YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीतिसूत्रे 28:15-28

नीतिसूत्रे 28:15-28 MARVBSI

गरीब प्रजेवरचा दुष्ट अधिपती गर्जणार्‍या सिंहासारखा आणि भक्ष्य शोधत फिरणार्‍या अस्वलासारखा आहे. ज्या अधिपतीला बुद्धी कमी त्याचा जुलूम फार, ज्याला लोभीपणाचा तिटकारा वाटतो तो दीर्घायुषी होतो. रक्तपाताच्या दोषाचा ज्याला भार झाला आहे. तो शवगर्तेकडे धावतो; त्याला धरू नकोस. सरळ मार्गाने चालणार्‍याचा बचाव होतो, पण दुटप्पी मनाच्या मनुष्याचा अचानक अधःपात होतो. जो आपली शेती स्वत: करतो त्याला भरपूर अन्न मिळते, जो गर्विष्ठांच्या मागे लागतो त्याला पुरे दारिद्र्य येते. स्थिर मनाच्या मनुष्याला आशीर्वादांची रेलचेल होते; पण जो धनवान होण्याची उतावळी करतो त्याला शिक्षा झाल्यावाचून राहत नाही. तोंड पाहून वागणे बरे नाही, चतकोर भाकरीसाठीही मनुष्य गुन्हा करील. दुष्ट दृष्टीचा मनुष्य धन मिळवण्याची उतावळी करतो, आपणास दारिद्र्य येईल हे त्याला समजत नाही. जिव्हेने खुशामत करण्याऐवजी वाग्दंड करणार्‍याचेच शेवटी आभार मानतात. जो आईबापांस लुटतो आणि म्हणतो की, “ह्यात काही गुन्हा नाही,” तो घातपात करणार्‍याचा सोबती होय. लोभी मनुष्य तंटा उपस्थित करतो; पण परमेश्वरावर भाव ठेवणारा धष्टपुष्ट होतो. जो आपल्या मनावर भरवसा ठेवतो तो मूर्ख, पण जो सुज्ञतेने चालतो त्याचा बचाव होतो. जो दरिद्र्यांना देतो त्याला काही उणे पडत नाही, पण जो त्यांच्याकडे डोळेझाक करतो त्याला शापांवर शाप मिळतात. दुर्जन प्रबळ झाले असता लोक लपून बसतात, त्यांचा नायनाट झाला म्हणजे नीतिमान वृद्धी पावतात.