YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 89:1-18

स्तोत्रसंहिता 89:1-18 MARVBSI

परमेश्वराच्या दयेविषयी मी नित्य गीत गाईन; मी आपल्या मुखाने पिढ्यानपिढ्यांना तुझी सत्यता कळवीन. कारण मी म्हणालो, तुझ्या दयेची उभारणी सदोदित राहील; स्वर्गात तुझी सत्यता तूच स्थापली आहेस. “मी आपल्या निवडलेल्या पुरुषाशी करार केला आहे; मी आपला सेवक दावीद ह्याच्याशी शपथ वाहिली आहे : ‘मी तुझ्या संततीची परंपरा सर्वकाळ चालवीन, तुझे राजासन सर्व पिढ्यांसाठी स्थिर स्थापीन;” (सेला) हे परमेश्वरा, तुझ्या अद्भुत कृतींची स्तुती आकाश करील; तुझ्या सत्यतेची स्तुती पवित्र जनांच्या मंडळीत होईल. कारण परमेश्वराशी तुलना करता येईल असा आकाशात कोण आहे? देवदूतांमध्ये परमेश्वरासमान कोण आहे? पवित्र जनांच्या सभेत भीती बाळगण्यास योग्य असा देव तो आहे; त्याच्या सभोवतालच्या सर्वांपेक्षा तो भीतिप्रद आहे. हे सेनाधीश देवा, परमेश्वरा, हे परमेशा, तुझ्यासारखा समर्थ कोण आहे? तुझी सत्यता तुझ्याभोवती आहे. समुद्राच्या खळबळाटावर तू अधिकार चालवतोस; तो उचंबळतो तेव्हा त्याच्या लाटा तू शांत करतोस. तू राहाबाला1 ठेचून ठार केले आहेस; तू आपल्या बाहुबलाने आपल्या शत्रूंची दाणादाण केली आहेस. आकाश तुझे आहे, पृथ्वीही तुझी आहे; जग व त्यातले सर्वकाही तूच स्थापले आहेस. उत्तर व दक्षिण ह्या तू उत्पन्न केल्यास; ताबोर व हर्मोन तुझ्या नावाचा जयजयकार करतात. तुझा भुज पराक्रमी आहे; तुझा हात बळकट आहे, तुझा उजवा हात उभारलेला आहे. नीती व न्याय ही तुझ्या राजासनाचा पाया आहेत; दया व सत्य तुझे सेवक आहेत. ज्या लोकांना उत्साहशब्दाचा परिचय आहे ते धन्य! हे परमेश्वरा, ते तुझ्या मुखप्रकाशात चालतात. ते तुझ्या नावामुळे नेहमी उल्लास करतात; तुझ्या न्यायपरायणतेने त्यांची उन्नती होते. कारण त्यांच्या बलाचे वैभव तू आहेस; तुझ्या प्रसादाने आमचा उत्कर्ष होत राहील.2 आमची ढाल परमेश्वराच्या मालकीची आहे; आमचा राजाही इस्राएलाच्या पवित्र प्रभूचा आहे.