YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 104:1-23

स्तोत्रसंहिता 104:1-23 MARVBSI

हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. हे परमेश्वरा, माझ्या देवा, तू परमथोर आहेस; तू मान व महिमा ह्यांनी मंडित आहेस. तू पोशाखाप्रमाणे प्रकाश धारण करतोस; कनातीप्रमाणे आकाश विस्तारतोस; आपल्या माड्यांच्या तुळया जलांच्या ठायी बसवतोस, मेघांना आपला रथ करतोस, वायूच्या पंखांवर आरोहण करून जातोस, वायूंना आपले दूत करतोस, अग्नी व ज्वाला ह्यांना आपले सेवक करतोस. तू पृथ्वी तिच्या पायावर अशी स्थापली आहेस की ती कधीही ढळणार नाही. तिला तू वस्त्राप्रमाणे जलाशयाने आच्छादलेस, पर्वतांवर जले स्थिर राहिली; तुझ्या धमकीने ती पळाली, तुझ्या गर्जनेच्या शब्दाने ती त्वरेने ओसरली; ती पर्वतांवरून जाऊन खाली खोर्‍यांतून वाहिली, त्यांच्यासाठी तू नेमलेल्या स्थळी ती जाऊन राहिली. तू ठरवलेल्या मर्यादेचे त्यांना उल्लंघन करता येत नाही; भूमी झाकायला त्यांना परत येववत नाही. तो खोर्‍यांतून झरे काढतो; ते डोंगरांमधून वाहतात; ते सर्व वनपशूंना प्यायला पाणी पुरवतात; त्यांवर रानगाढवे आपली तहान भागवतात. त्यांच्याजवळ आकाशातील पक्षी वस्ती करतात; ते वृक्षांच्या फांद्यांवरून गातात. तो आपल्या माड्यांवरून पर्वतांवर जलसिंचन करतो; तुझ्या कृतींच्या फळाने भूमी तृप्त होते. तो जनावरांसाठी गवत आणि मनुष्याच्या उपयोगासाठी वनस्पती उगववतो; ह्यासाठी की, मनुष्याने भूमीतून अन्न उत्पन्न करावे; म्हणजे मनुष्याचे अंतःकरण आनंदित करणारा द्राक्षारस; त्याचे मुख टवटवीत करणारे तेल, मनुष्याच्या जिवाला आधार देणारी भाकर, ही त्याने उत्पन्न करावी. परमेश्वराचे वृक्ष, लबानोनावर त्याने लावलेले गंधसरू, रसभरित असतात; त्यांवर पक्षी आपली घरटी बांधतात; करकोचाचे घर देवदारूंमध्ये असते. उंच पर्वत रानबकर्‍यांसाठी आहेत; खडक सशांचे आश्रयस्थान आहेत. त्याने कालमान समजण्यासाठी चंद्र नेमला; सूर्य आपला अस्तसमय समजून घेतो. तू अंधार करतोस तेव्हा रात्र होते; तिच्यात सर्व जातींचे वनपशू संचार करतात; तरुण सिंह आपल्या भक्ष्यासाठी गर्जना करतात, देवाजवळ आपले अन्न मागतात. सूर्य उगवतो तेव्हा ते परत जाऊन आपापल्या गुहांत निजून राहतात. मनुष्य आपल्या कामधंद्यास जाऊन संध्याकाळपर्यंत श्रम करतो.