YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस पत्र 9:1-15

रोमकरांस पत्र 9:1-15 MARVBSI

मी ख्रिस्तामध्ये खरे बोलतो, खोटे बोलत नाही; माझी सदसद्विवेकबुद्धीही पवित्र आत्म्यामध्ये माझ्याबरोबर साक्ष देते की, मला मोठा खेद वाटतो व माझ्या अंत:करणामध्ये अखंड वेदना आहेत. कारण माझे बंधुजन म्हणजे देहदृष्ट्या माझे नातेवाईक ह्यांच्यासाठी मी स्वतः ख्रिस्तापासून शापभ्रष्ट व्हावे हे शक्य असते तर मी तशी इच्छा केली असती. ते इस्राएली आहेत; दत्तकपणा, ईश्वरी तेज, करारमदार, नियमशास्त्रदान, उपासना व अभिवचने ही त्यांची आहेत; महान पूर्वजही त्यांचे आहेत व त्यांच्यापासून देहदृष्ट्या ख्रिस्त आहे, तो सर्वांवर असून युगानुयुग धन्यवादित देव आहे; आमेन. तरी देवाचे वचन व्यर्थ झाले असे नाही; कारण इस्राएल वंशातले ते सर्व इस्राएल आहेत असे नाही. आणि ते अब्राहामाचे संतान आहेत म्हणून ते सर्व त्याची मुले आहेत असे नाही, तर “इसहाकाच्याच वंशाला तुझे संतान म्हणतील.” म्हणजे देहाद्वारे झालेली मुले देवाची मुले आहेत असे नाही तर अभिवचनानुसार जन्मलेली मुलेच संतान अशी गणण्यात येतात. कारण, “पुढे ह्याच सुमारास मी येईन तेव्हा सारेला पुत्र होईल,” ह्या शब्दांत ते अभिवचन दिलेले होते. इतकेच नव्हे, तर रिबकाही एकापासून म्हणजे आपला पूर्वज इसहाक ह्याच्यापासून गरोदर राहिल्यावर, मुले अजून जन्मली नव्हती व त्यांनी काही बरेवाईट केले नव्हते, तेव्हा निवडीसंबंधाने देवाचा जो संकल्प असतो, म्हणजे जो कर्मांमुळे नव्हे, तर पाचारण करणार्‍याच्या इच्छेने असतो, तो कायम राहावा, म्हणून तिला सांगण्यात आले की, “वडील धाकट्याची सेवा करील.” त्याचप्रमाणे शास्त्रात असे लिहिले आहे की, “मी याकोबावर प्रीती केली आणि एसावाचा द्वेष केला.” तर आपण काय म्हणावे? देवाच्या ठायी अन्याय आहे काय? कधीच नाही! कारण तो मोशेला म्हणतो, “ज्या कोणावर मी दया करतो त्याच्यावर मी दया करीन आणि ज्या कोणावर मी करुणा करतो त्याच्यावर मी करुणा करीन.”