YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 90

90
भाग चौथा
देवाची अक्षयता व मानवाची क्षणभंगुरता
देवाचा भक्त मोशे ह्याची प्रार्थना.
1हे प्रभू, तू पिढ्यानपिढ्या आम्हांला निवासस्थान आहेस.
2पर्वत उत्पन्न झाले त्यापूर्वी, तू पृथ्वी व जग निर्माण केलेस त्यापूर्वीच अनादि कालापासून अनंतकालापर्यंत तू देव आहेस.
3तू मनुष्याला पुन्हा मातीस मिळवतोस, आणि म्हणतोस, “अहो मानवांनो, परत जा.”
4कारण तुझ्या दृष्टीने सहस्र वर्षें कालच्या गेलेल्या दिवसासारखी, रात्रीच्या प्रहरासारखी आहेत.
5तू पुराप्रमाणे मानवांना घेऊन जातोस; ते निद्रेप्रमाणे क्षणिक आहेत,1 सकाळी उगवणार्‍या गवताप्रमाणे ते आहेत;
6सकाळी ते तरारून वाढते; संध्याकाळी ते कापल्यावर वाळून जाते.
7कारण आम्ही तुझ्या क्रोधाने भस्म होतो, तुझ्या संतापाने आम्ही घाबरून जातो,
8तू आमचे अपराध आपल्यापुढे ठेवले आहेत; आमची गुप्त पातके आपल्या मुखप्रकाशात ठेवली आहेत.
9तुझ्या क्रोधात आमचे सर्व दिवस गुदरतात; आम्ही आमचे आयुष्य चंचल ध्वनीप्रमाणे घालवतो.
10आमचे आयुष्य सत्तर वर्षे आणि शक्ती असल्यास फार तर ऐंशी वर्षे असले, तरी त्याचा डामडौल केवळ कष्टमय व दु:खमय आहे, कारण ते लवकर सरते आणि आम्ही निघून जातो.
11तुझ्या क्रोधाचे बळ कोणाला समजते? आणि तुझे भय बाळगण्याइतकी कोणाला तुझ्या कोपाची जाणीव आहे?
12ह्यासाठी आम्हांला आमचे दिवस असे गणण्यास शिकव की, आम्हांला सुज्ञ अंतःकरण प्राप्त होईल.
13हे परमेश्वरा, परत फीर; किती वेळ लावशील? तू आपल्या सेवकांवर करुणा कर.
14तू आपल्या दयेने आम्हांला प्रभातीच तृप्त कर, म्हणजे आम्ही हर्षभरित होऊन आमचे सर्व दिवस आनंदात घालवू.
15जेवढे दिवस तू आम्हांला पिडले, जेवढी वर्षे आम्ही अरिष्ट पाहिले त्या मानाने आम्हांला आनंदित कर.
16तुझी कृती तुझ्या सेवकांना, तुझे वैभव त्यांच्या मुलांना प्रकट होऊ दे.
17परमेश्वर जो आमचा देव त्याचा प्रसाद आमच्यावर होवो; आमच्या हातचे काम आमच्यासाठी सिद्धीस ने, आमच्या हातचे काम सिद्धीस ने.

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 90: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन