YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रकटी 3

3
सार्दीस येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र
1सार्दीस येथील मंडळीच्या दूताला लिही : ‘ज्याच्याजवळ देवाचे सात आत्मे आहेत व सात तारे आहेत तो असे म्हणतो : तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत; तू जिवंत आहेस असे तुझ्याविषयी म्हणतात, पण तू मेलेला आहेस.
2जागृत हो, आणि जे मरणाच्या पंथास लागले आहे ते सावरून धर; कारण तुझी कृत्ये माझ्या देवाच्या दृष्टीने पूर्ण अशी माझ्या पाहण्यात आली नाहीत.
3म्हणून तू कसे स्वीकारलेस व ऐकलेस ह्याची आठवण कर; ते जतन करून ठेव व पश्‍चात्ताप कर; कारण तू जागृत झाला नाहीस तर मी चोरासारखा येईन; मी कोणत्या घटकेस तुझ्यावर चालून येईन हे तुला मुळीच कळणार नाही.
4तरी ज्यांनी आपली वस्त्रे विटाळली नाहीत, अशी थोडकी नावे सार्दीस येथे तुझ्याजवळ आहेत; ते शुभ्र वस्त्रे परिधान करून माझ्याबरोबर फिरतील, कारण तशी त्यांची योग्यता आहे.
5जो विजय मिळवतो तो अशा रीतीने शुभ्र वस्त्रे परिधान केलेला होईल; मी ‘जीवनाच्या पुस्तकातून’ त्याचे नाव ‘खोडणारच’ नाही, आणि माझ्या पित्यासमोर व त्याच्या दूतांसमोर मी त्याचे नाव पत्करीन.
6आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको.
फिलदेल्फिया येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र
7फिलदेल्फिया येथील मंडळीच्या दूताला लिही :
‘जो पवित्र व सत्य आहे, ज्याच्याजवळ ‘दाविदाची किल्ली आहे, ज्याने उघडल्यावर कोणी बंद करणार नाही आणि ज्याने बंद केल्यावर कोणी उघडणार नाही,’ तो असे म्हणतो :
8तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. पाहा, मी तुझ्यापुढे दार उघडून ठेवले आहे, ते कोणी बंद करू शकत नाही; तुला शक्ती थोडी आहे, तरी तू माझे वचन पाळलेस व माझे नाव नाकारले नाहीस.
9पाहा, जे सैतानाच्या सभेचे असून आपणांला यहूदी म्हणवतात पण तसे नाहीत, ते खोटे बोलतात; त्यांच्यापैकी कित्येकांना मी तुझ्या स्वाधीन करीन. पाहा, ते ‘येऊन तुझ्या पायांजवळ तुला नमन करतील’ व ‘मी तुझ्यावर प्रीती केली आहे’ हे त्यांना कळून येईल, असे मी करीन.
10धीराविषयीचे माझे वचन तू राखले आहेस म्हणून पृथ्वीवर राहणार्‍या लोकांची परीक्षा होण्याचा जो परीक्षाप्रसंग सर्व जगावर येणार आहे, त्यापासूनही मी तुला राखीन.
11मी लवकर येतो; तुझा मुकुट कोणी घेऊ नये म्हणून जे तुझ्याजवळ आहे ते दृढ धरून राहा.
12जो विजय मिळवतो त्याला मी माझ्या देवाच्या मंदिरातील स्तंभ करीन; तो तेथून कधीही बाहेर जाणार नाही; त्याच्यावर माझ्या देवाचे नाव, स्वर्गातून माझ्या देवापासून उतरणारे नवे यरुशलेम, म्हणजे माझ्या देवाची ‘नगरी, हिचे नाव,’ आणि माझे ‘नवे नाव’ लिहीन.
13आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको.
लावदिकीया येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र
14लावदिकीया येथील मंडळीच्या दूताला लिही :
‘जो आमेन, जो ‘विश्वसनीय’ व खरा ‘साक्षी’, जो देवाच्या ‘सृष्टीचे आदिकारण’ तो असे म्हणतो :
15तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत; तू शीत नाहीस व उष्ण नाहीस. तू शीत किंवा उष्ण असतास तर बरे होते;
16पण तू तसा नाहीस, कोमट आहेस; म्हणजे उष्ण नाहीस, शीत नाहीस, म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे.
17मी श्रीमंत आहे, मी ‘धन मिळवले आहे,’ व मला काही उणे नाही असे तू म्हणतोस; पण तू कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा व उघडावाघडा आहेस, हे तुला कळत नाही.
18म्हणून मी तुला मसलत देतो की, श्रीमंत होण्यासाठी तू अग्नीने शुद्ध केलेले सोने माझ्यापासून विकत घे; तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यात येऊ नये म्हणून नेसायला शुभ्र वस्त्रे विकत घे; आणि तुला दृष्टी यावी म्हणून डोळ्यांत घालण्यास अंजन विकत घे.
19‘जितक्यांवर मी प्रेम करतो तितक्यांचा निषेध करून त्यांना शिक्षा करतो;’ म्हणून आस्था बाळग आणि पश्‍चात्ताप कर.
20पाहा, मी दाराशी उभा आहे व दार ठोकत आहे; जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील, तर मी त्याच्याजवळ आत जाईन व त्याच्याबरोबर जेवीन, आणि तो माझ्याबरोबर जेवील.
21मी जसा विजय मिळवून आपल्या पित्याबरोबर त्याच्या राजासनावर बसलो, तसा जो विजय मिळवतो त्याला मी आपल्या राजासनावर आपल्याबरोबर बसू देईन.
22आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको.”

सध्या निवडलेले:

प्रकटी 3: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन