YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 62:5-12

स्तोत्रसंहिता 62:5-12 MARVBSI

हे माझ्या जिवा, तू केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहा; कारण माझी आशापूर्ती करणारा तो आहे. तोच केवळ माझा खडक, तोच माझे तारण आहे, तोच माझा उंच गड आहे; मी ढळणार नाही. माझे तारण व माझे वैभव देवावर अवलंबून आहे; माझ्या बलाचा दुर्ग, माझा आश्रय देवच आहे; अहो लोकहो, सर्वदा त्याच्यावर भाव ठेवा; त्याच्यापुढे आपले मन मोकळे करा; देव आमचा आश्रय आहे. (सेला) मानवप्राणी केवळ वाफ आहेत; ते केवळ मिथ्या आहेत; तराजूत घातले असता ते हलके भरतील; ते सर्व वाफच आहेत. जुलूमजबरदस्तीवर भिस्त ठेवू नका, लूट केल्याची शेखी मिरवू नका; संपत्ती वाढली तरी तिच्यावर चित्त ठेवू नका. एकदा देव बोलला आहे; मी दोनदा हे ऐकले आहे की, सामर्थ्य देवाचे आहे. शिवाय, हे प्रभू, तुझ्याच ठायी वात्सल्य आहे; कारण प्रत्येकाला त्याच्या कृतीप्रमाणे तू प्रतिफळ देतोस.