1 राजे 10
10
शबाची राणी शलमोनाला भेटण्यास येते
2 इति. 9:1-28
1परमेश्वराच्या नावासंबंधाने शबाच्या राणीने शलमोनाची ख्याती ऐकली तेव्हा अवघड प्रश्न विचारुन त्याची कसोटी पाहायला ती आली. 2नोकरा चाकरांचा मोठा लवाजमा आणि सुवासिक मसाल्याचे पदार्थ, रत्ने, सोनेनाणे अशा बऱ्याच गोष्टी उंटांवर लादून ती यरूशलेमेला आली. शलमोनाला भेटल्यावर तिच्या मनातले सर्वकाही तिने त्यास सांगितले. 3शलमोन राजाने तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली. असा कुठलाच प्रश्न नव्हता की, त्याचे उत्तर त्याने दिले नाही. 4शलमोनाचे शहाणपण शबाच्या राणीने पाहिले त्याने बांधलेला सुंदर महालही तिने पाहिले. 5त्याच्या मेजावरचे खाणे, त्याच्या सेवकांचा वावर, शलमोनाच्या कारभाऱ्याची ऊठबस आणि त्यांचे पोषाख, त्याचे प्यालेबरदार त्याने दिलेल्या मेजवान्या आणि परमेश्वराच्या मंदिरात केलेले यज्ञ. हे सर्व शबाच्या राणीने पाहिले आणि ती आश्चर्याने थक्क झाली. 6ती राजाला म्हणाली, “तुझ्या चातुर्याबद्दल आणि कारभाराबद्दल मी माझ्या देशात बरेच ऐकले होते. ते खरे आहे. 7पण हे सर्व माझ्या डोळ्यांनी बघेपर्यंत, माझा त्यावर विश्वास बसत नव्हता. आता असे वाटते की ऐकले ते कमीच होते. तुझे ऐश्वर्य आणि बुध्दिमत्ता मला लोकांनी सांगितली त्यापेक्षा जास्तच आहे. 8तुझे लोक आणि सेवक खरेच फार धन्य आहेत. तुझे सेवक, जे तुझ्यासमोर ऊभे राहून, ज्यांना तुझ्या ज्ञानाचा लाभ होतो ते धन्य. 9परमेश्वर देव थोर आहे, तुझ्यावर प्रसन्न होऊन त्याने तुला इस्राएलाचा राजा केले आहे. परमेश्वर इस्राएलावर प्रेम करतो म्हणून, नियमशास्त्राचे व न्यायाचे पालन करण्यास त्याने तुला राजा केले आहे.” 10मग शबाच्या राणीने राजाला एकशे वीस किक्कार#साधारण 4,080 किलोग्राम सोने, नजर केले. शिवाय मोठ्या प्रमाणात मसाल्याचे पदार्थ आणि मौल्यवान हिरे दिले. इस्राएलामध्ये यापूर्वी कोणी आणले नसतील इतके मसाल्याचे पदार्थ एकट्या शबाच्या राणीने शलमोन राजाला दिले. 11हिरामच्या गलबतामधून ओफिरहून सोने आले. तसेच रक्तचंदनाचे लाकूड आणि भारी रत्नेही आली. 12शलमोन राजाने या लाकडाचा वापर परमेश्वराच्या मंदिरात आणि महालात आधाराचे कठडे उभारायला केला. शिवाय वादकांसाठी वीणा, सतारीही त्यातून करवून घेतल्या. तसे लाकूड परत कोणी कधी इस्राएलामध्ये आणले नाही की त्यानंतर कोणी तसे लाकूड पाहिले नाही. 13दुसऱ्या देशाच्या राज्यकर्त्याला, जे रीतीप्रमाणे भेटीदाखल द्यायचे ते सर्व शलमोन राजाने शबाच्या राणीला दिले. शिवाय तिला काय हवे ते विचारुन तेही दिले. यानंतर राणी आपल्या लवाजम्यासाहित मायदेशी निघून गेली.
शलमोनाचे वैभव आणि त्याची कीर्ती
14शलमोन राजाला दरसाल जवळपास सहाशे सहासष्ट किक्कार#साधारण 22,644 किलोग्राम सोने मिळत राहिले. 15या मालवाहू जहाजांखेरीज व्यापारी, सौदागर, अरबस्तानचे राजे तसेच नेमलेले सुभेदार यांच्याकडूनही सोने येत राहिले. 16शलमोन राजाने घडीव सोन्याच्या दोनशे मोठ्या ढाली केल्या. प्रत्येक ढालीस सहाशे शेकेल सोने लागले. 17तशाच पण जरा लहान तीनशे घडीव सोन्याच्या ढाली केल्या. त्या लहान ढालीस तीन माने सोने लागले. राजाने या ढाली “लबानोनाचे वन” येथे ठेवल्या. 18शिवाय राजा शलमोनाने हस्तिदंताचे एक प्रशस्त सिंहासन करवले. ते सोन्याने मढवले होते. 19सिंहासनाला सहा पायऱ्या होत्या. त्याची पाठ कमानदार होती. दोन्ही बाजूला हात होते. हातांच्या खाली दोन्ही बाजूला सिंह होते. 20तसेच सहाही पायऱ्यांवर दोन-दोन सिंह होते. असे सिंहासन दुसऱ्या कोणात्याही राज्यात नव्हते. 21राजा शलमोनाचे सर्व पेले आणि चषक सोन्याचे होते. “लबानोनाचे वनामधील” सर्व शस्त्रास्त्रे आणि सामग्री शुद्ध सोन्याची होती. चांदीचे काहीही नव्हते. सोने इतक्या मुबलक प्रमाणात होते की शलमोनाच्या कारकिर्दीत लोकांच्या लेखी चांदीला काही किंमत नव्हती. 22समुद्रावर राजा हिरामाच्या जहाजांबरोबर शलमोन राजाच्याही तार्शीश जहाजांचा एक तांडा असे, आणि तीन-तीन वर्षांनी ही तार्शीश जहाजे सोने, चांदी, हस्तिदंत, वानर व मोर आणत असत. 23शलमोन हा पृथ्वीतलावरील सर्वात महान राजा होता. त्याच्याकडे सर्वाधिक वैभव आणि बुद्धी चातुर्य होते. 24पृथ्वीवरील सर्व लोक त्यास भेटण्यास उत्सुक असत. देवाने शलमोनाला दिलेले बुध्दीचे वैभव त्यांना अनुभवायचे असे. 25ठिकठिकाणाहून दरवर्षी लोक त्याच्या भेटीला येत. येताना प्रत्येकजण नजराणा आणीत असे. सोन्या चांदीच्या वस्तू, कपडे, शस्त्रे, सुगंधी मसाल्याचे पदार्थ, घोडे, खेचरे अशा अनेक गोष्टी ते भेटीदाखल आणत.
शलमोनाने केलेला घोडा व रथ ह्यांचा व्यापार
26शलमोन राजाकडे खूप रथ आणि घोडे होते. त्याच्याकडे चौदाशे रथ आणि बारा हजार घोडे यांचा संग्रह होता. रथासाठी त्याने खास नगरे उभारली आणि त्यामध्ये रथ ठेवले. काही रथ त्याच्याजवळ यरूशलेमेमध्येही होते. 27राजाने इस्राएलाला वैभवाच्या शिखरावर नेले. यरूशलेम नगरात चांदी जमीनीवरील दगडधोंड्यासारखी होती आणि गंधसरुचे लाकूड डोंगरटेकड्यांवर उगवणाऱ्या उंबराच्या झाडासारखे विपुल होते. 28मिसर व सिलीसिया येथून शलमोन घोडे आणत असे. शलमोन राजाचे व्यापारी ते तांडेच्या तांडे खरेदी करत आणि तेथून ते इस्राएलमध्ये आणत. 29मिसरचा एक रथ साधारण सहाशे शेकेल चांदीला पडे, आणि घोड्याची किंमत दिडशे शेकेल चांदी इतकी पडे. हित्ती आणि अरामी राजांना हे रथ आणि घोडे नंतर विकत असत.
सध्या निवडलेले:
1 राजे 10: IRVMar
ठळक
सामायिक करा
कॉपी करा

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.