YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रकटी 3:14-22

प्रकटी 3:14-22 MARVBSI

लावदिकीया येथील मंडळीच्या दूताला लिही : ‘जो आमेन, जो ‘विश्वसनीय’ व खरा ‘साक्षी’, जो देवाच्या ‘सृष्टीचे आदिकारण’ तो असे म्हणतो : तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत; तू शीत नाहीस व उष्ण नाहीस. तू शीत किंवा उष्ण असतास तर बरे होते; पण तू तसा नाहीस, कोमट आहेस; म्हणजे उष्ण नाहीस, शीत नाहीस, म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे. मी श्रीमंत आहे, मी ‘धन मिळवले आहे,’ व मला काही उणे नाही असे तू म्हणतोस; पण तू कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा व उघडावाघडा आहेस, हे तुला कळत नाही. म्हणून मी तुला मसलत देतो की, श्रीमंत होण्यासाठी तू अग्नीने शुद्ध केलेले सोने माझ्यापासून विकत घे; तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यात येऊ नये म्हणून नेसायला शुभ्र वस्त्रे विकत घे; आणि तुला दृष्टी यावी म्हणून डोळ्यांत घालण्यास अंजन विकत घे. ‘जितक्यांवर मी प्रेम करतो तितक्यांचा निषेध करून त्यांना शिक्षा करतो;’ म्हणून आस्था बाळग आणि पश्‍चात्ताप कर. पाहा, मी दाराशी उभा आहे व दार ठोकत आहे; जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील, तर मी त्याच्याजवळ आत जाईन व त्याच्याबरोबर जेवीन, आणि तो माझ्याबरोबर जेवील. मी जसा विजय मिळवून आपल्या पित्याबरोबर त्याच्या राजासनावर बसलो, तसा जो विजय मिळवतो त्याला मी आपल्या राजासनावर आपल्याबरोबर बसू देईन. आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको.”