स्तोत्रसंहिता 145
145
परमेश्वराचे चांगुलपण व सामर्थ्य ह्यांबद्दल स्तुती
दाविदाचे स्तोत्र.
1हे राजा, माझ्या देवा, मी तुझी थोरवी गाईन; आणि सदासर्वकाळ तुझ्या नावाचा धन्यवाद करीन.
2मी प्रतिदिवशी तुझा धन्यवाद करीन; आणि सदासर्वकाळ तुझ्या नावाचे स्तवन करीन.
3परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे; त्याची थोरवी अगम्य आहे.
4एक पिढी दुसर्या पिढीपुढे तुझ्या कृत्यांची प्रशंसा करीत राहील, त्या तुझ्या पराक्रमाचे वर्णन करतील.
5तुझ्या वैभवाचा गौरवयुक्त प्रताप व तुझी अद्भुत कृत्ये ह्यांचे मी मनन करीन.
6तुझ्या भयावह कृत्यांचा पराक्रम लोक विदित करतील; मी तुझी थोरवी वर्णन करीन.
7ते तुझ्या परमदयेची आठवण काढतील; व तुझ्या न्यायपरायणतेचा गजर करतील.
8परमेश्वर कृपाळू व दयाळू आहे; तो मंदक्रोध व अतिदयाळू आहे.
9परमेश्वर सगळ्यांना चांगला आहे; त्याची कृपा त्याने केलेल्या सर्व कृत्यांवर आहे.
10हे परमेश्वरा, तुझी सर्व कृत्ये तुझी स्तुती गातात; आणि तुझे भक्त तुझा धन्यवाद करतात.
11ते तुझ्या राज्याचा महिमा वर्णन करतात, आणि तुझा पराक्रम कथन करतात;
12ह्यासाठी की, तुझे पराक्रम व तुझ्या राज्याचे वैभवयुक्त ऐश्वर्य ही मानवजातीस कळावी.
13तुझे राज्य युगानुयुग राहणारे राज्य आहे. तुझा राज्याधिकार पिढ्यानपिढ्या टिकणारा आहे.
14पतन पावणार्या सर्वांना परमेश्वर आधार देतो, व वाकलेल्या सर्वांना उभे करतो.
15सर्वांचे डोळे तुझ्याकडे लागतात; आणि तू त्यांना त्यांचे अन्न यथाकाळी देतोस.
16तू आपली मूठ उघडून सर्व प्राणिमात्रांची इच्छा पुरी करतोस.
17परमेश्वर आपल्या सर्व मार्गांत न्यायी आहे, तो आपल्या सर्व कृत्यांत दयाळू आहे.
18जे कोणी त्याचा धावा करतात, जे खर्या भावाने त्याचा धावा करतात, त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे.
19तो आपले भय धरणार्यांची इच्छा पुरवतो; व त्यांची आरोळी ऐकून त्यांना तारतो.
20परमेश्वर आपल्यावर प्रेम करणार्या सर्वांचे रक्षण करतो, पण सर्व दुर्जनांचा नाश करतो.
21माझे मुख परमेश्वराचे स्तवन करील; सर्व प्राणिमात्र त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद युगानुयुग करोत.
सध्या निवडलेले:
स्तोत्रसंहिता 145: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.