YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 89:1-18

स्तोत्रसंहिता 89:1-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मी परमेश्वराच्या विश्वासाच्या कराराच्या कृतीचे गीत सर्वकाळ गाईन. मी तुझी सत्यता भावी पिढ्यांना जाहीर करीन. कारण मी म्हणालो आहे की, विश्वासाचा करार सर्वकाळासाठी स्थापित होईल; तुझी सत्यता स्वर्गात तूच स्थापन केली आहेस. मी माझ्या निवडलेल्याशी करार केला आहे, मी आपला सेवक दावीद ह्याच्याशी शपथ वाहिली आहे. मी तुझ्या वंशाजांची स्थापना सर्वकाळ करीन, आणि तुझे राजासन सर्व पिढ्यांसाठी स्थापिन. हे परमेश्वरा, तुझ्या विस्मयकारक कृतीची स्तुती आकाश करील, तुझ्या सत्यतेची स्तुती पवित्रजनांच्या मंडळीत होईल. कारण परमेश्वराशी तुलना होऊ शकेल असा आकाशात कोण आहे? देवाच्या मुलांपैकी परमेश्वरासारखा कोण आहे? पवित्र जनांच्या सभेत ज्याचा सन्मान होतो असा तो देव आहे; आणि त्याच्या सभोवती असणाऱ्या सर्वांपेक्षा तो भितीदायक आहे. हे सेनाधीश देवा, परमेश्वरा, हे परमेश्वरा, तुझ्यासारखा कोण समर्थ आहे? तुझी सत्यता तुझ्याभोवती आहे? समुद्राच्या खवळण्यावर तू अधिकार चालवतोस; जेव्हा त्याच्या लाटा उसळतात, तेव्हा तू त्यांना शांत करतोस. तू राहाबाला ठेचून त्याचा चुराडा केलास. तू तुझ्या बलवान बाहूंनी आपल्या शत्रूंना पांगवलेस. आकाश तुझे आहे आणि पृथ्वीही तुझी आहे. तू जग आणि त्यातले सर्वकाही निर्माण केलेस. उत्तर आणि दक्षिण निर्माण केल्या. ताबोर आणि हर्मोन तुझ्या नावाचा जयजयकार करतात. तुला पराक्रमी भुज आहे आणि तुला बळकट हात आहे व तुझा उजवा हात उंचावला आहे. निती आणि न्याय तुझ्या राजासनाचा पाया आहेत. कराराचा विश्वास आणि सत्य तुझ्यासमोर आहेत. जे तुझी उपासना करतात ते आशीर्वादित आहेत. हे परमेश्वरा ते तुझ्या मुखप्रकाशात चालतात. ते दिवसभर तुझ्या नावाची स्तुती करतात, आणि तुझ्या न्यायीपणाने ते तुला उंचावतात. त्यांच्या शक्तीचे वैभव तू आहेस, आणि तुझ्या कृपेने आम्ही विजयी आहोत. कारण आमची ढाल परमेश्वराची आहे; इस्राएलाचा पवित्र देव आमचा राजा आहे.

स्तोत्रसंहिता 89:1-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

परमेश्वराच्या दयेविषयी मी नित्य गीत गाईन; मी आपल्या मुखाने पिढ्यानपिढ्यांना तुझी सत्यता कळवीन. कारण मी म्हणालो, तुझ्या दयेची उभारणी सदोदित राहील; स्वर्गात तुझी सत्यता तूच स्थापली आहेस. “मी आपल्या निवडलेल्या पुरुषाशी करार केला आहे; मी आपला सेवक दावीद ह्याच्याशी शपथ वाहिली आहे : ‘मी तुझ्या संततीची परंपरा सर्वकाळ चालवीन, तुझे राजासन सर्व पिढ्यांसाठी स्थिर स्थापीन;” (सेला) हे परमेश्वरा, तुझ्या अद्भुत कृतींची स्तुती आकाश करील; तुझ्या सत्यतेची स्तुती पवित्र जनांच्या मंडळीत होईल. कारण परमेश्वराशी तुलना करता येईल असा आकाशात कोण आहे? देवदूतांमध्ये परमेश्वरासमान कोण आहे? पवित्र जनांच्या सभेत भीती बाळगण्यास योग्य असा देव तो आहे; त्याच्या सभोवतालच्या सर्वांपेक्षा तो भीतिप्रद आहे. हे सेनाधीश देवा, परमेश्वरा, हे परमेशा, तुझ्यासारखा समर्थ कोण आहे? तुझी सत्यता तुझ्याभोवती आहे. समुद्राच्या खळबळाटावर तू अधिकार चालवतोस; तो उचंबळतो तेव्हा त्याच्या लाटा तू शांत करतोस. तू राहाबाला1 ठेचून ठार केले आहेस; तू आपल्या बाहुबलाने आपल्या शत्रूंची दाणादाण केली आहेस. आकाश तुझे आहे, पृथ्वीही तुझी आहे; जग व त्यातले सर्वकाही तूच स्थापले आहेस. उत्तर व दक्षिण ह्या तू उत्पन्न केल्यास; ताबोर व हर्मोन तुझ्या नावाचा जयजयकार करतात. तुझा भुज पराक्रमी आहे; तुझा हात बळकट आहे, तुझा उजवा हात उभारलेला आहे. नीती व न्याय ही तुझ्या राजासनाचा पाया आहेत; दया व सत्य तुझे सेवक आहेत. ज्या लोकांना उत्साहशब्दाचा परिचय आहे ते धन्य! हे परमेश्वरा, ते तुझ्या मुखप्रकाशात चालतात. ते तुझ्या नावामुळे नेहमी उल्लास करतात; तुझ्या न्यायपरायणतेने त्यांची उन्नती होते. कारण त्यांच्या बलाचे वैभव तू आहेस; तुझ्या प्रसादाने आमचा उत्कर्ष होत राहील.2 आमची ढाल परमेश्वराच्या मालकीची आहे; आमचा राजाही इस्राएलाच्या पवित्र प्रभूचा आहे.