YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 139

139
देव सर्वसाक्षी व सर्वज्ञानी आहे
मुख्य गवयासाठी; दाविदाचे स्तोत्र.
1हे परमेश्वरा, तू मला पारखले आहेस, तू मला ओळखतोस.
2माझे बसणे व उठणे तू जाणतोस, तू दुरून माझे मनोगत समजतोस.
3तू माझे चालणे व माझे निजणे बारकाईने पाहतोस आणि माझ्या एकंदर वर्तनक्रमाची माहिती तुला आहे.
4हे परमेश्वरा, तुला मुळीच ठाऊक नाही, असा एकही शब्द माझ्या मुखातून निघत नाही.
5तू मागूनपुढून मला वेढले आहेस, माझ्यावर तू आपला हात ठेवला आहेस.
6हे ज्ञान माझ्या कल्पनेपलीकडचे आहे; हे अगम्य आहे, हे माझ्या आवाक्याबाहेरचे आहे.
7मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निघून जाऊ? मी तुझ्या समक्षतेपासून कोठे पळून जाऊ?
8मी वर आकाशात चढलो तरी तेथे तू आहेस; अधोलोकी मी आपले अंथरूण केले तरी पाहा, तेथे तू आहेस.
9मी पहाटेचे पंख धारण करून समुद्राच्या अगदी पलीकडल्या तीरावर जाऊन राहिलो,
10तरी तेथेही तुझा हात मला चालवील; तुझा उजवा हात मला धरून ठेवील.
11“अंधकार मला लपवो, माझ्या भोवतालच्या प्रकाशाचा काळोख होवो,” असे जरी मी म्हणालो,
12तरी अंधकारदेखील तुझ्यापासून काहीएक लपवत नाही; रात्र दिवसाप्रमाणे प्रकाशते, काळोख आणि उजेड हे तुला सारखेच आहेत.
13तूच माझे अंतर्याम निर्माण केलेस; तूच माझ्या आईच्या उदरी माझी घडण केलीस.
14भयप्रद व अद्भुत रीतीने माझी घडण झाली आहे, म्हणून मी तुझे उपकारस्मरण करतो; तुझी कृत्ये अद्भुत आहेत हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे.
15मी गुप्त स्थळी निर्माण होत असता आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे माझी घडण होत असता माझी आकृती तुला गुप्त नव्हती.
16मी गर्भात पिंडरूपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले, आणि माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेवले होते.
17हे देवा, मला तुझे संकल्प किती मोलवान वाटतात! त्यांची संख्या किती मोठी आहे!
18ते मी गणू लागलो तर वाळूच्या कणांपेक्षा अधिक ठरतील; मला जाग येते तेव्हाही मी तुझ्याजवळच असतो.
19हे देवा, तू दुर्जनांना ठार मारून टाक; अहो रक्तपात करणार्‍यांनो, माझ्यापासून दूर व्हा.
20ते तुझ्याविरुद्ध कपटाने बोलतात, तुझे वैरी तुझे नाव व्यर्थ घेतात.
21तुझा द्वेष करणार्‍यांचा मी का द्वेष करू नये? तुझ्यावर उठणार्‍यांचा मला वीट का येऊ नये?
22मी त्यांचा पराकाष्ठेचा द्वेष करतो; मी त्यांना आपले शत्रू मानतो.
23हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण; मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण.
24माझ्या ठायी दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पाहा; आणि मला सनातन मार्गाने चालव.

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 139: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन