YouVersion लोगो
सर्च आयकॉन

जखर्‍या 13:2-9

जखर्‍या 13:2-9 MARVBSI

सेनाधीश परमेश्वर म्हणतो, पाहा, त्या दिवशी असे होईल की, मी देशातून मूर्तींच्या नावांचा उच्छेद करीन, त्यांची ह्यापुढे आठवण होणार नाही आणि संदेष्टे व अशुद्ध आत्मा ह्यांना मी देशातून घालवून देईन. आणि असे होईल की कोणी संदेश वदू लागल्यास त्याचे जन्मदाते आईबाप त्याला म्हणतील, तू जिवंत राहायचा नाहीस, कारण तू परमेश्वराच्या नामाने लबाड्या सांगितल्या आहेत. तो संदेश वदू लागला तर त्याचे जन्मदाते आईबाप त्याला भोसकून मारतील. त्या दिवशी असे होईल की, संदेष्टा संदेश वदताना आपल्या प्रत्येक दृष्टान्तासंबंधाने लज्जित होईल व लोकांना फसवण्यासाठी केसांचा झगा घालणार नाही; पण तो म्हणेल, ‘मी काही संदेष्टा नाही, शेती करणारा मनुष्य आहे; कारण मला लहानपणीच कोणी दास केले.’ त्याला जर कोणी विचारले की, ‘तुझ्या बाहूंच्यामध्ये ह्या जखमा कसल्या?’ तर तो म्हणेल, ‘माझ्या इष्टमित्रांच्या घरी लागलेल्या घावांचे हे वण आहेत.”’ सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “अगे तलवारी, माझ्या मेंढपाळावर व जो पुरुष माझा सोबती त्याच्यावर ऊठ; मेंढपाळावर प्रहार कर म्हणजे मेंढरे विखरतील; माझ्या लहानग्यांवर मी माझ्या हाताची छाया करीन.” परमेश्वर म्हणतो, “देशभर असे होईल की, त्याचे दोन भाग नष्ट करतील, पण त्याचा तिसरा भाग मागे राहील. तो तिसरा भाग मी अग्नीत टाकीन, रुपे गाळतात तसे मी त्यांना गाळीन, सोने शुद्ध करतात त्याप्रमाणे त्यांना शुद्ध करीन; ते माझे नाम घेतील तेव्हा मी त्यांचे ऐकेन; मी म्हणेन, ‘हे माझे लोक’ व ते म्हणतील, ‘परमेश्वर माझा देव.”’