YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 राजे 8:54-66

1 राजे 8:54-66 IRVMAR

शलमोनाने आकाशाकडे हात पसरून व परमेश्वराच्या वेदीसमोर गुडघे टेकून ही सर्व प्रार्थना व विनवणी परमेश्वरास करण्याचे संपवल्यावर तो तेथून उठला. मग त्याने इस्राएल लोकांस उभे राहून उंच आवाजात आशीर्वाद दिला, तो म्हणाला. “परमेश्वराचे स्तवन करा. इस्राएल लोकांस विसावा देण्याचे त्याने कबूल केले होते. त्याप्रमाणे त्यांने केले आहे. आपला सेवक मोशे याच्यामार्फत वचने दिली होती. त्यापैकी एकही शब्द वाया गेला नाही. आपल्या पूर्वजांना आपला देव परमेश्वर याने जशी साथ दिली तशीच तो पुढे आपल्यालाही देवो. त्याने आम्हास कधी सोडू नये व कधी त्यागू नये. आम्ही त्यास अनुसरावे. त्याच्या मार्गाने जावे. म्हणजेच आपल्या पूर्वंजांना त्याने दिलेल्या आज्ञा, सर्व नियम, निर्णय यांचे आम्ही पालन करावे. आजची माझी प्रार्थना आणि माझे मागणे परमेश्वर सतत लक्षात ठेवो. हा राजा त्याचा सेवक आहे. त्याच्यासाठी आणि इस्राएल लोकांसाठी त्याने एवढे करावे. एकदिवसही त्यामध्ये खंड पडू देऊ नये. परमेश्वराने एवढे केले तर हा एकच खरा देव आहे हे जगभरच्या लोकांस कळेल त्याच्याशिवाय दुसरा देव नाही. तुम्ही सर्वांनीही आपल्या परमेश्वर देवाशी एकनिष्ठ आणि प्रामाणिक असले पाहिजे. त्याच्या सर्व आज्ञा आणि नियम यांचे पालन केले पाहिजे. आत्ताप्रमाणेच पुढेही हे सर्व चालू ठेवले पाहिजे.” मग राजासहीत सर्व इस्राएल लोकांनी परमेश्वरासमोर यज्ञबली अर्पण केले. शलमोनाने बावीस हजार गुरे आणि एक लाख वीस हजार मेंढरे बली अर्पिली. ही शांत्यर्पणासाठी होती. अशाप्रकारे राजा आणि इस्राएल लोकांनी मंदिर परमेश्वरास अर्पण केले. मंदिरा समोरचे अंगणही राजा शलमोनाने त्यादिवशी अर्पण केले. त्याने तेथे होमबली, धान्य आणि आधी शांत्यर्पणासाठी अर्पण केलेल्या जनावरांची चरबी हे सर्व तेथे अर्पण केले. परमेश्वरापुढील पितळेची वेदी त्या मानाने लहान असल्यामुळे त्याने हे अंगणात केले. शलमोनाने आणि त्याच्याबरोबर सर्वांनी त्यादिवशी मंदिरात उत्सव साजरा केला. हमाथ खिंडीपासून मिसरच्या सीमेपर्यंतच्या भागातील सर्व इस्राएल लोक तेथे हजर होते. हा समुदाय प्रचंड होता. सात दिवस त्यांनी परमेश्वराच्या सान्निध्यात खाण्यापिण्यात आणि मजेत घालवले. आणखी सात दिवस त्यांनी आपला मुक्काम लांबवला. अशाप्रकारे हा सोहळा चौदा दिवस चालला. नंतर शलमोनाने सर्वांना घरोघरी परतायला सांगितले. राजाला धन्यवाद देऊन, त्याचा निरोप घेऊन सर्वजण परतले. परमेश्वराचा सेवक दावीद आणि इस्राएलचे सर्व लोक यांचे परमेश्वराने कल्याण केले म्हणून ते आनंदात होते.