YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 55:1-14

स्तोत्रसंहिता 55:1-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

हे देवा, माझ्या प्रार्थनेकडे कान लाव, आणि माझ्या विणवनीपासून लपू नकोस. देवा, माझ्याकडे लक्ष लाव आणि मला उत्तर दे माझ्या संकटात मला विसावा नाही. माझ्या शत्रूंच्या आवाजामुळे, दुष्टाच्या जुलूमामुळे मी कण्हत आहे, कारण ते माझ्यावर संकट आणतात, आणि द्वेषात माझा पाठलाग करतात. माझे हृदय फार दुखणाईत आहे, आणि मृत्यूचे भय माझ्यावर येऊन पडले आहे. भय आणि थरथरने माझ्यावर आली आहेत, आणि भयाने मला ग्रासले आहे. मला कबूतरासारखे पंख असते तर किती बरे झाले असते. मी दूर उडून गेलो असतो आणि स्वस्थ राहिलो असतो. मी खूप दूर भटकत गेलो असतो. मी रानात राहिलो असतो. वादळी वाऱ्यापासून मला आश्रय मिळावा म्हणून मी लवकर पळालो असतो. प्रभू, त्यांना नाश कर, आणि त्यांच्या भाषेत गोंधळ निर्माण कर. कारण मी शहरात हिंसा आणि भांडणे पाहिली आहेत. दिवस रात्र ते भींतीवर चढून जातात; अपराध आणि अनर्थ तिच्यामध्ये आहेत. दुष्टपणा तिच्यामध्ये कार्य करत आहे, जुलूम आणि कपट कधीही तिच्या रस्त्यांना सोडत नाही. कारण जर माझ्या शत्रूंनी मला दोष लावला असता तर तर मला कळून आले असते, किंवा माझा द्वेष करणारा जो माझ्याविरूद्ध उठला असता, तर मी स्वतःला त्याजपासून लपवले असते. परंतु मला संकटात टाकणारा तू आहेस, माझा मित्र, माझा साथीदार, माझा दोस्त. एकमेकांसोबत आपली गोड सहभागिता होती. आपण समुदायांबरोबर चालत देवाच्या घरात जात होतो.

स्तोत्रसंहिता 55:1-14 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

हे परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐका; माझ्या विनवणीकडे दुर्लक्ष करू नका. माझे ऐका आणि मला उत्तर द्या; माझ्या विचारांनी मी त्रस्त आणि व्याकूळ झालो आहे. माझ्या शत्रूंच्या आवाजाने आणि दुष्टांच्या धमक्यांमुळे मी कण्हत आहे, कारण ते माझ्यावर अनर्थ आणतात आणि रागाने माझी निर्भत्सना करतात. माझ्या हृदयात अत्यंत मनोवेदना होत आहेत; मरणाची भीती मला दडपून टाकीत आहे. भीती आणि कंप यांनी मला ग्रस्त केले आहे. अतिभयाने मला ग्रासले आहे. अहाहा, मला कबुतराचे पंख असते तर किती उत्तम झाले असते! दूर उडत जाऊन मी विश्रांती घेतली असती. अतिदूरच्या रानात मी उडून गेलो असतो आणि तिथेच वस्ती केली असती. सेला या तुफानी वारा आणि वादळापासून मी माझ्या आश्रयस्थानी उडून गेलो असतो. प्रभू, दुष्टांमध्ये फूट पाडा, त्यांच्या शब्दांना गोंधळात टाका, कारण शहरात मला हिंसा आणि कलह दिसतात. रात्रंदिवस ते तटाभोवती फिरत असतात; दुष्टपणा व अनीतिमानपणा नगरात आहे. नगरात विध्वंसक शक्ती कार्यरत आहेत; धमक्या आणि खोट्या गोष्टी कधीही त्यांचा मार्ग सोडत नाही. ज्याने माझी निंदा केली, तो काही माझा शत्रू नव्हता; असता तर मी ते सहन केले असते; मी लपून बसलो असतो आणि निसटून गेलो असतो. परंतु माझी निंदा करणारा तूच होतास, माझ्यासारखाच मनुष्य, माझा सोबती आणि माझा जिवलग मित्र, जेव्हा आम्ही आराधकांसह चालत होतो, तेव्हा त्याच्यासोबत परमेश्वराच्या भवनातील मधुर सहभागितेचा मी आनंद घेतला होता.

स्तोत्रसंहिता 55:1-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

हे देवा, माझ्या प्रार्थनेकडे कान दे; माझ्या विनंतीपासून तोंड फिरवू नकोस. माझ्याकडे लक्ष दे, माझे ऐक; मी चिंताक्रांत होऊन तळमळत व कण्हत आहे; आणि ते वैर्‍याच्या शब्दामुळे व दुर्जनाच्या जाचामुळे; कारण ते माझ्यावर अरिष्ट आणतात व क्रोधाने माझ्या पाठीस लागतात. माझ्या ठायी माझ्या हृदयाला यातना होत आहेत; मरणाचे भय माझ्यावर कोसळले आहे. भीती व कापरे ही माझ्यावर येऊन गुदरली आहेत; धडकीने मला व्यापले आहे. मी म्हटले, “मला पारव्यासारखे पंख असते तर मी उडून जाऊन आराम पावलो असतो; पाहा, मी दूर निघून गेलो असतो व रानात वस्ती केली असती; (सेला) प्रचंड वायू व वादळ ह्यांच्यापासून आसरा मिळवण्याची मी त्वरा केली असती!” हे प्रभू, त्यांचा विध्वंस कर, त्यांच्या भाषेचा गोंधळ कर; कारण मी नगरात जुलूम व कलह पाहिले आहेत. अहोरात्र त्याच्या कोटावर ते सभोवताली फिरतात; त्यामध्ये दुष्टाई व उपद्रवही चालू आहेत. त्यामध्ये अनर्थ माजला आहे; त्याच्या पेठेतून जुलूम व कपट ही निघून जात नाहीत; कारण ज्याने माझी निंदा केली तो काही माझा वैरी नव्हता; असता तर मी ते सहन केले असते; माझ्यापुढे ज्याने तोरा मिरवला तो काही माझा शत्रू नव्हता; असता तर मी त्याच्यापासून लपून राहिलो असतो; पण तो तूच माझ्या बरोबरीचा माणूस, माझा सोबती व माझा सलगीचा मित्र होतास. आम्ही एकमेकांशी गोडगोड गोष्टी बोलत असू, देवाच्या घरी मेळ्याबरोबर जात असू.