाने अंगावर घेतले. ही माणसे हिल्कीया या मुख्य याजकाकडे गेली. मनश्शे, एफ्राइम आणि उर्वरित सर्व इस्राएलातून लोकांनी देवाच्या मंदिरासाठी दिलेला पैसा लेवी द्वारपालांनी जमा केला होता. सर्व यहूदा प्रांत, बन्यामिनचा प्रदेश आणि यरूशलेमेतून देखील त्यांनी पैसे जमा केले होते. ही रक्कम हिल्कीयाकडे त्यांनी सुपूर्त केली. मग, परमेश्वराच्या मंदिराच्या बांधकामावर देखरेख करणाऱ्यांना लेवींनी हे पैसे दिले आणि परमेश्वराच्या मंदिराची दुरुस्ती करण्यासाठी कामगारांना दिले. तासलेले चिरे, लाकूड यांच्या खरेदीसाठी गवंडी, सुतार या लोकांस पैसे देण्यात आले. मंदिराच्या दुरुस्तीसाठी आणि कडीपाटासाठी लाकूड लागले. यहूदाचा राजांनी यापूर्वी मंदिराची योग्य देखभाल न केल्यामुळे मंदिराच्या इमारती जीर्ण झाल्या होत्या. कामगारांनी मन लावून काम केले. यहथ व ओबद्या हे मरारी कुळातील लेवी देखरेख करत होते. कहाथी वंशातील जखऱ्या आणि मशुल्लाम हे ही देखरेखीच्या कामावर होते. वाद्ये वाजवण्यात निपुण असलेले लेवीसुध्दा होते. ते कारागिरांवर आणि मजुरांवर देखरेख करत होते. चिटणीस, कारभारी आणि द्वारपाल म्हणून काही लेवी काम करत होते. परमेश्वराच्या मंदिरातील पैसा लेवी बाहेर आणत असताना हिल्कीया या याजकाला मोशेद्वारे आलेला नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला. हिल्कीयाने शाफान चिटणीसास असे सांगितले कि, “परमेश्वराच्या मंदिरात मला नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला आहे.” मग हिल्कीयाने शाफानाला तो ग्रंथ दिला. शाफानने तो योशीयाकडे आणला. राजाला तो म्हणाला, “तुझे सेवक तुझ्या आज्ञेप्रमाणे वागत आहेत. परमेश्वराच्या मंदिरातील पैसा घेऊन त्यातून ते देखरेख करणाऱ्यांना आणि मजुरांना वेतन देत आहेत” शाफान पुढे राजाला म्हणाला, “याजक हिल्कीयाने मला हे पुस्तक दिले आहे.” शाफानने मग राजाला पुस्तकातील मजकूर वाचून दाखवला.