नीतिसूत्रे 9:1-18
नीतिसूत्रे 9:1-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ज्ञानाने आपले घर बांधले आहे; त्याने आपले सात खांब तयार केले आहेत. त्याने आपले पशू कापले आहेत; त्याने आपला द्राक्षारस मिसळला आहे, आपले मेजही वाढून तयार केले आहे. त्याने आपल्या दासी पाठवल्या आहेत, ते नगराच्या उच्च स्थानांवरून ओरडून म्हणते, “जो कोणी भोळा आहे तो इकडे वळो;” जो बुद्धिहीन आहे त्याला ते म्हणते, “ये, माझी भाकर खा; आणि मी मिसळलेला द्राक्षारस पी. भोळ्यांनो, तुम्ही आपले भोळेपण सोडा व वाचा; आणि सुज्ञतेच्या मार्गाने चाला.” जो निंदकाला वाग्दंड करतो तो आपली अप्रतिष्ठा करून घेतो; जो दुर्जनाला बोल लावतो, तो आपणाला कलंक लावून घेतो. निंदकाला बोल लावू नकोस, लावशील तर तो तुझा द्वेष करील; ज्ञान्याला बोल लाव म्हणजे तू त्याला अधिक प्रिय होशील. ज्ञान्याला बोध केला तर तो अधिक ज्ञानी होईल; नीतिमानाला बोध केला तर त्याचे ज्ञान वाढेल. परमेश्वराचे भय ज्ञानाचा आरंभ होय; आणि परमपवित्राला ओळखणे हीच सुज्ञता होय. कारण माझ्यामुळे तुझे दिवस बहुगुणित होतील, तुझ्या आयुष्याची वर्षे अधिक होतील. तू ज्ञानी असलास तर ते तुझे तुला; तू निंदा केलीस तर त्याचे फळ तूच भोगशील. मूर्ख स्त्री गडबड करणारी असते; ती भोळेपणाची केवळ मूर्ती असून तिला काही कळत नाही. ती नगराच्या उच्च स्थानी आपल्या घराच्या दाराजवळ आसनावर बसून राहते; आणि कोणी आपल्या वाटेने नीट जाणारा तिच्याजवळून जाऊ लागला म्हणजे ती म्हणते, “जो कोणी भोळा आहे तो इकडे वळो;” जो कोणी बुद्धिहीन असतो त्याला ती म्हणते, “चोरलेले पाणी गोड लागते; चोरून खाल्लेली भाकर रुचकर लागते;” पण तेथे मेलेले आहेत, तिचे आमंत्रित अधोलोकाच्या खोल स्थानी आहेत, हे त्याला समजत नाही. सात्त्विक आणि दुष्ट ह्यांची तुलना शलमोनाची नीतिसूत्रे.
नीतिसूत्रे 9:1-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ज्ञानाने आपले स्वतःचे घर बांधले; त्यामध्ये तिने खडकाचे सात खांब कोरून तयार केले. तिने रात्रीच्या भोजनासाठी आपले पशू तयार केले आहेत; तिने आपला द्राक्षरस मिसळला आहे; आणि तिने मेजही वाढून तयार केले आहे, तिने अन्न तिच्या मेजावर ठेवले आहे. तिने आपल्या दासीकरवी आमंत्रण पाठवले आहे आणि ते नगराच्या उंचस्थानांच्या टोकापासून हाक मारून म्हणतेः “जो अज्ञानी आहे तो इकडे येवो!” ती जे बुद्धिहीन आहेत त्यांना म्हणते. “या, माझे अन्न खा. आणि मी मिसळलेला द्राक्षरस प्या. तुमचे अज्ञानाचे मार्ग मागे सोडा आणि जिवंत रहा; सुज्ञानाच्या मार्गाने चला.” जो निंदकाला सुबोध करतो तो अप्रतिष्ठेला आंमत्रण करतो, आणि जो दुर्जन मनुष्यास बोल लावतो तो आपले नुकसान करून घेतो. निंदकाला बोल लावू नको नाहीतर तो तुझा द्वेष करेल; ज्ञान्यास बोल लाव आणि तो तुझ्यावर प्रेम करील. ज्ञानी मनुष्यास शिक्षण दिले तर तो ज्ञानात अधिक वाढत जाईल; नितीमान मनुष्यास शिक्षण दिले तर तो शिक्षणात अधिक वाढेल. परमेश्वराचे भय ज्ञानाचा उगम आहे, आणि परमपवित्र देवाला ओळखणे हीच सुज्ञता आहे. कारण माझ्यामुळे तुझ्या आयुष्याचे दिवस बहुगुणित होतील, आणि तुमच्या आयुष्याची वर्षे वाढतील. जर तुम्ही ज्ञानी असलास, तर तू आपणासाठी ज्ञानी असशील, पण जर तू निंदा केली तर तूच मात्र तिचे फळ भोगशील. मूर्ख स्त्री गोंगाट करणाऱ्यासारखी आहे, ती अज्ञानी आहे आणि तिला काही कळत नाही. ती तिच्या घराच्या दाराजवळ बसते, ती नगरातल्या उंचस्थानी आसनावर बसते. जे लोक आपल्या वाटेने सरळ चालतात, जवळून जाणाऱ्यांना ती हाक मारून म्हणते, “जो कोणी अज्ञानी आहे तो इकडे येवो!” जो कोणी बुद्धिहीन आहे त्यास ती म्हणते. “चोरलेले पाणी गोड लागते, आणि गुप्तपणे खाल्लेली भाकर चांगली लागते.” पण तेथे मरण पावलेले आहेत हे त्यांना समजत नाही, तिचे पाहुणे मृतलोकाच्या खोल स्थानात आहेत हे त्यास माहित नाही.
नीतिसूत्रे 9:1-18 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
सुज्ञानाने आपले घर बांधले आहे; तिने तिचे सात खांब तयार केले आहेत. तिने तिच्याकडील मांसाहारी भोजन आणि तिचा द्राक्षारस तयार केला आहे; तिने तिचा मेजसुद्धा सजविलेला आहे. तिने तिच्या दासांना बाहेर पाठवले आहे आणि ती नगराच्या सर्वात उच्च स्थानावरून हाक मारते, “जे साधे भोळे आहेत, त्या सर्वांनी माझ्या घरी यावे!” जे विवेकशून्य आहेत त्यांना ती म्हणते, “इकडे या, माझे भोजन खा आणि मी मिसळलेला द्राक्षारस प्या. तुमचे साधेभोळेपण सोडून द्या म्हणजे तुम्ही जगाल; अंतर्ज्ञानाच्या मार्गाने चला.” जो टवाळखोराची सुधारणा करतो, तो अपमानास आमंत्रण देतो; जो दुष्टाला धमकावितो त्याला अपशब्द ऐकावे लागतात. टवाळखोरांची कान उघाडणी करू नकोस, नाहीतर ते तुझा द्वेष करतील, सुज्ञ माणसांची कान उघाडणी कर आणि ते तुजवर प्रीती करतील. सुज्ञ मनुष्याला बोध कर म्हणजे ते अधिक ज्ञानी होतील; नीतिमानाला शिक्षण दे आणि ते त्यांच्या शिक्षणात भर घालतील. याहवेहचे भय हा सुज्ञानाचा प्रारंभ होय, आणि पवित्र परमेश्वराचे ज्ञान असणे हा सुज्ञपणा होय. कारण सुज्ञतेद्वारे तुझ्या आयुष्याचे दिवस बहुगुणित होतील, आणि तू उदंड आयुष्य जगशील. जर तू सुज्ञ असशील, तर तुझे सुज्ञान तुला बक्षीस देईल; जर तू टवाळखोर आहेस, तर तू एकटाच यातना भोगशील. मूर्खपणा एक स्वैर स्त्री आहे; ती साधीभोळी आहे आणि तिला काहीच समज नाही. ती तिच्या घराच्या दारात बसून राहते, तसेच नगराच्या सर्वात उंच ठिकाणावर ती बसते. तिच्याजवळून जाणाऱ्या, जे सरळ त्यांच्या मार्गाने जातात, त्यांना ती बोलाविते, “जे साधे भोळे आहेत त्या सर्वांनी माझ्या घरी यावे!” जे विवेकशून्य आहेत त्यांना ती म्हणते, “चोरलेले पाणी गोड लागते; गुप्तपणे खाल्लेले अन्न चविष्ट लागते!” परंतु त्यांना हे माहीत नसते की तिथे मेलेले लोक आहेत, आणि तिचे पाहुणे आता मृतांच्या खोल जगात आहेत.