YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 109

109
सूडासाठी याचना
मुख्य गवयासाठी; दाविदाचे स्तोत्र.
1हे माझ्या स्तुतिपात्र देवा, मौन धरू नकोस;
2कारण दुष्टांनी व कपटी जनांनी माझ्यावर तोंड सोडले आहे; ते खोडसाळ जिभेने माझ्याविरुद्ध बोलले आहेत.
3त्यांनी माझ्यावर द्वेषयुक्त शब्दांचा वर्षाव केला आहे, ते माझ्याशी विनाकारण झगडले.
4मी प्रेमाने वागत असता ते मला विरोध करतात; मी तर प्रार्थनेत मग्न असतो.
5मी केलेल्या बर्‍याची परतफेड त्यांनी वाइटाने केली, व माझ्या प्रेमाची फेड द्वेषाने केली.
6त्याच्यावर दुर्जनाला अधिकारी नेम; त्याच्या उजव्या हाताकडे विरोधी उभा राहो.
7त्याचा न्याय होईल, तेव्हा तो अपराधी ठरो, आणि त्याची प्रार्थना पाप ठरो.
8त्याचे दिवस थोडे होवोत; त्याचा हुद्दा दुसरा घेवो.
9त्याची मुले अनाथ होवोत, व त्याची बायको विधवा होवो.
10त्याची मुले भीक मागत फिरोत, आणि ती आपल्या उजाड झालेल्या वस्तीतून बाहेर पडून अन्नान्न करोत.
11सावकार त्याचे सर्वस्व हिरावून घेवो; त्याची कष्टाची कमाई परके लुटोत.
12त्याच्यावर कोणीही दया न करो; त्याच्या अनाथ मुलांची कीव कोणालाही न येवो.
13त्याच्या वंशाचा उच्छेद होवो; भावी पिढीत त्याचा नामनिर्देश न होवो.
14त्याच्या वाडवडिलांच्या अनीतीचे परमेश्वराला स्मरण राहो; त्याच्या आईचे पातक काढून टाकले न जावो.
15त्याची पातके परमेश्वरापुढे सदा राहोत; तो पृथ्वीवरून त्यांचे स्मरण नाहीसे करो.
16कारण त्या मनुष्याने दया करण्याची आठवण ठेवली नाही, तर दीन, दरिद्री व दुःखी माणसांचा वध करण्यासाठी तो त्यांच्या पाठीस लागला.
17शाप देण्याची त्याला आवड असे म्हणून तो शाप त्यालाच लागो; आशीर्वाद देण्याची त्याला आवड नसे म्हणून तो आशीर्वादाला मुको.
18शाप देणे हा त्याचा पेहराव बनला होता, म्हणून ते त्याच्या पोटात पाण्यासारखे व त्याच्या हाडांत तेलासारखे भिनून जावो.
19ते त्याला पांघरायच्या वस्त्राप्रमाणे होवो, नेहमी वापरायच्या कंबरपट्ट्याप्रमाणे ते त्याला जखडून राहो.
20माझ्या विरोध्यांना, माझ्याविरुद्ध वाईट बोलणार्‍यांना परमेश्वराकडून हेच प्रतिफळ मिळो.
21हे परमेश्वरा, हे प्रभू, तू आपल्या नावासाठी मला वागवून घे; तुझी दया उत्तम आहे म्हणून तू मला सोडव.
22कारण मी दीन व दरिद्री आहे; आणि माझे हृदय घायाळ झाले आहे.
23उतरत्या सावलीप्रमाणे मी चाललो आहे; मी टोळाप्रमाणे हुसकावला जात आहे.
24उपासाने माझे गुडघे लटपटत आहेत; माझे शरीर क्षीण झाले आहे.
25मी लोकांना निंदेचा विषय झालो आहे; मला पाहून ते माना हलवतात.
26हे परमेश्वरा, माझ्या देवा, मला साहाय्य कर; तू आपल्या दयेस अनुसरून मला तार.
27हे परमेश्वरा, ह्यात तुझा हात आहे, हे तूच केले आहेस असे ते जाणोत.
28ते शाप देतात पण तू आशीर्वाद देतोस; ते उठतील तेव्हा लज्जित होतील, परंतु तुझा सेवक हर्षित होईल.
29माझे विरोधी अपमानाने व्याप्त होतील. झग्याप्रमाणे ते लज्जा पांघरतील.
30मी आपल्या तोंडाने परमेश्वराचे पुष्कळ उपकारस्मरण करीन, लोकसमुदायात त्याला स्तवीन.
31कारण दरिद्र्याचा जीव दोषी ठरवणारे जे आहेत त्यांच्यापासून त्याचा बचाव करण्यासाठी तो त्याच्या उजव्या हाताकडे उभा असतो.

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 109: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन