नीतिसूत्रे 6
6
आळस व खोटेपणा ह्यांविषयी उपदेश
1माझ्या मुला, जर तू आपल्या शेजार्याला जामीन राहिलास, परक्यासाठी तू हातावर हात दिलास,
2तर तू आपल्या तोंडच्या वचनांना गुंतला आहेस; तू आपल्या तोंडच्या शब्दांनी बद्ध झाला आहेस.
3ह्यासाठी माझ्या मुला, तू असे कर की आपल्याला मुक्त करून घे, कारण तू आपल्या शेजार्याच्या हाती सापडला आहेस; तर जा, त्वरा कर; आपल्या शेजार्याला अत्याग्रहाने गळ घाल.
4तू आपल्या डोळ्यांना निद्रा लागू देऊ नकोस, आपल्या पापण्यांना झापड पडू देऊ नकोस.
5ज्याप्रमाणे पारध्याच्या हातून हरिणीला, ज्याप्रमाणे फासेपारध्याच्या हातून पक्ष्याला, त्याप्रमाणे आपणाला मुक्त करून घे.
6अरे आळशा, मुंगीकडे जा; तिचे वर्तन पाहून शहाणा हो;
7तिला कोणी धनी, देखरेख करणारा किंवा अधिपती नसता
8ती उन्हाळ्यात आपले अन्न मिळवते, आणि कापणीच्या दिवसांत आपले भक्ष्य जमा करून ठेवते.
9अरे आळशा, तू किती वेळ निजशील? आपल्या झोपेतून केव्हा उठशील?
10आणखी थोडीशी झोप घेतो, आणखी थोडीशी डुलकी खातो, आणखी हात उराशी धरून निजतो.
11असे म्हणत जाशील तर तुला दारिद्र्य दरोडेखोराप्रमाणे, आणि गरिबी तुला सशस्त्र मनुष्याप्रमाणे गाठील.
12अधम व दुर्जन मनुष्य उद्दामपणाचे भाषण करीत जातो;
13डोळे मिचकावतो, पायांनी इशारा करतो, बोटांनी खुणावतो;
14त्याच्या मनात उद्दामपणा असतो; तो दुष्कर्माची योजना करीत असतो; तो वैमनस्य पसरवतो.
15ह्यामुळे त्याच्यावर विपत्ती अकस्मात येईल त्याचा एकाएकी चुराडा होईल, त्याचा निभाव लागणार नाही.
16परमेश्वर ज्यांचा द्वेष करतो अशा सहा गोष्टी आहेत; नव्हे, त्याला अशा सात गोष्टींचा वीट आहे :
17उन्मत्त दृष्टी, लबाड बोलणारी जिव्हा, निर्दोष रक्त पाडणारे हात,
18दुष्ट योजना करणारे अंत:करण, दुष्कर्म करण्यास त्वरेने धावणारे पाय,
19लबाड बोलणारा खोटा साक्षी, व भावाभावांत वैमनस्य उत्पन्न करणारा मनुष्य, ह्या त्या होत.
व्यभिचाराविषयी ताकीद
20माझ्या मुला, तू आपल्या बापाची आज्ञा पाळ, आपल्या आईची शिस्त सोडू नकोस;
21ती नेहमी आपल्या उराशी कवटाळून धर, ती आपल्या गळ्यात बांधून ठेव.
22तू चालशील तेव्हा ज्ञान तुला मार्ग दाखवील; तू निजशील तेव्हा ते तुझे रक्षण करील; तू जागा होशील तेव्हा ते तुझ्याशी बोलेल.
23कारण ती आज्ञा केवळ दिवा आहे व ती शिस्त केवळ प्रकाश आहे. बोधाचे वाग्दंड जीवनाचा मार्ग आहे;
24दुष्ट स्त्रीपासून, परस्त्रीच्या गोडबोल्या जिव्हेपासून, ती तुझे रक्षण करणारी आहेत.
25तू आपले चित्त तिच्या सौंदर्यास पाहून लोलुप होऊ देऊ नकोस; तिच्या नेत्रकटाक्षांना वश होऊ नकोस.
26कारण व्यभिचारिणीच्या संगतीने मनुष्य भाकरीच्या तुकड्याला मोताद होतो; स्वैरिणी स्त्री पुरुषाच्या अमोल जिवाची शिकार करते.
27मनुष्याने आपल्या उराशी विस्तव धरला तर त्याची वस्त्रे जळणार नाहीत काय?
28कोणी निखार्यावर चालला तर त्याचे पाय पोळणार नाहीत काय?
29जो कोणी आपल्या शेजार्याच्या स्त्रीशी गमन करतो तो असा आहे; जो कोणी तिला स्पर्श करतो तो निर्दोष असणार नाही.
30चोर भुकेला असल्यामुळे त्याने आपला जीव शांत करण्यासाठी चोरी केली तर त्याला लोक तुच्छ मानीत नाहीत;
31पण तो सापडला तर सातपट परत देईल; तो आपल्या घरची सर्व मालमत्ता देईल.
32स्त्रीशी जारकर्म करणारा अक्कलशून्य आहे. जो आपल्या जिवाचा नाश करून घेऊ पाहतो तो असे करतो.
33त्याला घाय व अपकीर्ती ही प्राप्त होतील; त्याची निंदा कधी पुसून जाणार नाही.
34कारण ईर्ष्या पुरुषास संतप्त करते; सूड उगवण्याच्या दिवशी तो गय करणार नाही.
35तो कसल्याही खंडणीची पर्वा करणार नाही; त्याला तू बहुत देणग्या दिल्यास तरी त्याचे समाधान होणार नाही.
सध्या निवडलेले:
नीतिसूत्रे 6: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.