YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीतिसूत्रे 23:19-35

नीतिसूत्रे 23:19-35 MARVBSI

माझ्या मुला, तू ऐकून शहाणा हो व आपले मन सरळ मार्गात राख. मद्यपी व मांसाचे अतिभक्षण करणारे ह्यांच्या वार्‍यास उभा राहू नकोस; कारण मद्यपी व खादाड दरिद्री होतात, कैफ मनुष्याला चिंध्या नेसवतो, तू आपल्या जन्मदात्या बापाचे ऐक, आपल्या वृद्ध झालेल्या आईला तू तुच्छ मानू नकोस. सत्य, सुज्ञता, शिक्षण व समंजसपणा ही विकत घे, विकू नकोस. नीतिमानाचा बाप फार उल्लासतो; सुज्ञ मुलास जन्म देतो तो त्याच्याविषयी आनंद पावतो. तुझी मातापितरे आनंद पावोत, तुझी जन्मदात्री हर्ष पावो, माझ्या मुला, तू आपले चित्त मला दे, माझे मार्ग तुझ्या दृष्टीला आनंद देवोत. वेश्या खोल खाचेसारखी आहे; परस्त्री अरुंद कूपासारखी आहे. ती लुटारूसारखी टपून राहते. आणि माणसांतील विश्वासघातक्यांची संख्या वाढवते. हाय हाय कोण म्हणतो? अरे अरे कोण करतो? भांडणतंट्यात कोण पडतो? गार्‍हाणी कोण सांगतो? विनाकारण घाय कोणास होतात? धुंदी कोणाच्या डोळ्यांत असते? जे फार वेळपर्यंत द्राक्षारस पीत राहतात, जे मिश्रमद्याचा पूर्ण आस्वाद घेण्यास जातात त्यांच्या. द्राक्षारस कसा तांबडा दिसतो, प्याल्यात कसा चमकतो, घशातून खाली कसा सहज उतरतो हे पाहत बसू नकोस. शेवटी तो सर्पासारखा दंश करतो, फुरशाप्रमाणे झोंबतो. तुझे डोळे विलक्षण प्रकार पाहतील; तुझ्या मनातून विपरीत गोष्टी बाहेर पडतील; समुद्रामध्ये आडवा पडलेल्यासारखी, डोलकाठीच्या माथ्यावर आडवा पडलेल्यासारखी तुझी स्थिती होईल. तू म्हणशील, “त्यांनी मला ताडन केले तरी माझे काही दुखले नाही, त्यांनी मला मारले तरी मला काही लागले नाही; मी शुद्धीवर केव्हा येईन? मी पुन्हा त्याचे सेवन करीन.”