YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 104

104
देव आपल्या निर्मितीची काळजी घेतो
1हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. हे परमेश्वरा, माझ्या देवा, तू परमथोर आहेस; तू मान व महिमा ह्यांनी मंडित आहेस.
2तू पोशाखाप्रमाणे प्रकाश धारण करतोस; कनातीप्रमाणे आकाश विस्तारतोस;
3आपल्या माड्यांच्या तुळया जलांच्या ठायी बसवतोस, मेघांना आपला रथ करतोस, वायूच्या पंखांवर आरोहण करून जातोस,
4वायूंना आपले दूत करतोस, अग्नी व ज्वाला ह्यांना आपले सेवक करतोस.
5तू पृथ्वी तिच्या पायावर अशी स्थापली आहेस की ती कधीही ढळणार नाही.
6तिला तू वस्त्राप्रमाणे जलाशयाने आच्छादलेस, पर्वतांवर जले स्थिर राहिली;
7तुझ्या धमकीने ती पळाली, तुझ्या गर्जनेच्या शब्दाने ती त्वरेने ओसरली;
8ती पर्वतांवरून जाऊन खाली खोर्‍यांतून वाहिली, त्यांच्यासाठी तू नेमलेल्या स्थळी ती जाऊन राहिली.
9तू ठरवलेल्या मर्यादेचे त्यांना उल्लंघन करता येत नाही; भूमी झाकायला त्यांना परत येववत नाही.
10तो खोर्‍यांतून झरे काढतो; ते डोंगरांमधून वाहतात;
11ते सर्व वनपशूंना प्यायला पाणी पुरवतात; त्यांवर रानगाढवे आपली तहान भागवतात.
12त्यांच्याजवळ आकाशातील पक्षी वस्ती करतात; ते वृक्षांच्या फांद्यांवरून गातात.
13तो आपल्या माड्यांवरून पर्वतांवर जलसिंचन करतो; तुझ्या कृतींच्या फळाने भूमी तृप्त होते.
14तो जनावरांसाठी गवत आणि मनुष्याच्या उपयोगासाठी वनस्पती उगववतो; ह्यासाठी की, मनुष्याने भूमीतून अन्न उत्पन्न करावे;
15म्हणजे मनुष्याचे अंतःकरण आनंदित करणारा द्राक्षारस; त्याचे मुख टवटवीत करणारे तेल, मनुष्याच्या जिवाला आधार देणारी भाकर, ही त्याने उत्पन्न करावी.
16परमेश्वराचे वृक्ष, लबानोनावर त्याने लावलेले गंधसरू, रसभरित असतात;
17त्यांवर पक्षी आपली घरटी बांधतात; करकोचाचे घर देवदारूंमध्ये असते.
18उंच पर्वत रानबकर्‍यांसाठी आहेत; खडक सशांचे आश्रयस्थान आहेत.
19त्याने कालमान समजण्यासाठी चंद्र नेमला; सूर्य आपला अस्तसमय समजून घेतो.
20तू अंधार करतोस तेव्हा रात्र होते; तिच्यात सर्व जातींचे वनपशू संचार करतात;
21तरुण सिंह आपल्या भक्ष्यासाठी गर्जना करतात, देवाजवळ आपले अन्न मागतात.
22सूर्य उगवतो तेव्हा ते परत जाऊन आपापल्या गुहांत निजून राहतात.
23मनुष्य आपल्या कामधंद्यास जाऊन संध्याकाळपर्यंत श्रम करतो.
24हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती विविध आहेत! ती सर्व तू सुज्ञतेने केलीस; तुझ्या समृद्धीने पृथ्वी भरलेली आहे.
25हा समुद्र अफाट व विस्तीर्ण आहे, त्यात लहानमोठे असंख्य जलचर विहार करतात.
26पाहा, त्यात गलबते चालतात, त्यात क्रीडा करण्यासाठी तू निर्माण केलेला लिव्याथान1 तेथे आहे.
27तू त्यांना त्यांचे अन्न यथाकाली देतोस म्हणून ते सर्व तुझी वाट पाहतात.
28जे तू त्यांना घालतोस ते ते घेतात; तू आपली मूठ उघडतोस तेव्हा उत्तम पदार्थांनी त्यांची तृप्ती होते.
29तू आपले तोंड लपवतोस तेव्हा ते व्याकूळ होतात; तू त्यांचा श्वास काढून घेतोस तेव्हा ते मरतात व मातीस मिळतात.
30तू आपला आत्मा पाठवतोस तेव्हा ते उत्पन्न होतात, व तू पृथ्वीचा पृष्ठभाग पुन्हा नवा करतोस.
31परमेश्वराचे वैभव चिरकाल राहो! परमेश्वराला आपल्या कृतींपासून आनंद होवो!
32तो पृथ्वीकडे पाहतो तेव्हा ती कापते; तो पर्वतांना स्पर्श करतो तेव्हा ते धुमसतात.
33माझ्या जिवात जीव आहे तोपर्यंत मी परमेश्वराचे गुणगान गाईन; मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या देवाचे स्तोत्र गाईन.
34मी केलेले त्याचे मनन त्याला गोड वाटो; परमेश्वराच्या ठायी मला हर्ष होईल.
35पृथ्वीवरून पातकी नष्ट होवोत; ह्यापुढे दुर्जन न उरोत. हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. परमेशाचे स्तवन करा!1

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 104: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन