YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 55:1-14

स्तोत्रसंहिता 55:1-14 MARVBSI

हे देवा, माझ्या प्रार्थनेकडे कान दे; माझ्या विनंतीपासून तोंड फिरवू नकोस. माझ्याकडे लक्ष दे, माझे ऐक; मी चिंताक्रांत होऊन तळमळत व कण्हत आहे; आणि ते वैर्‍याच्या शब्दामुळे व दुर्जनाच्या जाचामुळे; कारण ते माझ्यावर अरिष्ट आणतात व क्रोधाने माझ्या पाठीस लागतात. माझ्या ठायी माझ्या हृदयाला यातना होत आहेत; मरणाचे भय माझ्यावर कोसळले आहे. भीती व कापरे ही माझ्यावर येऊन गुदरली आहेत; धडकीने मला व्यापले आहे. मी म्हटले, “मला पारव्यासारखे पंख असते तर मी उडून जाऊन आराम पावलो असतो; पाहा, मी दूर निघून गेलो असतो व रानात वस्ती केली असती; (सेला) प्रचंड वायू व वादळ ह्यांच्यापासून आसरा मिळवण्याची मी त्वरा केली असती!” हे प्रभू, त्यांचा विध्वंस कर, त्यांच्या भाषेचा गोंधळ कर; कारण मी नगरात जुलूम व कलह पाहिले आहेत. अहोरात्र त्याच्या कोटावर ते सभोवताली फिरतात; त्यामध्ये दुष्टाई व उपद्रवही चालू आहेत. त्यामध्ये अनर्थ माजला आहे; त्याच्या पेठेतून जुलूम व कपट ही निघून जात नाहीत; कारण ज्याने माझी निंदा केली तो काही माझा वैरी नव्हता; असता तर मी ते सहन केले असते; माझ्यापुढे ज्याने तोरा मिरवला तो काही माझा शत्रू नव्हता; असता तर मी त्याच्यापासून लपून राहिलो असतो; पण तो तूच माझ्या बरोबरीचा माणूस, माझा सोबती व माझा सलगीचा मित्र होतास. आम्ही एकमेकांशी गोडगोड गोष्टी बोलत असू, देवाच्या घरी मेळ्याबरोबर जात असू.