YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 88

88
मृत्यूपासून सुटका व्हावी म्हणून प्रार्थना
कोरहपुत्रांचे संगीतस्तोत्र, मुख्य गवयासाठी; महलथ लेअन्नोथ ह्या चालीवर गायचे, एज्राही हेमान ह्याचे मस्कील (बोधपर स्तोत्र).
1हे परमेश्वरा, माझ्या उद्धारक देवा, मी रात्रंदिवस तुझ्यापुढे आरोळी करतो;
2माझी प्रार्थना तुझ्यापुढे सादर होवो; माझ्या विनवणीकडे तुझा कान असू दे;
3कारण माझा जीव क्लेशांनी व्यापला आहे; माझा प्राण अधोलोकाजवळ जाऊन पोहचला आहे.
4गर्तेत पडणार्‍यांत माझी गणना झाली आहे; मी निराधार वीरासारखा झालो आहे;
5मला प्रेतांमध्ये टाकले आहे; वध होऊन जे कबरेत पडले आहेत, ज्यांची आठवण तू कधी करीत नाहीस, ज्यांचा तुझ्या हाताचा आधार तुटला आहे, त्यांच्यासारखा मी झालो आहे.
6गर्तेच्या अगदी तळाशी, अंधकारमय स्थली, खोल डोहात तू मला टाकले आहेस.
7तुझ्या संतापाचा भार माझ्यावर पडला आहे, तू आपल्या सर्व लाटांनी मला पिडले आहेस.
(सेला)
8तू माझ्या परिचितांना माझ्यापासून दूर केले आहेस, त्यांना माझा वीट येईल असे तू मला केले आहेस; मी कोंडलेला आहे, माझ्याने बाहेर निघवत नाही.
9कष्टामुळे माझे डोळे क्षीण झाले आहेत; हे परमेश्वरा, मी दररोज तुझा धावा करतो; तुझ्यापुढे मी आपले हात पसरतो.
10मृतांसाठी तू अद्भुत कृत्ये करशील काय? प्रेते उठून तुझी स्तुती करतील काय?
(सेला)
11तुझ्या कृपेचे वर्णन शवगर्तेत होईल काय? विनाशस्थानी तुझ्या सत्यतेचे वर्णन होईल काय?
12अंधकारात तुझी अद्भुत कृत्ये प्रकट होतील काय? विस्मरणलोकी तुझे नीतिमत्त्व प्रकट होईल काय?
13मी तर, हे परमेश्वरा, तुझा धावा करतो; प्रातःकाळी माझी प्रार्थना तुझ्यापुढे सादर होते.
14हे परमेश्वरा, तू माझ्या जिवाचा त्याग का करतोस? तू आपले मुख माझ्यापासून का लपवतोस?
15मी तरुणपणापासून पीडा पावून मरणोन्मुख झालो आहे; तुझ्या भीतीने मी व्याकूळ झालो आहे.
16तुझा क्रोध माझ्यावर ओढवला आहे; तुझ्या धाकाने मी केवळ नष्टप्राय झालो आहे.
17त्यांनी जलाप्रमाणे मला दिवसभर घेरले आहे; त्यांनी मला सर्वस्वी वेढून टाकले आहे.
18तू माझ्यापासून प्रियजन व मित्र दूर केले आहेत, माझ्या परिचयाचा काय तो अंधकारच आहे.

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 88: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन