ज्ञानाने आपले घर बांधले आहे; त्याने आपले सात खांब तयार केले आहेत. त्याने आपले पशू कापले आहेत; त्याने आपला द्राक्षारस मिसळला आहे, आपले मेजही वाढून तयार केले आहे. त्याने आपल्या दासी पाठवल्या आहेत, ते नगराच्या उच्च स्थानांवरून ओरडून म्हणते, “जो कोणी भोळा आहे तो इकडे वळो;” जो बुद्धिहीन आहे त्याला ते म्हणते, “ये, माझी भाकर खा; आणि मी मिसळलेला द्राक्षारस पी. भोळ्यांनो, तुम्ही आपले भोळेपण सोडा व वाचा; आणि सुज्ञतेच्या मार्गाने चाला.” जो निंदकाला वाग्दंड करतो तो आपली अप्रतिष्ठा करून घेतो; जो दुर्जनाला बोल लावतो, तो आपणाला कलंक लावून घेतो. निंदकाला बोल लावू नकोस, लावशील तर तो तुझा द्वेष करील; ज्ञान्याला बोल लाव म्हणजे तू त्याला अधिक प्रिय होशील. ज्ञान्याला बोध केला तर तो अधिक ज्ञानी होईल; नीतिमानाला बोध केला तर त्याचे ज्ञान वाढेल. परमेश्वराचे भय ज्ञानाचा आरंभ होय; आणि परमपवित्राला ओळखणे हीच सुज्ञता होय. कारण माझ्यामुळे तुझे दिवस बहुगुणित होतील, तुझ्या आयुष्याची वर्षे अधिक होतील. तू ज्ञानी असलास तर ते तुझे तुला; तू निंदा केलीस तर त्याचे फळ तूच भोगशील. मूर्ख स्त्री गडबड करणारी असते; ती भोळेपणाची केवळ मूर्ती असून तिला काही कळत नाही. ती नगराच्या उच्च स्थानी आपल्या घराच्या दाराजवळ आसनावर बसून राहते; आणि कोणी आपल्या वाटेने नीट जाणारा तिच्याजवळून जाऊ लागला म्हणजे ती म्हणते, “जो कोणी भोळा आहे तो इकडे वळो;” जो कोणी बुद्धिहीन असतो त्याला ती म्हणते, “चोरलेले पाणी गोड लागते; चोरून खाल्लेली भाकर रुचकर लागते;” पण तेथे मेलेले आहेत, तिचे आमंत्रित अधोलोकाच्या खोल स्थानी आहेत, हे त्याला समजत नाही. सात्त्विक आणि दुष्ट ह्यांची तुलना शलमोनाची नीतिसूत्रे.
नीतिसूत्रे 9 वाचा
ऐका नीतिसूत्रे 9
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: नीतिसूत्रे 9:1-18
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ