YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 107

107
भाग पाचवा
देव विपत्तीतून सोडवतो
1परमेश्वराचे उपकारस्मरण करा, कारण तो चांगला आहे; आणि त्याची दया सनातन आहे.
2परमेश्वराने उद्धरलेले जन असे म्हणोत कारण त्यांना त्याने शत्रूंच्या तावडीतून मुक्त केले आहे,
3आणि निरनिराळ्या देशांतून पूर्व, पश्‍चिम, उत्तर व दक्षिण ह्या दिशांकडून आणून एकवट केले आहे.
4काही जण अरण्यात वैराण प्रदेशातील वाटेने भटकले; त्यांना वस्तीचे नगर आढळले नाही.
5ते भुकेले व तान्हेले असल्यामुळे त्यांचा जीव त्यांच्या ठायी व्याकूळ झाला
6तेव्हा त्यांनी संकटसमयी परमेश्वराचा धावा केला, आणि त्याने त्यांना क्लेशातून मुक्त केले.
7वस्तीच्या नगरास त्यांनी जावे म्हणून त्याने त्यांना सरळ मार्गाने चालवले.
8परमेश्वराच्या दयेबद्दल व त्याने मनुष्यांसाठी केलेल्या अद्भुत कृत्याबद्दल लोक त्याचे उपकारस्मरण करोत;
9कारण त्याने तान्हेल्या जिवास तृप्त केले; भुकेल्या जिवास उत्तम पदार्थांनी संतुष्ट केले.
10काही जण क्लेशाने व बेड्यांनी जखडले होते, ते अंधकारात व मृत्युच्छायेत बसले होते,
11कारण त्यांनी देवाच्या आज्ञांविरुद्ध बंडाळी करून परात्पराचा बोध तुच्छ मानला होता.
12त्यांना कष्ट देऊन त्याने त्यांचा ताठा उतरवला; ते पतन पावले, त्यांना साहाय्य करण्यास कोणी नव्हता;
13तेव्हा त्यांनी संकटसमयी परमेश्वराचा धावा केला, आणि त्याने त्यांना क्लेशातून मुक्त केले.
14त्याने त्यांना अंधकारातून व मृत्युच्छायेतून बाहेर आणले. व त्यांची बंधने तोडून टाकली.
15परमेश्वराच्या दयेबद्दल व त्याने मनुष्यांसाठी केलेल्या अद्भुत कृत्यांबद्दल लोक त्याचे उपकारस्मरण करोत;
16कारण त्याने पितळेची दारे फोडली व लोखंडाचे अडसर तोडून टाकले.
17मूर्खांना त्यांच्या दुराचारामुळे व त्यांच्या दुष्कृत्यांमुळे पीडा भोगावी लागते.
18त्यांच्या जिवाला सर्व प्रकारच्या अन्नाचा वीट येतो; ते मृत्युद्वाराजवळ पोहचतात.
19ते संकटसमयी परमेश्वराचा धावा करतात, आणि तो त्यांना क्लेशांतून मुक्त करतो.
20तो आपले वचन पाठवून त्यांना बरे करतो, नाशापासून त्यांचा बचाव करतो.
21परमेश्वराच्या दयेबद्दल व त्याने मनुष्यांसाठी केलेल्या अद्भुत कृत्यांबद्दल लोक त्याचे उपकारस्मरण करोत.
22ते त्याला उपकारस्मरणरूपी यज्ञ अर्पोत, व स्तोत्रे गाऊन त्याची कृत्ये वर्णोत.
23जे गलबतात बसून समुद्रातून प्रवास करतात, महासागरात उद्योगधंदा करतात,
24ते परमेश्वराची कृत्ये, त्याची अद्भुत कृत्ये, भरसमुद्रात पाहतात.
25तो आज्ञा करून वादळ उठवतो, तेव्हा त्याच्या लाटा उसळतात.
26ते आभाळापर्यंत वर जातात, तळापर्यंत खाली जातात; क्लेशाने त्यांच्या जिवाचे पाणीपाणी होते.
27ते मद्यप्यासारखे डुलतात व झोकांड्या खातात, त्यांची मती अगदी कुंठित होते.
28ते संकटसमयी परमेश्वराचा धावा करतात, आणि तो त्यांना क्लेशातून मुक्त करतो.
29तो वादळ शमवतो, तेव्हा लाटा शांत होतात.
30त्या शांत झाल्यामुळे ते हर्षित होतात, आणि तो त्यांना त्यांच्या इच्छित बंदरास नेतो.
31परमेश्वराच्या दयेबद्दल व त्याने मनुष्यांसाठी केलेल्या अद्भुत कृत्याबद्दल लोक त्याचे उपकारस्मरण करोत.
32लोकांच्या मंडळीत ते त्याची थोरवी गावोत, आणि वडिलांच्या बैठकीत त्याचे स्तवन करोत.
33तो नद्यांचे रान करतो, पाण्याच्या झर्‍यांच्या जागी शुष्क भूमी करतो.
34सुपीक जमिनीची तेथे राहणार्‍यांच्या दुष्टतेमुळे तो खारवट भूमी करतो.
35तो वाळवंटाचे तळे करतो, व शुष्क भूमीमध्ये झरे उत्पन्न करतो.
36तेथे तो भुकेल्यांना वसवतो, ते वस्तीसाठी नगर तयार करतात;
37ते शेते पेरतात, व द्राक्षांचे मळे लावतात आणि त्यांना पीक मिळते.
38तो त्यांना आशीर्वाद देतो, आणि त्यांची फार वाढ होते; त्यांना गुरांची कमतरता पडू देत नाही.
39पुढे जुलूम, विपत्ती व दुःख ह्यांच्यामुळे ते कमी होतात व खालावतात.
40तेव्हा तो अधिपतींवर अपमानाचा मारा करतो; त्यांना मार्गहीन वैराण प्रदेशात भटकण्यास लावतो.
41पण दरिद्र्यांस क्लेशांतून मुक्त करून तो उच्च स्थानी ठेवतो, त्यांची कुटुंबे कळपासारखी वाढवतो.
42हे पाहून सरळ मनाचे लोक हर्ष पावतात; सर्व दुष्टाई आपले तोंड बंद करते. जो कोणी बुद्धिमान असेल त्याने ह्या गोष्टींकडे लक्ष पुरवावे, त्याने परमेश्वराची दया ओळखावी.

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 107: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन