नीतिसूत्रे 23:19-35
नीतिसूत्रे 23:19-35 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
माझ्या मुला माझे ऐक, आणि सुज्ञ हो आणि आपले मन सरळ मार्गात राख. मद्यप्यांबरोबर किंवा खादाडपणाने मांस खाणाऱ्याबरोबर मैत्री करू नकोस. कारण मद्य पिणारे आणि खादाड गरीब होतात, झोपेत वेळ घालवणारा चिंध्यांचे वस्त्र घालील. तू आपल्या जन्मदात्या पित्याचे ऐक, तुझी आई म्हातारी झाली म्हणून तिचा तिरस्कार करू नको. सत्य विकत घे, पण ते विकू नको; शहाणपण, शिक्षण आणि समजूतदारपणा ही विकत घे. नीतिमानाचा पिता फार उल्लासेल, आणि सुज्ञ मुलास जन्म देणारा त्याच्याविषयी आनंदित होईल. तुमच्या आई आणि वडिलांना तुमच्याबरोबर आनंदी होऊ द्या. जिने तुला जन्म दिला तिला आनंद घेऊ दे. माझ्या मुला, तू आपले हृदय मला दे, आणि तुझे डोळे माझ्या मार्गाचे निरीक्षण करोत. कारण वेश्या ही खोल खड्डा आहे आणि दुसऱ्या मनुष्याची पत्नी ही अरुंद खड्डा आहे. ती चोरासारखी वाट बघत असते, आणि ती मनुष्यजातीत विश्वासघातक्यांची संख्या वाढवते. कोणाला हाय? कोणाला दुःख? कोणाला लढाई? कोणाला गाऱ्हाणी? कोणाला विनाकारण जखमा? कोणाला आरक्त डोळे आहे? जे मद्य पीत रेंगाळतात, जे मिश्र मद्याचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा मद्य लाल आहे, जेव्हा तो प्याल्यात चमकतो, आणि खाली कसा सहज उतरतो तू त्याकडे पाहू नको. पण शेवटी तो सापासारखा चावतो, आणि फुरशाप्रमाणे झोंबतो. तुझे डोळे विलक्षण गोष्टी पाहतील; आणि तुझे मन विकृत गोष्टी उच्चारील. जो समुद्रामध्ये आडवा पडला त्याच्यासारखा, अथवा डोलकाठीच्या माथ्यावर जो झोपला त्याच्यासारखा तू होशील. तुम्ही म्हणाल, “त्यांनी मला तडाखा दिला! पण मला काही लागले नाही. त्यांनी मला पिटले पण मला ते जाणवले नाही. मी केव्हा जागा होईल? मी पुन्हा त्याचे सेवन करीन.”
नीतिसूत्रे 23:19-35 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
माझ्या मुला, ऐक आणि सुज्ञ हो आणि तुझे अंतःकरण योग्य मार्गात स्थिर कर: जे अतिमद्यपान करतात किंवा जे आधाशीपणे मांस खातात त्यांची संगत करू नको, कारण मद्यपी व खादाड गरीब होतात, आणि गुंगीत असणार्यांना फाटके कपडे घालावे लागतील. आपल्या वडिलांचे ऐक ज्याने तुला जीवन दिले, आणि तुझी आई वृद्ध झाल्यावर तिचा तिरस्कार करू नको. सत्याला मोलाने विकत घे आणि ते विकू नको— सुज्ञान, शिक्षण आणि समंजसपणासुद्धा मिळव. नीतिमान मुलाच्या वडिलांना फार आनंद होतो; जो मनुष्य सुज्ञ पुत्राचा पिता आहे त्यामध्ये तो उल्लसित असतो. तुझे वडील आणि आई आनंदी असावेत; आणि जिने तुला जन्म दिला ती हर्षित असो! माझ्या मुला, तुझे अंतःकरण मला दे आणि तुझी दृष्टी माझ्या मार्गामध्ये प्रसन्न असावी, कारण व्यभिचारी स्त्री एक खोल खड्डा आहे, आणि परस्त्री म्हणजे एक अरुंद विहीर आहे. एखाद्या लुटारूप्रमाणे ती दबा धरून बसते आणि लोकांमध्ये विश्वासघातक्यांची संख्या वाढवते. कोणाला हाय हाय आहे? कोणाला मोठे दुःख आहे? कोणाला खेद आहे? कोणाकडे तक्रारी आहेत? कोणाला विनाकारण जखमा आहेत? कोणाचे डोळे लाल आहेत? जे मद्यपानासाठी घुटमळतात, जे मिश्रित मदिरेची चव घेण्यासाठी जातात. जेव्हा द्राक्षारस लाल आहे, तेव्हा त्याकडे टक लावून पाहू नको, जेव्हा ते कपामध्ये चमकते, जेव्हा ते सहजपणे खाली उतरते! शेवटी ते विषारी सर्पाप्रमाणे दंश करते आणि ते विष फुरसे सर्पाप्रमाणे विषारी असते. तुझे डोळे विलक्षण दृष्ये पाहतील, आणि तुझे मन गोंधळलेल्या गोष्टींची कल्पना करेल. तू उचंबळलेल्या समुद्रावर झोपल्यासारखा, जहाजाच्या शिडाच्या दोरीवर पडल्यासारखा असशील. आणि तू म्हणशील, “त्यांनी मला मारले, परंतु मी जखमी झालो नाही! त्यांनी मला मारले, परंतु मला जाणवले नाही! जेव्हा मी जागा होईन, तेव्हा मी आणखी एक मद्याचा प्याला पिईन.”
नीतिसूत्रे 23:19-35 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
माझ्या मुला, तू ऐकून शहाणा हो व आपले मन सरळ मार्गात राख. मद्यपी व मांसाचे अतिभक्षण करणारे ह्यांच्या वार्यास उभा राहू नकोस; कारण मद्यपी व खादाड दरिद्री होतात, कैफ मनुष्याला चिंध्या नेसवतो, तू आपल्या जन्मदात्या बापाचे ऐक, आपल्या वृद्ध झालेल्या आईला तू तुच्छ मानू नकोस. सत्य, सुज्ञता, शिक्षण व समंजसपणा ही विकत घे, विकू नकोस. नीतिमानाचा बाप फार उल्लासतो; सुज्ञ मुलास जन्म देतो तो त्याच्याविषयी आनंद पावतो. तुझी मातापितरे आनंद पावोत, तुझी जन्मदात्री हर्ष पावो, माझ्या मुला, तू आपले चित्त मला दे, माझे मार्ग तुझ्या दृष्टीला आनंद देवोत. वेश्या खोल खाचेसारखी आहे; परस्त्री अरुंद कूपासारखी आहे. ती लुटारूसारखी टपून राहते. आणि माणसांतील विश्वासघातक्यांची संख्या वाढवते. हाय हाय कोण म्हणतो? अरे अरे कोण करतो? भांडणतंट्यात कोण पडतो? गार्हाणी कोण सांगतो? विनाकारण घाय कोणास होतात? धुंदी कोणाच्या डोळ्यांत असते? जे फार वेळपर्यंत द्राक्षारस पीत राहतात, जे मिश्रमद्याचा पूर्ण आस्वाद घेण्यास जातात त्यांच्या. द्राक्षारस कसा तांबडा दिसतो, प्याल्यात कसा चमकतो, घशातून खाली कसा सहज उतरतो हे पाहत बसू नकोस. शेवटी तो सर्पासारखा दंश करतो, फुरशाप्रमाणे झोंबतो. तुझे डोळे विलक्षण प्रकार पाहतील; तुझ्या मनातून विपरीत गोष्टी बाहेर पडतील; समुद्रामध्ये आडवा पडलेल्यासारखी, डोलकाठीच्या माथ्यावर आडवा पडलेल्यासारखी तुझी स्थिती होईल. तू म्हणशील, “त्यांनी मला ताडन केले तरी माझे काही दुखले नाही, त्यांनी मला मारले तरी मला काही लागले नाही; मी शुद्धीवर केव्हा येईन? मी पुन्हा त्याचे सेवन करीन.”