YouVersion लोगो
सर्च आयकॉन

जखर्‍या 11

11
1हे लबानोना, आपल्या वेशी उघड म्हणजे अग्नी तुझे गंधसरू भस्म करील.
2हे देवदारू, हायहाय कर; कारण गंधसरू पडला आहे, वृक्षराज नष्ट झाले आहेत, बाशानाच्या ओक वृक्षांनो, हायहाय करा, कारण निबिड वन जमीनदोस्त झाले आहे.
3ऐका, मेंढपाळांचा हाहाकाराचा शब्द होत आहे! कारण त्यांचे वैभव लयास गेले आहे; ऐका, तरुण सिंहाची थोर गर्जना होत आहे! कारण यार्देनेचे घोर अरण्य लयास गेले आहे.
नालायक मेंढपाळ
4परमेश्वर माझा देव म्हणतो, “वधासाठी नेमलेल्या मेंढरांना चार.
5त्यांचे मालक त्यांचा वध करतात व आपणांला निर्दोष समजतात; त्यांची विक्री करणारे म्हणतात की, ‘परमेश्वराचा धन्यवाद होवो; मी श्रीमंत झालो आहे;’ त्यांचे स्वत:चे मेंढपाळ त्यांच्यावर काही दया करत नाहीत.
6मी ह्या देशाच्या रहिवाशांवर ह्यापुढे दया करणार नाही असे परमेश्वर म्हणतो; पण मी त्यांना एकमेकांच्या व राजाच्या हाती देईन; ते देश नष्ट करतील व मी त्यांना त्यांच्या हातातून सोडवणार नाही.”
7मी वधासाठी नेमलेल्या मेंढरांना चारले, मेंढरांतल्या अतिशय दुबळ्यांना चारले. मी दोन काठ्या घेतल्या. एकीचे नाव रमणीयता व दुसरीचे नाव बंधन असे ठेवले. आणि मी त्या कळपांना चारले.
8मी एका महिन्यात तीन मेंढपाळ कापून टाकले, कारण माझ्या जिवाला त्यांचा कंटाळा आला व त्यांच्या जिवास माझा कंटाळा आला.
9मग मी म्हणालो, “मी ह्यापुढे तुम्हांला चारणार नाही; कोणी मेले तर मरू द्या, कोणी नष्ट झाले तर नष्ट होऊ द्या; वाचून राहिलेल्यांना एकमेकांचे मांस खाऊ द्या.”
10सर्व राष्ट्रांबरोबर मी केलेला करार मोडावा म्हणून रमणीयता नावाची काठी मी घेतली आणि तिचे मोडून तुकडे केले.
11त्या दिवशी ती मोडली; तेव्हा ज्यांनी माझे ऐकले होते असे त्या कळपांत असलेले अतिशय दुबळे समजले की, हे परमेश्वराचे वचन आहे.
12मग मी त्यांना म्हणालो, “तुम्हांला बरे दिसले तर मला माझे वेतन द्या, नाहीतर जाऊ द्या.” तेव्हा त्यांनी मला माझे वेतन तीस रुपये तोलून दिले.
13परमेश्वर मला म्हणाला, “त्यांनी जे माझे भारी मोल ठरवले ते कुंभारापुढे1 फेकून दे.” तेव्हा ते तीस रुपये घेऊन मी परमेश्वराच्या मंदिरात कुंभारापुढे फेकून दिले.
14मग यहूदा व इस्राएल ह्यांचे बंधुत्व मोडावे म्हणून मी बंधन नावाची माझी दुसरी काठी मोडली.
15परमेश्वर मला म्हणाला, “जाऊन पुन्हा एखाद्या मूर्ख मेंढपाळाची आउते घे.
16कारण पाहा, मी देशात एक मेंढपाळ आणतो; तो मरण्याच्या लागास आलेल्यांकडे ढुंकून पाहणार नाही, भटकलेल्या मेंढरांना तो शोधणार नाही, मोडलेल्यांना बरे करणार नाही, धडधाकटांचे तो पालन करणार नाही; तर पुष्ट मेंढरांचे मांस तो खाईल व त्यांच्या खुरांचे तुकडे-तुकडे करील.
17कळपास सोडून देणार्‍या कवडीमोल मेंढपाळास धिक्कार असो! त्याच्या बाहूवर व त्याचा उजव्या डोळ्यावर तलवार चालेल; त्याचा बाहू सुकेल, त्याचा उजवा डोळा अगदी अंध होईल.”

सध्या निवडलेले:

जखर्‍या 11: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन