YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस पत्र 15

15
सशक्त व अशक्त
1आपण जे सशक्त आहोत त्या आपण आपल्याच सुखाकडे न पाहता अशक्तांच्या दुर्बलतेचा भार वाहिला पाहिजे.
2आपल्यापैकी प्रत्येकाने शेजार्‍याची उन्नती होण्याकरता त्याचे बरे करून त्याच्या सुखाकडे पाहावे.
3कारण ख्रिस्तानेही स्वतःच्या सुखाकडे पाहिले नाही; तर “तुझी निंदा करणार्‍यांनी केलेली निंदा माझ्यावर आली,” ह्या शास्त्रलेखाप्रमाणे ते झाले.
4धीराच्या व शास्त्रापासून मिळणार्‍या उत्तेजनाच्या योगे आपण आशा धरावी म्हणून जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपल्या शिक्षणाकरता लिहिले.
5,6आता तुम्ही एकमताने व एकमुखाने आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा जो पिता आणि देव त्याचा गौरव करावा म्हणून धीर व उत्तेजन देणारा देव असे करो की, ख्रिस्त येशूप्रमाणे तुम्ही परस्पर एकचित्त व्हावे.
परराष्ट्रीय
7म्हणून देवाच्या गौरवाकरता ख्रिस्ताने तुमचाआमचा स्वीकार केला तसा तुम्हीही एकमेकांचा स्वीकार करा.
8,9कारण मी असे म्हणतो की, देवाच्या सत्याकरता ख्रिस्त सुंता झालेल्या लोकांचा सेवक झाला; असे की, पूर्वजांना दिलेली अभिवचने त्याने निश्‍चित करावीत आणि परराष्ट्रीयांनी त्याच्या दयेमुळे देवाचा गौरव करावा. शास्त्रात असे लिहिले आहे की,
“म्हणून परराष्ट्रीयांमध्ये मी तुझे स्तवन करीन
व तुझ्या नावाचे स्तोत्र गाईन.”
10“परराष्ट्रीयांनो, त्याच्या प्रजेबरोबर
जयजयकार करा,” असे तो पुन्हा म्हणतो.
11“सर्व परराष्ट्रीयांनो, परमेश्वराचे स्तवन करा;
आणि सर्व लोक त्याचे स्तवन करोत,”
असेही तो पुन्हा म्हणतो.
12आणखी यशया म्हणतो,
“इशायाला अंकुर फुटेल,
तो परराष्ट्रीयांवर अधिकार करण्यास उभा राहील;
त्याच्यावर परराष्ट्रीय आशा ठेवतील.”
13आता आशेचा देव विश्वास ठेवण्यामुळे तुम्हांला संपूर्ण आनंदाने व शांतीने भरो, अशाकरता की, तुम्हांला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त व्हावी.
पौलाने प्रशस्तपणे लिहिण्याचे कारण
14बंधुजनहो, तुम्ही चांगुलपणाने भरलेले, सर्व प्रकारच्या ज्ञानाने संपन्न झालेले व एकमेकांना बोध करायला समर्थ आहात अशी तुमच्याविषयी माझी स्वतःचीही खातरी झाली आहे.
15तरी मला देवापासून प्राप्त झालेल्या कृपेमुळे मी तुम्हांला आठवण देऊन थोडेबहुत अधिक धैर्याने लिहिले आहे;
16ती कृपा अशी की, मी परराष्ट्रीयांसाठी येशू ख्रिस्ताचा सेवक होऊन देवाच्या सुवार्तेचा याजक व्हावे; अशासाठी की, परराष्ट्रीय हेच अर्पण पवित्र आत्म्याने शुद्ध होऊन मान्य व्हावे.
17ह्यावरून देवाच्या गोष्टींसंबंधाने ख्रिस्त येशूविषयी मला अभिमान वाटतो.
18,19ख्रिस्ताने माझ्या हातून न घडवलेले काही सांगण्याचे धाडस मी करणार नाही; तर परराष्ट्रीयांनी आज्ञापालन करावे म्हणून त्याने माझ्या शब्दांनी व कृतींनी, चिन्हे व अद्भुते ह्यांच्या सामर्थ्याने, देवाच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जे जे घडवले तेच मी सांगतो; ते हे की, यरुशलेमेपासून सभोवती इल्लूरिकमापर्यंत मी ख्रिस्ताची सुवार्ता पूर्णपणे सांगितली आहे.
20आणि दुसर्‍याच्या पायावर बांधू नये म्हणून, ख्रिस्ताचे नाव घेतात तेथे नाही, तर
21“त्याची वार्ता ज्या लोकांना
कोणी सांगितली नाही ते पाहतील,
ज्यांनी ऐकली नाही ते समजतील;”
ह्या शास्त्रलेखाप्रमाणे सुवार्ता सांगण्याची मला हौस होती.
पौलाचे पुढील बेत
22ह्यामुळे मला तुमच्याकडे येण्यास अनेक वेळा अडथळा झाला.
23परंतु आता ह्या प्रांतात मला ठिकाण राहिले नाही, आणि मला पुष्कळ वर्षे तुमच्याकडे येण्याची उत्कंठा आहे;
24म्हणून मी स्पेन देशाला जाईन तेव्हा तुमच्याकडे येईन (कारण तिकडे जाताना मी तुम्हांला भेटेन आणि तुमच्या सहवासाने काहीसे मन भरल्यावर तुम्ही माझी तिकडे बोळवण कराल अशी मी आशा धरतो.)
25सध्या तर मी पवित्र जनांची सेवा करत करत यरुशलेमेस जातो.
26कारण यरुशलेमेतील पवित्र जनांतल्या गोरगरिबांसाठी काही आर्थिक साहाय्य करणे मासेदोनिया व अखया येथील लोकांना बरे वाटले होते.
27त्यांना बरे वाटले होते खरे आणि ते त्यांचे ऋणी आहेत; कारण जर परराष्ट्रीय त्यांच्या आध्यात्मिक गोष्टींचे अंशभागी झाले आहेत, तर ऐहिक गोष्टींत त्यांची सेवा करण्यास ते त्यांचे ऋणी आहेत.
28ह्यास्तव हे फळ म्हणून त्यांच्या पदरात टाकून झाले की तुमच्याकडील वाटेने मी स्पेन देशास जाईन;
29आणि जेव्हा मी तुमच्याकडे येईन तेव्हा ख्रिस्ताच्या [सुवार्तेच्या]आशीर्वादाच्या परिपूर्णतेने भरलेला असा येईन हे मला ठाऊक आहे.
प्रार्थना करण्याची विनंती
30बंधुजनहो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामुळे व आत्म्याच्या द्वारे निष्पन्न झालेल्या प्रेमामुळे मी तुम्हांला विनंती करतो की माझ्यासाठी देवाजवळ माझ्याबरोबर आग्रहाने प्रार्थना करा;
31ह्यासाठी की, यहूदीयात जे अवज्ञा करणारे आहेत त्यांच्यापासून माझी सुटका व्हावी,
32अशी की, मी देवाच्या इच्छेने तुमच्याकडे आनंदाने येऊन तुमच्याबरोबर विश्रांती घ्यावी.
33आता शांतीचा देव तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.

सध्या निवडलेले:

रोमकरांस पत्र 15: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन