YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गीतरत्न 1

1
वधू व यरुशलेमकन्या
1शलमोनाने रचलेले गीतरत्न.
2तो मला मुखचुंबन देवो; तुझे प्रेम द्राक्षारसाहून मधुर आहे.
3तुझ्या सुवासिक अत्तराचा घमघमाट सुटतो; तुझे नाव सिंचन केलेले सुगंधी अत्तरच होय; म्हणूनच कुमारी तुझ्यावर प्रेम करतात.
4माझ्या चित्ताचे आकर्षण कर, म्हणजे आम्ही तुझ्यामागून धावत येऊ. राजाने मला अंत:पुरी आणले आहे. आम्ही तुझ्या ठायी आनंदोत्सव करू; तुझे प्रेम द्राक्षारसाहून अधिक वर्णू; त्या एकनिष्ठपणे तुझ्यावर प्रीती करीत आहेत.
5यरुशलेमनिवासी कन्यांनो, मी काळीसावळी पण सुरूप आहे. केदाराच्या तंबूसारखी, शलमोनाच्या पडद्यांसारखी मी काळी आहे.
6मी काळीसावळी आहे हे मनात आणू नका, कारण मी उन्हाने होरपळले आहे. माझे सहोदर बंधू माझ्यावर संतप्त झाले; त्यांनी मला द्राक्षीच्या मळ्यांची राखण करण्यासाठी ठेवले; पण माझ्या स्वत:च्या मळ्याची राखण मी केली नाही.
7माझ्या प्राणसख्या, मला सांग : तू आपला कळप कोठे चारतोस? दुपारी तो कोठे बसवतोस? तुझ्या सोबत्यांच्या कळपांजवळ मी का भ्रमत राहावे?
8हे परम सुंदर स्त्रिये, तुला हे ठाऊक नसेल तर तू त्या शेरडामेंढरांच्या पावलांमागे पाऊल टाकून जा; मेंढपाळांच्या राहुट्यांनजीक आपली करडे चारत राहा.
वधूवर
9माझ्या सखे, मी तुला फारोच्या रथाच्या घोडीसारखा लेखतो.
10गोफांनी तुझे गाल, रत्नहारांनी तुझा कंठ सुरेख दिसत आहे.
11आम्ही तुझ्यासाठी चांदीचे टिके लावलेले सोन्याचे गोफ करू.
12राजा मेजाजवळ बसला असता माझ्या जटामांसीचा सुगंध पसरला.
13माझा वल्लभ माझ्या कुचद्वयामध्ये ठेवलेल्या गंधरसाच्या पुडीसारखा मला आहे.
14माझा वल्लभ मला एन-गेदी येथील द्राक्षीच्या मळ्यातील मेंदीच्या पुष्पगुच्छाप्रमाणे आहे.
15माझ्या सखे, तू सुंदर आहेस; अगे, तू सुंदर आहेस! तुझे नेत्र कपोतांसारखे आहेत.
16माझ्या वल्लभा, तूच सुरूप आहेस; तूच मनोहर आहेस; आमचा मंचक पर्णशय्या आहे.
17आमच्या घराच्या तुळया गंधसरूच्या आहेत; आमची तक्तपोशी सुरूची आहे.

सध्या निवडलेले:

गीतरत्न 1: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन