YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीतिसूत्रे 22:1-16

नीतिसूत्रे 22:1-16 MARVBSI

चांगले नाव विपुल धनाहून इष्ट होय; प्रेमयुक्त कृपा सोन्यारुप्यापेक्षा उत्तम आहे. सधन व निर्धन ह्यांचा एकमेकांशी व्यवहार असतो. त्या सर्वांचा निर्माणकर्ता परमेश्वर आहे. चतुर मनुष्य अरिष्ट येताना पाहून लपतो; भोळे पुढे जातात आणि हानी पावतात. नम्रता व परमेश्वराचे भय ह्यांचे पारितोषिक धन, सन्मान व जीवन होय. कुटिल मनुष्याच्या मार्गात काटे व पाश असतात; ज्याला जिवाची काळजी असते त्याने त्यापासून दूर राहावे. मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीही तो त्यापासून परावृत्त होणार नाही. धनिक मनुष्य निर्धनांवर सत्ता चालवतो, ऋणको धनकोचा दास होतो. जो दुष्कर्म पेरतो तो अनर्थाची कापणी करतो, त्याच्या क्रोधाचा सोटा व्यर्थ होईल. ज्याची दृष्टी उदार त्याचे कल्याण होते, कारण तो आपल्या अन्नातून गरिबास देतो उन्मत्तपणा करणार्‍यास घालवून दे म्हणजे भांडण मिटेल, आणि कलह व अप्रतिष्ठा ही बंद पडतील. ज्याला मनाची शुद्धता आवडते, ज्याची वाणी कृपामय असते; अशाचा मित्र राजा असतो. परमेश्वराचे नेत्र ज्ञानाचे रक्षक आहेत. पण विश्वासघातक्याचे शब्द तो व्यर्थ करतो. आळशी म्हणतो, “बाहेर सिंह आहे; भर रस्त्यावर मी ठार होईन.” परस्त्रियांचे मुख मोठा खाडा आहे; ज्यावर परमेश्वराचा कोप होतो तो त्यात पडतो. बालकाच्या हृदयात मूर्खता जखडलेली असते; शासनवेत्र त्याच्यापासून तिला घालवून देते. आपले धन वाढवण्यासाठी जो गरिबाला नाडतो व धनिकाला भेटी देतो तो भिकेस लागतो.